नेपाळमध्ये ३०० भारतीय बेपत्ता; महापुरातील मृतांची संख्या ३५९; राज्यातील ११४ पर्यटक अडकले, ५३ पर्यटक सुरक्षित व्हायरल व्हिडिओवरून घेतलेला स्क्रीनशॉट
राष्ट्रीय

नेपाळमध्ये ३०० भारतीय बेपत्ता; महापुरातील मृतांची संख्या ३५९; राज्यातील ११४ पर्यटक अडकले, ५३ पर्यटक सुरक्षित

या दुर्घटनेत अजूनही किमान ८२६ जण बेपत्ता आहेत. यामध्ये ५९० विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता नागरिकांमध्ये ३०० भारतीय नागरिकांचा समावेश आहे.

Swapnil S

काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुराच्या तडाख्यातील मृतांची संख्या गुरुवारी ३५९ वर पोहोचली आहे. ‘नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट अथॉरिटी’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, या दुर्घटनेत अजूनही किमान ८२६ जण बेपत्ता आहेत. यामध्ये ५९० विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता नागरिकांमध्ये ३०० भारतीय नागरिकांचा समावेश आहे.

पूरग्रस्त नेपाळमध्ये महाराष्ट्रातील तब्बल ११४ पर्यटक अडकल्याचा अंदाज असून, त्यापैकी ५३ पर्यटक पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती गुरुवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली. राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, ‘रिचा टुअर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून सुमारे ६१ पर्यटक नेपाळमध्ये गेले होते, तर उर्वरित नागरिक व्यक्तिगत पातळीवर प्रवास करत होते. अडकलेल्या ११४ पर्यटकांपैकी ‘सागा मानसरोवर’ भागात असलेले ५३ पर्यटक सुरक्षित आहेत.

जलविद्युत प्रकल्प ठप्प

पूरग्रस्त भागांतून बचाव पथकांनी आणखी काही मृतदेह बाहेर काढल्यानंतर या भीषण जीवितहानीची पुष्टी नेपाळ पोलिसांकडून करण्यात आली. पुराच्या प्रचंड वेगाने अनेक गावे आणि शहरे वाहून गेली, महत्त्वाचे पूल उद्ध्वस्त झाले, तसेच सुमारे डझनभर जलविद्युत प्रकल्प ठप्प झाले आहेत. एकट्या चितवन जिल्ह्यातून सर्वाधिक १३२ मृतदेह हाती आले आहेत. रसुवा आणि आसपासच्या भागातून वाहणाऱ्या त्रिशुली आणि नारायणी नदी प्रणालीला आलेल्या या पुरामुळे जलविद्युत प्रकल्प, निवासी भाग, रस्ते व पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान झाले आहे. हा महापूर हिमनदीचा भाग कोसळल्यामुळे किंवा बर्फ-डोंगराचा कडा खचल्यामुळे आला असण्याची शक्यता आहे. हिमखंड कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात बर्फ, दगड आणि मातीचा ढिगारा ल्हेंडे नदीत साचला. त्यानंतर हा नैसर्गिक बंधारा फुटल्याने पाण्याचा प्रचंड लोट खालील दिशेने कोसळला आणि भोटे कोशी व त्रिशुली नदी पात्रात महापूर आला.

गंडक नदीत ३ मृतदेह

नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापूराच्या आणि ढगफुटीच्या तडाख्यानंतर वाहून आलेले ३ मृतदेह उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातून गंडक नदीत आढळून आले आहेत. यामध्ये दोन महिलांच्या मृतदेहांचा समावेश असून, गुरुवारी सशस्त्र सीमा बलाच्या जवानांनी हे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढले. गंडक नदीतील पाण्याच्या वेगावर आणि आसपासच्या भागावर देखरेख ठेवत असताना एसएसबीच्या शोध व बचाव पथकाला महापूराच्या तीव्र प्रवाहात हे मृतदेह वाहून जाताना दिसले. जवानांनी तात्काळ मोटरबोटीच्या साहाय्याने नदीत उतरून तिन्ही मृतदेह बाहेर काढले आणि पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा मुख्यालयाच्या शवगृहात पाठवले. मृत व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांची ओळख पटवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. मृतदेहांचे नातेवाईक आणि वारसांचा शोध घेण्यासाठी एसएसबी व स्थानिक जिल्हा प्रशासन नेपाळमधील संबंधित अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे.

