नवी दिल्ली : नागरिकांना सणासुदीच्या खरेदीदरम्यान स्थानिक कारागिरांची उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. अशा कृतीमुळे ‘व्होकल फॉर लोकल’ मोहिमेला चालना मिळेल आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल.
‘मन की बात’मध्ये ते म्हणाले की, ‘व्होकल फॉर लोकल’ची भावना भारतीय उत्पादनांना जगभरातील बाजारपेठांमध्ये पोहोचवत आहे. उदाहरणार्थ, बिहारमधील ‘मखाना’ हा ग्रीसपर्यंत पोहोचत आहे, तर कर्नाटकातील ‘तूर डाळ’ मालदीवला निर्यात केली जात आहे, ज्यामुळे भारतीय शेतकऱ्यांसाठी नवीन जागतिक बाजारपेठा खुल्या होत आहेत.
पंतप्रधानांनी नमूद केले की, ‘सणासुदीच्या काळात लोक आपल्या कुटुंबासाठी आणि प्रियजनांसाठी अनेक गोष्टी खरेदी करतात. यावेळीही खरेदी करताना, कृपया स्थानिक कारागिरांच्या उत्पादनांना प्राधान्य द्या. तुमच्या खरेदीमुळे त्यांचा उत्साह वाढेल,’ असे ते म्हणाले.
पॅकेजिंगवर दिला जातोय अधिक भर
‘बऱ्याचदा, जेव्हा आपण बाजारात एखादी वस्तू पाहतो, तेव्हा चांगले पॅकेजिंग पाहून आपण ती वस्तू उचलण्यास प्रवृत्त होतो आणि आपल्याला त्या उत्पादनाबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा होते. हे लक्षात घेऊन, आता पॅकेजिंगवर अधिक भर दिला जात आहे,’ असे ते म्हणाले.
पंजाबमध्ये सेंद्रिय शेतीला नवसंजीवनी
पंतप्रधानांनी पंजाबमधील पारंपरिक शेती पद्धतीच्या पुनरुज्जीवनाबद्दल सांगितले आणि नमूद केले की, ‘खेती विरासत मिशन’ नावाच्या संस्थेने सेंद्रिय शेतीला नवसंजीवनी देण्यास सुरुवात केली आहे. या संघातील लोकांना पंजाबच्या माळवा प्रदेशात नैसर्गिक कापूस शेतीला प्रोत्साहन द्यायचे होते आणि त्यांनी या उपक्रमाला 'नव-त्रिंजन' असे नाव दिले.
प्रसारणादरम्यान, मोदींनी उत्तराखंडच्या टिहरी गढवाल जिल्ह्यातील लोक हेवल नदीला नवसंजीवनी देण्यासाठी एकत्र आल्याबद्दलही सांगितले.