प्रातिनिधिक छायाचित्र 
राष्ट्रीय

मोठा दिलासा! स्वस्त झाली 'ही' ३५ औषधे; डायबिटीज ते हार्ट पेशंट...अनेकांना होणार फायदा

देशातील आघाडीच्या औषध कंपन्यांकडून विकल्या जाणाऱ्या ३५ गरजेच्या औषधांच्या किंमतीत कपात झाली आहे. या निर्णयामुळे लाखो रुग्णांचा औषधांवरील नियमित खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

Krantee V. Kale

देशभरातील रुग्णांना औषधे परवडणाऱ्या दरांत उपलब्ध व्हावी यासाठी राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण म्हणजेच नॅशनल फार्मास्युटिकल्स प्राइसिंग अथॉरिटी (एनपीपीए) ने आघाडीच्या औषध कंपन्यांकडून विकल्या जाणाऱ्या ३५ गरजेच्या औषधांच्या किंमतीत कपात केली आहे. यामध्ये हृदयरोगापासून मधूमेहापर्यंतची महत्त्वाची औषधे समाविष्ट आहेत. केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाने एनपीपीएच्या किंमत नियमनाच्या आधारे हा आदेश अधिसूचित केला आहे. किंमतीतील कपातीमुळे ग्राहकांना, विशेषतः दीर्घकालीन आजार असलेल्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे लाखो रुग्णांचा औषधांवरील नियमित खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊया...

कोणती औषधे झाली स्वस्त?

रसायने आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी एनपीपीए ही देशातील औषधांच्या किमती निश्चित करणारी आणि त्यांचे निरीक्षण करणारी मुख्य संस्था आहे. एसिक्लोफेनॅक-पॅरासिटामोल-ट्रिप्सिन किमोट्रिप्सिन, अमोक्सिसिलिन आणि पोटॅशियम क्लॅव्हुलेनेट, एटोरवास्टॅटिन कॉम्बिनेशन आणि एम्पाग्लिफ्लोझिन सारखे नवीन ओरल एंटी-डायबिटिक कॉम्बिनेशन, सिटाग्लिप्टिन आणि मेटफॉर्मिन, यांसह आणि अन्य औषधे स्वस्त झाली आहेत.

आता किंमत किती? लहान मुले आणि गंभीर रुग्णांनाही दिलासा

डॉ. रेड्डीज लॅब्सने बाजारात आणलेली एसिक्लोफेनाक-पॅरासिटामोल-ट्रिप्सिन किमोट्रिप्सिन टॅब्लेट आता १३ रुपयांना उपलब्ध असेल, तर कॅडिला फार्मास्युटिकल्सची तीच टॅब्लेट १५.०१ रुपयांना उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांसाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या अ‍ॅटोरवास्टॅटिन ४० मिलीग्राम आणि क्लोपीडोग्रेल ७५ मिलीग्राम असलेल्या टॅब्लेटची किंमत आता २५.६१ रुपये झाली आहे. बालरोग वापरासाठी तोंडावाटे दिले जाणारे - सेफिक्सिम आणि पॅरासिटामोल कॉम्बिनेशनची किंमतही कमी झाली आहे. तसेच, व्हिटॅमिन डीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कोलेकॅल्सीफेरॉल ड्रॉप्स आणि वेदना व सूज यासाठी डायक्लोफेनाक इंजेक्शन (प्रति मिली ३१.७७ रुपये) सारख्या महत्त्वाच्या औषधांचाही समावेश आहे.

कंपन्यांसाठी कठोर नियम

अधिकृत आदेशानुसार सर्व किरकोळ विक्रेते आणि डीलर्सनी सुधारित दरयादी ठळकपणे ठळकपणे लावणे बंधनकारक आहे, जेणेकरून ग्राहकांना ती दिसेल. अधिसूचित दरांचे पालन न केल्यास, औषधे किंमत नियंत्रण आदेश २०१३ (DPCO) आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत दंडात्मक कारवाई होऊ शकते. यामध्ये जादा आकारलेली रक्कम व्याजासह वसूल करण्याची तरतूदही आहे. नवीन किंमती जीएसटीशिवाय निश्चित करण्यात आल्या आहेत आणि उत्पादक कंपन्यांना या किंमतींनुसार अपडेट केलेली यादी फॉर्म V मध्ये एकात्मिक औषधी डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली (Integrated Pharmaceutical Database Management System)वर अपलोड करावी लागेल. ही अधिसूचना लागू होताच, पूर्वी जारी केलेले सर्व जुने किंमत आदेश रद्द मानले जातील.

पार्किंगच्या वादातून अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या; CCTV फूटेज आले समोर; दोघांना अटक

रायगडमध्ये पालकमंत्रिपदाचा तिढा अद्यापही कायम; झेंडावंदन करण्यावरून राष्ट्रवादी-शिवसेनेत तू तू मैं मैं

यंदा नारळी पौर्णिमा, गौरी विसर्जनाची सुट्टी; अनंत चतुर्दशी, दहीहंडीची सुट्टी रद्द

सोन्याचा भाव विक्रमी ३,६०० रुपयांनी वाढला; सुरक्षित मालमत्तेतील गुंतवणुकीचा परिणाम

ED बदमाशासारखे काम करू शकत नाही! कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे; सुप्रीम कोर्टाने फटकारले