मायक्रोसॉफ्ट सेवा ठप्प; तांत्रिक बिघाडाचा फटका आशियापासून अमेरिकेपर्यंत 
राष्ट्रीय

मायक्रोसॉफ्ट सेवा ठप्प; तांत्रिक बिघाडाचा फटका आशियापासून अमेरिकेपर्यंत

जगातील आघाडीची टेक कंपनी मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊड आणि ऑफिस सेवांमध्ये झालेल्या मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे जवळपास ७४ देशांतील लाखो वापरकर्त्यांचे कामकाज ठप्प झाले. याचा सर्वाधिक फटका आऊटलुक आणि एक्स्चेंज ऑनलाइनला बसला असून, बाधित सर्व्हर वेगळे करून सेवा पूर्ववत करण्यास कंपनीला आता यश मिळत असल्याचे मायक्रोसॉफ्टने शुक्रवारी स्पष्ट केले.

Swapnil S

नवी दिल्ली/हाँगकाँग : जगातील आघाडीची टेक कंपनी मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊड आणि ऑफिस सेवांमध्ये झालेल्या मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे जवळपास ७४ देशांतील लाखो वापरकर्त्यांचे कामकाज ठप्प झाले. याचा सर्वाधिक फटका आऊटलुक आणि एक्स्चेंज ऑनलाइनला बसला असून, बाधित सर्व्हर वेगळे करून सेवा पूर्ववत करण्यास कंपनीला आता यश मिळत असल्याचे मायक्रोसॉफ्टने शुक्रवारी स्पष्ट केले.

मायक्रोसॉफ्टने अधिकृत सोशल मीडिया हँडल मायक्रोसॉफ्ट ३६५ स्टेटसवर दिलेल्या माहितीनुसार, या बिघाडाचे अंतिम मूळ कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, हा कोणताही सायबर हल्ला नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेला मायक्रोसॉफ्टचा जागतिक तांत्रिक बिघाड आज शुक्रवारीही पूर्णपणे निवळलेला नाही. एकट्या अमेरिकेत आउटलुक बंद पडल्याच्या १.३० लाखांहून अधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या. मात्र, टीम्सच्या मुख्य सेवा सुरू असून सर्व्हरवरील वाढता ताण नियंत्रित करून सेवा हळूहळू पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

'टीम्स'च्या सेवा सुरू

आउटेज ट्रॅक करणाऱ्या डाऊन डिटेक्टर या वेबसाइटच्या आकडेवारीनुसार, गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुरू झालेल्या या बिघाडाने अवघ्या तासाभरात जवळपास ७४ देशांतील युजर्सना विळखा घातला. जागतिक स्तरावर केवळ आउटलुक बंद पडल्याच्या तक्रारींचा आकडा १.४० लाखांच्या उच्चांकावर पोहोचला होता. शुक्रवार सकाळपर्यंत या तक्रारींची संख्या कमी होऊन सुमारे २८ हजारांवर आली असली, तरी समस्या अद्याप पूर्णपणे संपलेली नाही.

विमानसेवांवर परिणाम

भारतीय विमान कंपनी एअर इंडियाने स्पष्ट केले की, मायक्रोसॉफ्टच्या जागतिक बिघाडाचा त्यांच्या विमान उड्डाणांवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र, प्रवाशांच्या ई-मेलद्वारे येणाऱ्या तक्रारी आणि प्रश्नांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये म्हणून कंपनीने तात्पुरती पर्यायी ई-मेल व्यवस्था सुरू केली आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या ई-मेल सपोर्ट सेवांवर मात्र परिणाम झाला आहे. त्यामुळे ग्राहकांकडून येणारे ई-मेल प्राप्त करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. तथापि, इतर ग्राहक सहाय्य सेवा आणि विमान उड्डाणे सुरळीत सुरू असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

दरम्यान, मायक्रोसॉफ्टकडून सेवा पूर्णपणे पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असून, जगभरातील कंपन्या आणि सरकारी यंत्रणांचे लक्ष आता या समस्येच्या निराकरणाकडे लागले आहे.

