भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी मोदींची नेतान्याहू, यूएईच्या अध्यक्षांशी दूरध्वनीवरून चर्चा 
राष्ट्रीय

Israel-Iran War: भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी मोदींची नेतान्याहू, यूएईच्या अध्यक्षांशी दूरध्वनीवरून चर्चा

इस्त्रायल-अमेरिका-इराण युद्धामुळे मध्य-पूर्वेत तणावपूर्ण वातावरण असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू आणि यूएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली

Swapnil S

नवी दिल्ली : इस्त्रायल-अमेरिका-इराण युद्धामुळे मध्य-पूर्वेत तणावपूर्ण वातावरण असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू आणि यूएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली आणि शत्रुत्व शक्य तितक्या लवकर संपुष्टात आणण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.

अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणकडून संपूर्ण मध्य-पूर्वेत अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू आहेत. इराणी क्षेपणास्त्रांचे लक्ष्य इस्रायलही आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून सध्याच्या परिस्थितीची माहिती घेतली.

अमेरिका आणि इस्त्रायलने २८ फेब्रुवारी रोज इराणविरुद्ध संयुक्त लष्करी कारवाई सुरू केली. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मध्यपूर्वेत तणाव आणखी वाढला आहे. अमेरिका आणि इस्रायलची लढाऊ विमाने इराणवर सातत्याने बॉम्बहल्ले करत असून, त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणकडून मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांवर आणि इस्त्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहेत.

भारताला चिंता

या संभाषणात मोदी यांनी नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली. तसेच शत्रुत्व लवकरात लवकर संपवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. 'एक्स'वरील पोस्टमध्ये मोदींनी म्हटले आहे की, अलीकडील घडामोडीविषयी भारताला चिंता वाटत आहे.

भारत यूएईसोबत

दरम्यान, मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशीही दूरध्वनीवर चर्चा केली. यूएईवरील अलीकडील हल्ल्यांचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आणि जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले. कठीण काळात भारत यूएईसोबत एकजुटीने उभा असल्याचेही त्यांनी सांगितले. यूएईमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल त्यांनी अध्यक्षांचे आभार मानले. तसेच तणाव कमी करण्यासाठी आणि प्रादेशिक शांतता, सुरक्षा व स्थैर्याला पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Iran Israel War : इराणच्या सर्वोच्च नेता निवडी‌वेळी इस्रायलचा हल्ला; लेबनॉनची राजधानी बैरूतवर हवाई हल्ले

Iran Israel War : आखाती भागातील १ कोटी भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य; परराष्ट्र खात्याचे प्रतिपादन

आखाती युद्धाचा फटका आता शेतकऱ्यांनाही; JNPT त अडकले शेकडो कंटेनर; दुबई बाजारपेठ बंद असल्याने केळी, कांद्याची निर्यात ठप्प

मुंबईसह राज्यभर धुळवडीचा जल्लोष; राजकीय नेते, सेलिब्रिटीही रंगले रंगात

Ajit Pawar Plane Crash : 'एएआयबी'च्या अहवालावर छगन भुजबळांची शंका