मोहन भागवत संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

संघाने सांगितल्यास तत्काळ पद सोडेन! सरसंघचालक मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती; पण, कामातून निवृत्ती कधीच घेणार नाही!

‘मी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली असून संघाला याबाबतची माहिती दिली आहे; मात्र संघाने मला काम सुरू ठेवण्यास सांगितले आहे. जेव्हा संघ, मला पद सोडण्यास सांगेल, तेव्हा मी तत्काळ ते करीन; पण कामातून निवृत्ती कधीच घेणार नाही,’ असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी स्पष्ट केले.

Swapnil S

मुंबई : ‘मी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली असून संघाला याबाबतची माहिती दिली आहे; मात्र संघाने मला काम सुरू ठेवण्यास सांगितले आहे. जेव्हा संघ, मला पद सोडण्यास सांगेल, तेव्हा मी तत्काळ ते करीन; पण कामातून निवृत्ती कधीच घेणार नाही,’ असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी (दि.८) स्पष्ट केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना भागवत यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

‘आरएसएस प्रमुखपदासाठी कोणतीही निवडणूक होत नाही. प्रादेशिक आणि विभागीय प्रमुख हे सरसंघचालकांची नियुक्ती करतात. साधारणपणे ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पद न भूषवता काम करावे, असे म्हटले जाते,’ असे भागवत म्हणाले. संघाचे नेतृत्व करणारी व्यक्ती ही, जात कोणतीही असो, हिंदूच असेल आणि उपलब्ध असलेल्यांपैकी सर्वोत्तम उमेदवारालाच हे सर्वोच्च पद दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.आरएसएसमध्ये समुदायाधारित प्रतिनिधित्व नाही. स्वयंसेवक हे आपल्या कामाच्या आधारे पुढे येतात, असे भागवत म्हणाले.

अनुसूचित जात किंवा अनुसूचित जमातीचा असणे ही अपात्रता नाही; तसेच ब्राह्मण असणे ही देखील पात्रता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. परिस्थिती अनुकूल किंवा प्रतिकूल असू शकते; त्यावर अतिशय विचार करण्यात अर्थ नाही, असे सांगत ते म्हणाले, ‘समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा उपाय शोधणे महत्त्वाचे आहे. सत्य समोर येत नाही तोपर्यंत भ्रम प्रभावी राहतो’.

संघाचे काम हे ‘संस्कार’ रुजवण्याचे...

हलक्या-फुलक्या शैलीत भागवत म्हणाले की, ‘संघ हा स्वयंसेवकाकडून रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत काम काढून घेतो आणि आजवर संघाच्या इतिहासात कोणालाही निवृत्त करावे लागले, अशी वेळ अद्याप आलेली नाही. संघाचे काम हे ‘संस्कार’ रुजवण्याचे आहे; प्रचार करण्याचे नाही, असेही त्यांनी सांगितले.‘आपला प्रचार करण्यात आपण मागे पडलो आहोत. अतिप्रचारामुळे प्रसिद्धी येते आणि त्यानंतर अहंकार वाढतो. त्यापासून स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे. प्रसिद्धी ही पावसासारखी असावी,’ असे म्हणत त्यांनी संघ विविध जनसंपर्क उपक्रम राबवत असल्याचे सांगितले.

इंग्रजी ही कधीही कामकाजाची भाषा नसेल

इंग्रजी ही कधीही संघाच्या कामकाजाची माध्यमभाषा नसेल, कारण ती भारतीय भाषा नाही, असे भागवत म्हणाले. ‘आम्हाला भारतीयांसोबत काम करायचे आहे. जिथे इंग्रजी आवश्यक आहे, तिथे आम्ही तिचा वापर करतो. आम्ही इंग्रजीविरोधी नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकांना इंग्रजी अशा प्रकारे बोलता यावी की मूळ इंग्रजी भाषिकांनाही ती ऐकावीशी वाटेल, असे ते म्हणाले. “आपण इंग्रजी आत्मसात केली पाहिजे; पण याचा अर्थ मातृभाषा विसरणे असा नाही,” असेही ते म्हणाले.

संघ कोणत्याही समुदायाला लक्ष्य करत नाही

मुस्लिम समाजात संघ स्वयंसेवकांच्या कामाबाबत विरोध असूनही ते कसे काम करतात, असे विचारले असता भागवत म्हणाले की, दोन्ही बाजूंनी विरोध केला तर फक्त संघर्षच होईल; काम होणार नाही. संघ कोणत्याही जाती किंवा समुदायाला लक्ष्य करत नाही; तर भौगोलिक क्षेत्रानुसार काम करतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले. एखाद्या भागात १०,००० लोकसंख्या असेल तर आम्ही तिथे काम करण्याचा प्रयत्न करतो. एकदा भौगोलिक पातळीवर विस्तार झाला की, सर्व वर्ग आणि समुदायांपर्यंत पोहोचता येते. संघाच्या वरच्या पातळीवर पाहिले तर बहुतांश समुदायांचे प्रतिनिधित्व दिसते,” असे ते म्हणाले.

भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्यांना संघ पाठिंबा देतो

भ्रष्टाचार उघडकीस आणण्यावर संघाचा विश्वास असून, त्याविरुद्ध लढणाऱ्यांना संघ पाठिंबा देतो, असेही भागवत यांनी सांगितले.‘भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्यांना पाठिंबा द्यायला स्वयंसेवकांना सांगितले जाते. भ्रष्टाचाराविरोधात कठोर कायदे आणि कारवाईच्या बाजूने संघ आहे,” असे त्यांनी म्हटले. भ्रष्टाचार हा व्यवस्थेत नसून लोकांच्या मनात असतो, असे सांगत ते म्हणाले, ‘व्यवस्थेला भ्रष्ट करणारेही लोक असतात आणि ती सुधारण्याचे काम करणारेही लोकच असतात.”

संघाला ब्राह्मण संघटना म्हणून ओळखले जाई

आरएसएसची स्थापना झाली तेव्हा त्याचे काम ब्राह्मणबहुल समाजातून सुरू झाले होते; त्यामुळे बहुतेक संस्थापक हे ब्राह्मण होते आणि त्याकाळी संघाला ब्राह्मण संघटना म्हणून ओळखले जात होते, असे त्यांनी स्पष्ट केले. लोक नेहमी आपल्या समाजाचे प्रतिनिधित्व असलेली संस्था शोधत असतात, असेही ते म्हणाले.

'सर्वोत्तम उपलब्ध उमेदवार' हाच निकष

संघप्रमुख अनुसूचित जाती (एससी) किंवा अनुसूचित जमाती (एसटी) पार्श्वभूमीचा असेल का, असे विचारले असता, याबाबत ठोस उत्तर देता येणार नाही, असे ते म्हणाले. कारण हा निर्णय पूर्णपणे नियुक्ती करणाऱ्यांचा असतो, असे भागवत यांनी सांगितले. ‘जर मला प्रमुख निवडायचा असता, तर मी ‘सर्वोत्तम उपलब्ध उमेदवार’ या निकषावर निवड केली असती. मला सरसंघचालक म्हणून नियुक्त केले गेले तेव्हा अनेक सर्वोत्तम उमेदवार होते; पण ते उपलब्ध नव्हते. ज्याला इतर जबाबदाऱ्यांतून मुक्त करता येईल, तो मी होतो,’ असे ते म्हणाले.

एका अंध जोडप्याच्या डोळस प्रेमाची दास्तान; मुस्लिम मैत्रिणीच्या सुटकेसाठी रामकृपाल न्यायालयात

ज्येष्ठ नागरिक, वाहकामध्ये वादावादी; एसटीत स्वच्छता अधिभार लागू

...तर भाडेकरू बनतो सहमालक; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंब्य्रात 'कैसा फसाया'ची चर्चा; जात प्रमाणपत्र प्रकरणी सहार शेख अडचणीत

राज्यात शनिवारपासून अवकाळीचा इशारा; अकोल्यात उष्माघाताचा बळी