मोदी देश चालवण्यास असमर्थ; विरोधकांचा हल्लाबोल, आमच्या कारागिरांचे काय होणार? सराफा बाजाराचा सवाल  
राष्ट्रीय

मोदी देश चालवण्यास असमर्थ; विरोधकांचा हल्लाबोल, आमच्या कारागिरांचे काय होणार? सराफा बाजाराचा सवाल

पश्चिम आशियातील संघर्षामुळे उद्भवलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी नागरिकांनी काटकसरीचे उपाय योजावेत, असे आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोने खरेदी न करण्याबाबतचे वक्तव्य केले होते.

Swapnil S

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे उद्भवलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी नागरिकांनी काटकसरीचे उपाय योजावेत, असे आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोने खरेदी न करण्याबाबतचे वक्तव्य केले होते. त्यावर देशभरातून तीव्र पडसाद उमटले आहेत. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांचे विधान म्हणजे त्यांच्या अपयशाचा पुरावा असल्याचे म्हटले आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी सोमवारी मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडताना ‘तडजोड केलेले पंतप्रधान आता देश चालवण्यास सक्षम राहिलेले नाहीत’, असे म्हणत सरकारवर जोरदार निशाणा साधला, तर सोन्याशी संबंधित जवळपास तीन कोटी कामगारांचे काय होणार, असा सवाल सराफा बाजाराने उपस्थित केला आहे.

निवडणुका संपताच सरकारला 'संकटाची' आठवण झाली. भाजप सरकारचे अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरणावरील नियंत्रण सुटले आहे, अशी टीका सपाचे नेते अखिलेश यादव यांनी केली आहे. तर हे सरकार केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कारभार करते, अशी कोपरखळी ठाकरे शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी मारली आहे.

त्याचप्रमाणे जर इंधन वाचवायचे असेल, तर पंतप्रधानांनी स्वतःचे रोड शो, जाहीर सभा आणि परदेश दौरे थांबवावेत, अशी घणाघाती टीका आपचे नेते संजय सिंह यांनी केली आहे. डी. राजा (सीपीआय)- सामान्य जनतेकडे खायला पैसे नाहीत, मग ते सोने कोठून खरेदी करणार, मोदी कोणाला सल्ला देत आहेत.

काँग्रेससमवेतच या विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही मोदींवर टीका केली असताना दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने पंतप्रधानांच्या विधानाचा बचाव केला असून, हे आवाहन व्यापक राष्ट्रहितासाठी असल्याचे म्हटले आहे, तर कठीण काळात काँग्रेसचे केवळ राजकारण सुरू असते. त्यांना राष्ट्र उभारणीशी काही देणेघेणे नाही, अशी टीकाही भाजपने केली आहे.

मोदी प्रवचन देतआहेत: खर्गे

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही तीव्र शब्दात टीका केली. जेव्हा लोक अडचणीत आहेत, तेव्हा पंतप्रधान बचतीचे धडे देत आहेत. २८ फेब्रुवारीला जेव्हा पश्चिम आशियात संघर्ष सुरू झाला, तेव्हाच काँग्रेसने अर्थव्यवस्थेवरील परिणामांबाबत इशारा दिला होता. मात्र, तेव्हा पंतप्रधान प्रचारात आणि रोड शोमध्ये व्यस्त होते. निवडणुका संपताच आता जनतेला 'हे करू नका, ते करू नका' अशी प्रवचने ऐकवली जात आहेत, असा टोला खर्गे यांनी लगावला.

