सट्टेबाजीमुळेच कांद्याची दरवाढ - केंद्राचा दावा; किरकोळ दरात ५९ टक्क्यांची वाढ, सरकारचा 'कांदा एक्स्प्रेस'चा धडाका प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

सट्टेबाजीमुळेच कांद्याची दरवाढ - केंद्राचा दावा; किरकोळ दरात ५९ टक्क्यांची वाढ, सरकारचा 'कांदा एक्स्प्रेस'चा धडाका

नाशिकच्या बाजारातील कांद्याचे दर सध्या दिल्लीपेक्षा अधिक असून बाजारातील साठेबाजी आणि सट्टेबाजीमुळेच हे घडत असावे, असे मत केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी सोमवारी व्यक्त केले...

Swapnil S

नवी दिल्ली : नाशिकच्या बाजारातील कांद्याचे दर सध्या दिल्लीपेक्षा अधिक असून बाजारातील साठेबाजी आणि सट्टेबाजीमुळेच हे घडत असावे, असे मत केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी सोमवारी व्यक्त केले. प्रमुख शहरांमध्ये सोमवारी कांद्याचा किरकोळ दर चेन्नईत ६० रुपये, दिल्लीत ५५ रुपये आणि कोलकात्यात ५३ रुपये प्रतिकिलो होता.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील कांद्याचा सरासरी किरकोळ दर २४ ऑगस्ट रोजी प्रतिकिलो ४३.५३ रुपये झाला. गेल्या वर्षी याच दिवशी तो २७.३७ रुपये होता. म्हणजेच किरकोळ दरात तब्बल ५९ टक्क्यांची वाढ झाली आहे.

दरम्यान, कांद्याच्या दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील नाशिक येथून देशातील प्रमुख बाजारपेठांकडे रेल्वेच्या विशेष रेकमधून मोठ्या प्रमाणात कांदा पाठवण्यास सुरुवात केली आहे. ‘कांदा एक्स्प्रेस’च्या माध्यमातून सध्याची दरवाढ रोखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असेही खरे यांनी नमूद केले.

पाच शहरांना पुरवठा

“सुरुवातीला चेन्नई, मदुराई, दिल्ली, एर्नाकुलम आणि गुवाहाटी या पाच प्रमुख कांदा-वापर केंद्रांना पुरवठा केला जाईल. बाजारातील परिस्थितीनुसार पुढील काळात अन्य ठिकाणांचाही समावेश केला जाईल,” असे निधी खरे यांनी सांगितले. नाशिकहून रेल्वे रेकमध्ये भरला जात असलेला कांदा बुधवारी संबंधित केंद्रांवर पोहोचण्याची अपेक्षा आहे.

नाफेड व अन्य संस्थांच्या माध्यमातून किरकोळ बाजारात हा कांदा ३५ रुपये प्रतिकिलो दराने विकला जाणार आहे. सरकार कांद्याच्या दरावर बारकाईने लक्ष ठेवून असून, गरज भासल्यास आणखी उपाययोजना केल्या जातील, असे खरे यांनी स्पष्ट केले.

१.२१ लाख टन बफर साठा

चालू वर्षासाठी केंद्र सरकारकडे १.२१ लाख टन कांद्याचा बफर साठा असून देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी तो पुरेसा असल्याचे सरकारने म्हटले आहे. दरांमध्ये मोठी वाढ झाल्यास हा साठा टप्प्याटप्प्याने बाजारात आणला जातो. २०२५-२६ मध्ये देशातील कांदा उत्पादन ३०७.३७ लाख टन राहण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी उत्पादन ३०७.६७ लाख टन होते. त्यामुळे उत्पादन जवळपास स्थिर राहण्याची शक्यता आहे.

दरवर्षीच होते वाढ

दरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कांद्याच्या दरात वाढ होण्याचा कल दिसतो. सणासुदीची मागणी, हवामानातील बदल, पुरवठा साखळीतील अडथळे आणि मागणीतील बदल यामुळे कांद्याच्या दरांमध्ये चढ-उतार होतात.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिवाळीपर्यंत साखरेची ‘शंभरी’? ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना दरवाढीचा फटका

Mumbai : रिक्षा बंदचा फटका! मराठी सक्तीबाबत अफवा, 'रास्ता रोको'; पश्चिम उपनगरांत प्रवाशांची गैरसोय

दिमागी नक्षलींचे कुळ आणि मूळ

आजचे राशिभविष्य, २५ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

लहानपणीचा खेळ, मोठेपणीचा फिटनेस मंत्र; दोरी उड्यांचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का?