Raigad : सनरूफने घेतला जीव! ताम्हिणी घाटात भीषण अपघात; दगड डोक्यात आदळल्याने कारमधील महिलेचा मृत्यू

ताम्हिणी घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरड आणि दगड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी ताम्हिणी घाटात एक हृदयद्रावक अपघात घडला.
Raigad : सनरूफने घेतला जीव! ताम्हिणी घाटात भीषण अपघात; दगड डोक्यात आदळल्याने कारमधील महिलेचा मृत्यू
Published on

ताम्हिणी घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरड आणि दगड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी ताम्हिणी घाटात एक हृदयद्रावक अपघात घडला. पुण्याहून माणगावकडे जात असलेल्या एका कारवर डोंगरावरून पडलेला दगड थेट कारच्या सनरूफमधून आत घुसल्याने कारमधील महिलेचा जागीच मृत्यू झाला.

मृत महिलेचे नाव स्नेहल गुजराती (वय ४२) असे असून, त्या आपल्या कुटुंबासह प्रवास करत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, घाटात त्या वेळेस जोरदार पाऊस सुरू होता. अचानक डोंगरकड्यावरून काही दगड खाली पडले. काही दगड कारच्या टपावर आदळले, मात्र एका मोठ्या दगडाने थेट सनरूफची काच फोडून आत प्रवेश केला. हा दगड थेट स्नेहल यांच्या डोक्यात आदळला. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. या गंभीर जखमेमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर कारमधील त्यांचे पती आणि मुलगा किरकोळ जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. परंतु, रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच स्नेहल यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलेे.

या घटनेनंतर रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने तात्काळ त्या भागातील रस्त्यांची पाहणी व सुरक्षा उपाययोजनांचे आदेश दिले आहेत. ताम्हिणी घाट परिसरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरकड्यांवर साचलेली माती आणि सैल दगड घसरत आहेत. यामुळे प्रशासनाने नागरिकांना 'अत्यावश्यक कारणाशिवाय घाटमार्गावरून प्रवास करू नये' असे आवाहन केले आहे.

सनरूफचे आकर्षण की धोका?

गेल्या काही वर्षांत कार खरेदी करताना 'सनरूफ' हे फीचर ग्राहकांना आकर्षित करणारे ठरत आहे. परंतु तज्ञांच्या मते, भारतीय हवामान आणि रस्त्यांच्या परिस्थितीसाठी हे वैशिष्ट्य अनेकदा धोकादायक ठरते. परदेशात थंड हवामानात सूर्यप्रकाश अंगावर घेण्यासाठी सनरूफचा उपयोग केला जातो, मात्र भारतात त्याचा वापर प्रामुख्याने मुलांना बाहेर डोकावण्यासाठी किंवा हवा घेण्यासाठी होतो ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो.

logo
marathi.freepressjournal.in