सिंगापूरच्या सरकारी तंत्रज्ञान संस्थेने सरकारी ई-मेल सेवा बंद पडल्याची माहिती दिली असून, मायक्रोसॉफ्टच्या मदतीने समस्या सोडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. फिलिपाइन्सच्या सर्वोच्च न्यायालयाच्या काही कामकाजावरही मायक्रोसॉफ्ट ३६५ मधील बिघाडाचा परिणाम झाला आहे. ई-मेलला उत्तरे देण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

क्रॉऊडस्ट्राईकशी तुलना

ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री टोनी बर्क यांनी सांगितले की, मायक्रोसॉफ्टने सध्याच्या बिघाडाची तुलना २०२४ मधील क्रॉऊडस्ट्राईक घटनेशी केली आहे. मायक्रोसॉफ्टच्या ऑस्ट्रेलियातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तसेच सरकारच्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयकाशी आपण चर्चा केल्याचे बर्क यांनी सांगितले. जुलै २०२४ मध्ये क्राऊडस्ट्राईक या सायबर सुरक्षा कंपनीच्या सॉफ्टवेअर अपडेटमधील त्रुटीमुळे जगभरातील लाखो संगणकांवर परिणाम झाला होता. विमानसेवा, दूरचित्रवाणी प्रसारण, बँका, रुग्णालये आणि किरकोळ व्यापार क्षेत्रातील कामकाज विस्कळीत झाले होते.

कंपनीच्या प्राथमिक निदानानुसार, काही सर्व्हर 'ऑटोमेटेड हेल्थ चेक'मध्ये अयशस्वी होऊन अचानक बंद पडल्याने उर्वरित सर्व्हरवरील मुख्य प्रक्रियेवर प्रचंड ताण आला. सुरुवातीला दुरुस्त केलेले सर्व्हर ट्रॅफिक येताच पुन्हा बंद पडत होते. यावर उपाय म्हणून मायक्रोसॉफ्टने सर्व नवीन अपडेट्स थांबवून काही भागांतील ट्रॅफिकवर तात्पुरत्या मर्यादा घातल्या आणि पर्यायी मार्गांवर ट्रॅफिक वळवले. ताज्या अपडेटनुसार, मर्यादित स्वरूपात सुरू केलेले सर्व्हर सध्या स्थिर असून सेवा हळूहळू पूर्ववत होत आहेत.

एआय क्षेत्रालाही फटका

या जागतिक तांत्रिक बिघाडाचे पडसाद कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातही उमटले आहेत. ओपन एआय आणि ॲन्थ्रोपिक या कंपन्यांनी मायक्रोसॉफ्ट ३६५ टूल्सशी कनेक्ट होण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले आहे. एआय प्लॅटफॉर्मचा इतर कंपन्यांच्या सॉफ्टवेअरशी संवाद आणि एकत्रित वापर वाढत असताना, अशा प्रकारच्या तांत्रिक बिघाडाचा परिणाम किती व्यापक होऊ शकतो, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

कनेक्टिव्हिटीच्या समस्या

या बिघाडात मायक्रोसॉफ्ट टीम्स पूर्णपणे ठप्प झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनीच्या माहितीनुसार, टीम्सवरील मेसेजिंग आणि ऑनलाइन मीटिंग्ज मोठ्या प्रमाणावर सुरळीत सुरू आहेत; केवळ ज्या फीचर्सचा संबंध ‘एक्स्चेंज ऑनलाइन’ किंवा कॅलेंडरशी येतो, तेथेच अडचणी येत आहेत. मायक्रोसॉफ्टच्या प्रणालीशी जोडलेल्या ओपन एआय आणि ॲन्थ्रोपिक या एआय कंपन्यांच्या काही टूल्सनाही कनेक्टिव्हिटीच्या समस्यांचा सामना करावा लागला. तसेच, अमेरिकेतील इलेक्ट्रिक ट्रक उत्पादक कंपनी ‘वर्कहॉर्स ग्रुप’ने या तांत्रिक बिघाडामुळे आपले तिमाही आर्थिक निकाल १२ नोव्हेंबरऐवजी १६ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलले आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai Local Update : उद्या मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवरील अनेक लोकल रद्द, जाणून घ्या वेळापत्रक

Surat Fire : सुरतमधील कापडाच्या गोदामाला भीषण आग; परिसरात धुराचे प्रचंड लोट, घटनेचा Video समोर

Microsoft Global Outage : जगभरातील युजर्सना मोठा दिलासा! मायक्रोसॉफ्टच्या सर्व सेवा सुरू, कंपनीकडून दिलगिरी व्यक्त

पुणे-नागपूर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; पुलाच्या कठड्याला धडकून बस नाल्यात, प्रवाशांना काचा फोडून बाहेर काढलं, एकाचा मृत्यू

US Flight Chaos : अमेरिकेची विमानसेवा ठप्प; लाखो प्रवाशांचे हाल, नेमकं काय घडलं?