रोजगारावर गंडांतर

सोने खरेदी न करण्याच्या आवाहनानंतर सोन्याचा भाव घसरला आहे. सराफा व्यापाऱ्यांनी मात्र याबाबत चिंता व्यक्त केली आहे. सध्या लग्नसराई आहे. तरीही दागिन्यांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी दिसत नाही. दुसरीकडे ज्वेलरी मेकिंगवर उदरनिर्वाह असणाऱ्या ३ कोटी कारागिरांचे काय होणार, असा सवाल ऑल इंडिया ज्वेलर्स असोशिएशनकडून उपस्थित करण्यात आला आहे. भारतात दागिन्यांच्या घडणावळीचे काम करणारे तीन कोटी कारागीर आहेत. ते काम कुठे करणार, मुंबईत एकूण १५ हजार ज्वेलर्स आहेत, त्यांचे काय होणार, असा सवाल ऑल इंडिया ज्वेलर्स असोशिएशनने केला आहे. देशभक्त आम्ही पण आहोत. पण कोणाची रोजीरोटी जायला नको, असे आमचे मत असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.

कारागिरांनी कसे जगावे

लोकांनी सोने खरेदी बंद केली तर एक कोटी लोकांच्या रोजगारावर गंडांतर येईल, असे मत व्यक्त करीत नागपूर आणि सोलापुरातही मोदींच्या आवाहनला सराफा व्यवसायिकांनी विरोध केला आहे. वर्षभर सोने विकले नाही तरीही सोन्याचे व्यापारी जगू शकतील. मात्र कारागिरांनी कसे जगायचे, असा सवाल सराफा व्यापारी करत आहेत.

व्यापाऱ्यांचा विरोध

मोदी यांनी वर्षभर सोनं खरेदी करू नका, असे आवाहन केले आहे. या आवाहनाला मात्र सराफा व्यापारी विरोध करताना दिसत आहेत. तीन कोटी कारागिरांचे काय होणार, असा सवाल उपस्थित केला जातोय. मोदींच्या सोने खरेदी न करण्याच्या आवाहनानंतर सराफा बाजारातील लोकांची गर्दी कमी झाली आहे. सोबतच सोन्याचा भावही घसरला आहे. दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर आता सराफा व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. मोदींच्या या आवाहनाला सराफा व्यापाऱ्यांकडून विरोध होत आहे.

काटकसरीचे आवाहन हा अपयशाचा पुरावा

आपल्या १२ वर्षांच्या अपयशाचे खापर भारतीय जनतेच्या डोक्यावर फोडू नका, असा इशाराही विरोधी पक्षाने पंतप्रधानांना दिला आहे. पंतप्रधानांचे विधान म्हणजे त्यांच्या अपयशाचा पुरावा असल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. 'एक्स'वरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, काल मोदीजींनी जनतेला त्याग करण्याचे आवाहन केले. सोने खरेदी करू नका, परदेश प्रवास टाळा, पेट्रोलचा वापर कमी करा, खते आणि खाद्यतेलाचा वापर कमी करा, मेट्रोने प्रवास करा आणि वर्क फ्रॉम होम करा, हे केवळ सल्ले नसून सरकार पडल्याचे पुरावे आहेत. ते पुढे म्हणाले की, १२ वर्षांच्या काळात देशाला अशा टप्प्यावर आणून ठेवले आहे की, आता जनतेला काय खरेदी करावे आणि काय नाही, कुठे जावे आणि कुठे नाही, हे सांगावे लागत आहे. आपली जबाबदारी झटकण्यासाठी ते वारंवार जनतेवर भार टाकत आहेत.

२ हजारांवरील UPI पेमेंट शुल्काला स्थगिती देण्यास SC चा नकार; केंद्रासह RBI लाही नोटीस

मोठी बातमी! CJP च्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी नाकारली परवानगी; अभिजीत दिपकेंकडून २ ऑक्टोबरला 'जेल भरो'ची घोषणा

आई धावत मागे आली, पण क्षणात होत्याचं नव्हतं! स्कॉर्पिओने ३ वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

Pune : "मुलीला घेऊन जा, नाहीतर..." जावयाचा रात्री फोन अन् काही तासांत IT इंजिनिअर वैष्णवीचा मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा आरोप

'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेचा पुण्यात राडा! ५ लाखांची मागणी, डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण; अखेर अटक