रुग्णालयांबाहेर शेकडो नागरिकांची गर्दी

या नैसर्गिक आपत्तीत बेपत्ता झालेल्या आपल्या नातेवाईकांचा आणि मित्रांचा शोध घेण्यासाठी गुरुवारी शेकडो नागरिकांनी विविध रुग्णालयांबाहेर मोठी गर्दी केली. महाराजगंज येथील त्रिभुवन युनिव्हर्सिटी टीचिंग हॉस्पिटलबाहेर शेकडो लोक आपल्या आप्तजनांच्या शोधासाठी जमले होते. रसुवासह मध्य नेपाळच्या अनेक भागांत बुधवारी आलेल्या पुराच्या प्रचंड प्रवाहात अनेक जण वाहून गेले असून, तेव्हापासून त्यांचा कोणताही संपर्क झालेला नाही. रुग्णालयाबाहेर जमलेल्या नागरिकांच्या हातात आपल्या बेपत्ता नातेवाईकांची छायाचित्रे, पत्ते आणि मोबाईल नंबर असलेले फलक दिसून आले. हे फोटो दाखवून लोक आपल्या आप्तजनांचा सुगावा लावण्यासाठी प्रशासनाला व इतरांना मदतीचे आवाहन करत आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून रुग्णालयात दाखल केलेल्या तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांची यादी बाहेर लावण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिकांना आपल्या नातेवाईकांची माहिती मिळू शकेल. याशिवाय, या भीषण दुर्घटनेत प्राण गमावलेल्या दुर्दैवी मृतांची छायाचित्रेही ओळख पटवण्यासाठी रुग्णालयाच्या परिसरात प्रदर्शित करण्यात आली आहेत.

भारताकडून मदतीचा दुसरा हप्ता रवाना

पूर आणि भूस्खलनाने हाहाकार माजवलेल्या नेपाळच्या मदतीसाठी भारताने गुरुवारी हवाई दलाच्या विशेष विमानातून ३७.५ टन मदत सामग्रीचा दुसरा हप्ता रवाना केला. यापूर्वी बुधवारी भारताने १० टन आपत्कालीन मदत सामग्री पाठवली होती. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सोशल मीडियावर याविषयी माहिती दिली. ३७.५ टन आपत्कालीन मदत सामग्री, आवश्यक औषधे आणि अन्नाची पाकिटे घेऊन दुसरे विमान नेपाळसाठी रवाना झाले आहे. भारत नेपाळी प्रशासनाच्या सतत संपर्कात असून या कठीण काळात मदतकार्यात सर्वतोपरी सहकार्य करत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी फोनवर चर्चा करून या संकटाच्या काळात भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर तातडीने ही मदत पाठवण्यात आली. भारताकडून पाठवण्यात आलेल्या या साहित्यामध्ये तात्पुरते निवारे, ब्लँकेट्स, आरोग्य आणि स्वच्छतेचे किट्स, सोलर दिवे आणि आवश्यक औषधांचा समावेश आहे. येत्या काही दिवसांत भारत आणखी मदत साहित्य नेपाळला पाठवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

२१ भारतीयांना वाचवले

कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या तमिळनाडूतील २१ भारतीय नागरिकांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे, अशी माहिती केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत सुटका करण्यात आलेल्या या २१ भारतीयांची यादी प्रसिद्ध केली. उत्तर प्रदेश प्रशासनाने महाराजगंज आणि कुशीनगर जिल्ह्यांमध्ये 'हाय अलर्ट' जारी केला आहे. नेपाळमधून खाली वाहणाऱ्या गंडक नदीसह इतर जलस्रोतांच्या पाणीपातळीवर सतत देखरेख ठेवली जात आहे. उत्तर प्रदेश प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नद्यांवर सातत्याने लक्ष ठेवणे, संवेदनशील गावांना सतर्कतेचा इशारा देणे आणि आपत्कालीन बचाव व मदत पथकांना सज्ज ठेवण्यावर भर दिला जात आहे.

हेल्पलाइन क्रमांक

आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, नेपाळमध्ये अडकलेल्या आपल्या नातेवाईकांची किंवा परिचित व्यक्तींची माहिती प्रशासनाकडे त्वरित नोंदवावी. यासाठी विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आला असून हेल्पलाइन/व्हॉट्सॲप क्रमांक: ९३२१५८७१४३, टोल-फ्री क्रमांक: १०७०, कंट्रोल रूम: ०२२-२२०२७९९० ईमेल: controlroom@ maharashtra.gov.in यावर संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महाराष्ट्राच्या प्रश्नांना द्वेषपूर्ण सरकारी उत्तर

Narali Purnima 2026 Wishes : नारळी पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा! प्रियजनांसोबत शेअर करा मराठी Quotes आणि HD कार्ड्स

Raksha Bandhan 2026 Wishes : राखीच्या धाग्यात प्रेमाची वीण! भावा-बहिणीला पाठवा खास मराठी शुभेच्छा संदेश आणि आकर्षक कार्डस्

Raksha Bandhan 2026 : यंदा रक्षाबंधनाचे ३ शुभ मुहूर्त! जाणून घ्या राखी बांधण्याची योग्य वेळ आणि पूजा पद्धत

नारळी पौर्णिमेला असा बनवा खमंग नारळी भात; सुटसुटीत होण्यासाठी 'या' टिप्स नक्की लक्षात ठेवा