नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय व्यापारात दुर्मीळ व महत्त्वाच्या खनिजांचा वापर (क्रिटिकल मिनरल्स) शस्त्रासारखा करणे हे चिंताजनक असल्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिला. जगभरातील देशांची समायिक प्रगती आणि समृद्धीमध्ये असे धोरण अडथळा ठरू शकते, असे ते म्हणाले. या खनिजांच्या आडून इतर देशांची अडवणूक सुरू असल्याचेच मोदी यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टैरिफ लागू करण्याच्या धोरणाला शह देण्यासाठी चीनने आपल्याकडील अशा महत्वाच्या खनिजांचा पुरवठा रोखला होता. यामुळे मोबाईल, संगणक, वाहने तसेच अनेक प्रकारच्या यंत्रसामग्रीचे उत्पादन घटले होते वा ठप्प झाले होते. त्याचा भारतासह सर्वच देशांना मोठा फटका बसला होता. याचा थेट उल्लेख न करता मोदी यांनी हे वक्तव्य केले.
या आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी ब्रिक्स संघटनेच्या सदस्य देशांनी सहकार्य व सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून पुढे आले पाहिजे, असे आवाहनही मोदींनी केले. भारताच्या यजमानपदाखाली पार पडलेल्या दोन दिवसीय ब्रिक्स परिषदेच्या समारोप सत्रात ते बोलत होते.
चिनी अध्यक्ष शी जिनपिंग, रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इराणी अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्यासह संघटनेचे प्रमुख नेते यावेळी हजर होते. एकत्रितपणे आपण सहकार्यातून पुढे जातो आणि मानवतेसाठी समृद्ध होतो. आमची विविधता हीच आमची ओळख असो, आमचे सहकार्य ही आमची प्रेरणा असो आणि आमची प्रगती संपूर्ण मानवतेची सेवा करो, असे आवाहनही त्यांनी केले.
नियमांचा आग्रह हवा- जिनपिंगनवी
दिल्ली: नियमांशिवाय जगणे म्हणजे रहदारीच्या दिव्यांशिवाय असलेला चौक, जिथे गोंधळ आणि अव्यवस्था निश्चित असते. निष्पक्षता आणि न्याय ही सार्वत्रिक आकांक्षा आहे आणि आंतरराष्ट्रीय नियम सर्व देशांनी मिळून लिहिले पाहिजेत, असे प्रतिपादन चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी केले. सार्वभौम समानता, अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे आणि वादांचे शांततापूर्ण निवारण यासह आंतरराष्ट्रीय संबंधांच्या मूलभूत मानकांचे रक्षण केले पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय कायदा व आंतरराष्ट्रीय नियम सर्वांना लागू होतील याची खात्री केली पाहिजे, असेही ते म्हणाले.