एक्स @ians_india
राष्ट्रीय

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचा अखेर राजीनामा

हिंसाचारग्रस्त मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी रविवारी आपल्या पदाचा अखेर राजीनामा दिला.

Swapnil S

नवी दिल्ली/इंफाळ : हिंसाचारग्रस्त मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी रविवारी आपल्या पदाचा अखेर राजीनामा दिला. त्यांनी सायंकाळी राजभवनात जाऊन राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला. विशेष म्हणजे सिंह यांनी रविवारी सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. मणिपूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे विरोधकांकडून ते टीकेचे लक्ष्य बनले होते. तसेच त्यांच्या पक्षातील १२ आमदारही नेतृत्व बदलासाठी त्यांच्यावर दबाव टाकत होते. दरम्यान, नवीन मुख्यमंत्र्यांबाबतचा निर्णय एक-दोन दिवसात घेतला जा‌ण्याची शक्यता आहे.

राज्यात गेल्या २१ महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे बिरेन सिंह यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत होता. पक्षांतर्गत दबावामुळे अखेर वाढता अंतर्गत रोष शांत करण्यासाठी एन. बिरेनसिंह यांनी मुख्यमंत्रीपद सोडले. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिला, तेव्हा मणिपूर भाजपचे अध्यक्ष ए. शारदा, भाजप खासदार संबित पात्रा आणि किमान १९ आमदारही उपस्थित होते.

राज्यपालांना सुपूर्द केलेल्या आपल्या राजीनाम्यात एन. बिरेन सिंह म्हणाले की, मी मणिपुरी व्यक्तीच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने वेळेवर केलेल्या हस्तक्षेपाबद्दल आभारी आहे. सरकारने वेगवेगळ्या विकासकामांना गती दिली आणि विविध योजना लागू केल्या. केंद्र सरकारची सातत्यपूर्ण मदत आणि मार्गदर्शनामुळे मणिपूरच्या विकास आणि समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलता आली.

अमित शहा, नड्डांच्या भेटीनंतर निर्णय

एन. बिरेन सिंह यांनी रविवारी सकाळी दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत राज्याच्या राजकीय स्थिती आणि संभाव्य पर्यायांवर चर्चा झाल्याचे समजते. या भेटीतच सिंह यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचे सांगण्यात येते.

मणिपुरात वांशिक हिंसाचार अद्यापही सुरूच

३ मे २०२३ पासून मणिपूरमध्ये कुकी-मैतेई समुदायात हिंसाचार सुरू आहे. मैतेई-कुकी समुदायात हिंसाचार सुरू होऊन ६०० हून अधिक दिवस उलटून गेले आहेत. याकाळात गोळीबाराच्या ४०८ घटनांची नोंद झाली. यामध्ये अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

यामुळे दिला राजीनामा

कॉनराड संगम यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) हिंसाचाराच्या मुद्द्यावर पाठिंबा काढून घेतल्यानंतर पक्षातील आमदारांनीही नेतृत्व बदलाची मागणी केली होती. जर ‘फ्लोर टेस्ट’ झाली असती तर नाराज आमदार पक्षाचा व्हिप मान्य न करण्याची शक्यता होती, त्यामुळे सरकार संकटात येऊ शकले असते. यापासून बचावासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. दरम्यान, एन. बिरेन सिंह यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाबरोबर चर्चा केल्यानंतरच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

उशिरा सुचलेले शहाणपण - कॉंग्रेस

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता. त्यांनी आता दिलेला राजीनामा हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका कॉंग्रेसने केली आहे. तसेच आता सतत परदेश वारीवर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरला कधी भेट देणार याची राज्यातील जनता प्रतीक्षा करीत आहे, असा टोलाही कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी लगावला.

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा; गुढीपाडव्यापासून १५ डब्यांच्या लोकल वाढणार, १६ उपनगरीय सेवांचे होणार रूपांतर

Gudi Padwa 2026 : उद्या स्वागत यात्रांचा मुंबईभर जल्लोष; गिरगाव, कुर्ला, दादर येथे चित्ररथ, खेळांची पर्वणी

इंदूरमध्ये EV चार्ज करताना शॉर्ट सर्किट; सिलिंडरचा भीषण स्फोट, ७ जणांचा दुर्दैवी अंत

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘रत्नागिरीचा राजा’ शहरात दाखल; हापूसच्या आगमनाने बाजारात सुगंध, दर मात्र दुपटीने वाढले

मध्य रेल्वे २०१२ उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवणार; अतिरिक्त १२० विशेष गाड्या चालविण्याचे नियोजन