

नवी दिल्ली : दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईविरोधातील याचिकेची तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि. २२) नकार दिला. सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांनी पोलिस कारवाईचे व्हिडीओ न्यायालयासमोर सादर करण्याची तयारी दर्शवली असता, "व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही," असे स्पष्ट शब्दांत सांगत सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी तातडीच्या सुनावणीची मागणी फेटाळून लावली.
पीटीआयच्या वृत्तानुसार, याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून कथित अत्याचार झाल्याचा आरोप करत त्यासंदर्भातील व्हिडीओ उपलब्ध असल्याचे न्यायालयाला सांगितले. तसेच, ही याचिका गुरुवारी (दि. २३) तातडीने सुनावणीस घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली. ही बाब सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर मांडण्यात आली.
'व्हिडीओ पाहण्यासाठी वेळ नाही'
यावर सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी, "आम्हाला व्हिडीओंमध्ये रस नाही. ते पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही," असे स्पष्ट केले. त्यानंतरही वकिलांनी व्हिडीओंचा उल्लेख केल्यानंतर न्यायालयाने, "आमचा वेळ वाया घालवू नका. आम्हाला कोणतेही व्हिडीओ पाहायचे नाहीत," असे सांगत सुनावणीची मागणी फेटाळली.
'चलो संसद' मोर्चानंतरचा वाद
ही याचिका सोमवारी संसदेकडे काढण्यात आलेल्या CJP च्या 'चलो संसद' मोर्चादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईशी संबंधित आहे. कथित परीक्षा गैरप्रकारांच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थी व आंदोलक मध्य दिल्लीत एकत्र आले होते.
मोर्चादरम्यान संघर्ष, लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर
मोर्चादरम्यान आंदोलकांनी संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली. परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला तसेच अश्रुधुराचाही वापर केला. या घटनेनंतर विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.