"विद्यार्थ्यांची माफी मागा"; दिल्ली आंदोलनातील लाठीचार्जवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांची माफी मागण्याबरोबरच अमित शहा यांच्यासह पंतप्रधानांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणीही त्यांनी केली.
"विद्यार्थ्यांची माफी मागा"; दिल्ली आंदोलनातील लाठीचार्जवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल
"विद्यार्थ्यांची माफी मागा"; दिल्ली आंदोलनातील लाठीचार्जवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल
Published on

नवी दिल्ली : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईनंतर राजकीय वातावरण अधिक तापले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी (दि.२१) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट निशाणा साधत विद्यार्थ्यांवरील कारवाईला पूर्णपणे "भारतीय संस्कृतीविरोधी" असल्याचे म्हटले. विद्यार्थ्यांची माफी मागण्याबरोबरच अमित शहा यांच्यासह पंतप्रधानांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणीही त्यांनी केली.

कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) 'चलो संसद' आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस-आंदोलक संघर्षात जखमी झालेली एक तरुणी दिल्लीतील राम मनोहर लोहिया (RML) रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

संसद भवन परिसरात माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी सांगितले की, विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा व्हावी, यासाठी विरोधी पक्षांच्या खासदारांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. मात्र, यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असे अध्यक्षांनी सांगितल्याचा दावा त्यांनी केला.

"विद्यार्थ्यांची माफी मागा"; दिल्ली आंदोलनातील लाठीचार्जवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल
'झुरळां'ची संसदेवर धडक! देशभर निदर्शने; दिल्लीत मोर्चावर लाठीमार, अश्रुधूर, ५० जण जखमी; संसदेत विरोधकांचा हंगामा

'मोदींनी अद्याप विद्यार्थ्यांची माफी मागितलेली नाही'

सोमवारी (दि. २०) विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलिस कारवाईचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले, "हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली, ते पूर्णपणे भारतीय संस्कृतीविरोधी आहे. काल जे घडले, त्याबद्दल मोदींनी अद्याप विद्यार्थ्यांची माफीही मागितलेली नाही. सध्या जे काही सुरु आहे, त्याबद्दल पंतप्रधान मोदींनी माफी मागावी," अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

'शिक्षण आणि परीक्षा व्यवस्था पूर्णपणे ढासळली'

देशातील शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेवरही राहुल गांधी यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. "विद्यार्थी शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेविरोधात आंदोलन करत आहेत. देशातील प्रत्येकाला माहिती आहे की, शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा प्रणाली पूर्णपणे ढासळली असून ती पोखरून निघाली आहे," असा आरोप त्यांनी केला.

'जबाबदारी अमित शहांची, मोदींनीही उत्तर द्यावे'

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत विचारले असता राहुल गांधी म्हणाले, "धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायलाच हवा. पण विद्यार्थ्यांवर लाठीमार त्यांनी केलेला नाही. त्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा. गृहमंत्री पंतप्रधानांना अहवाल देतात, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारावी."

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेकडे निघालेल्या विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर करून जमाव पांगवला होता. या घटनेनंतर देशभरात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, विद्यार्थी आंदोलन आणि त्यावरील पोलिस कारवाई हा मुद्दा आता संसदेतही गाजण्याची शक्यता आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in