राष्ट्रीय

ओएनजीसीचे हेलिकॉप्टर कोसळले, दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यु

ओएनजीसीच्या ‘सागर किरण’ तेल विहिरीवर उतरण्यापूर्वी ४ ते ५ मिनिटे आधी हे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले

वृत्तसंस्था

अरबी समुद्रात तेल विहिरीवर उतरण्यापूर्वीच ओएनजीसीचे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून ५ जणांना वाचवण्यात यश मिळाले आहे. मृतांमध्ये ओएनजीसीच्या तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे पवनहंसचे सिर्कोसी हे हेलिकॉप्टर नवीन असतानाही हा अपघात घडला.

ओएनजीसीच्या ‘सागर किरण’ तेल विहिरीवर उतरण्यापूर्वी ४ ते ५ मिनिटे आधी हे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले. सकाळी ११.४५ वाजता ही घटना घडली. यातील नऊ जणांना बचावकर्त्यांनी बाहेर काढले. मात्र, त्यातील चौघे बेशुद्ध झाले. त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. ही दुर्घटना घडल्यानंतर ओएनजीसी, नौदल व तटरक्षक दलाने तातडीने बचाव मोहीम राबवली.

माईलस्टोन एव्हिएशन ग्रुपकडून पवनहंसने सहा ‘सिर्कोसी एस-७६ डी’ ही हेलिकॉप्टर भाड्याने घेतली होती. या दुर्घटनेचे कारण समजू शकले नाही. मात्र, खवळलेला समुद्र व खराब हवामानामुळे ही घटना घडली असावी. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ओएनजीसीने चौकशी समिती नेमली आहे. केंद्र सरकारच्या ‘डीजीसीए’कडूनही स्वतंत्र चौकशीच्या आदेशाची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जुहूच्या हेलिपॅडवरून या हेलिकॉप्टरने नियमित उड्डाण केले. तेल विहिरीपासून १ ते १.५ किमी अंतरावर असताना ते कोसळले. सर्व जण फ्लोटर्सच्या सहाय्याने समुद्रात तरंगत होते. ‘सागर किरण’ विहिरीवरील हायस्पीड बोटींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ९० ते १०० मिनिटात सर्वांना बाहेर काढले. दरम्यान, आपत्तीत मदत करणारे बहुउद्देशीय जहाज घटनास्थळी दाखल झाले असून हेलिकॉप्टरचे अवशेष ते गोळा करत आहे. यासाठी पाणबुड्यांची मदत घेतली जात आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव