वाराणसी : स्मशान, मंदिर, पाणी हे सर्व हिंदूंसाठी एकच असायला हवेत. त्यासाठीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्य करत आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
वाराणसी येथे काशी विश्वनाथाचे दर्शन घेतल्यानंतर आयआयटी बीएचयूच्या जिमखाना मैदानात लागलेल्या संघाच्या शाखेत ते पोहचले. त्यावेळी त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली.
ते म्हणाले की, हिंदू समाजाचे सर्व पंथ, जाती एकत्रित यायला हवेत ही संघाची कल्पना आहे. हिंदू समाजाला संघटित करण्याचा उद्देश संघाचा आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे होत आहेत, तर संघ काय करणार? असा प्रश्न आयआयटी बीएचयूच्या विद्यार्थ्याने त्यांना विचारला, त्यावर ते म्हणाले की, गेल्या १०० वर्षांपासून संघ जे काम करत आहे, तेच काम पुढेही चालू ठेवेल. भारतीय संस्कृती, भारतीय मूल्यांचे संरक्षण व त्यांच्या आदर्शांचा प्रचार व्हायला हवा. या मुद्द्यावर ते काय विचार करतात, हेही सरसंघचालकांनी जाणून घेतले.