गुजरातमधील पानोली रेल्वे स्थानकावर मोबाईल हिसकावण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या ट्रेनच्या दरवाजाजवळ बसलेल्या प्रवाशाच्या हातातील मोबाईल एका व्यक्तीने हिसकावला, यावेळी तोल गेल्याने प्रवासी ट्रेनमधून खाली पडला. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचा थरार रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना गुरुवारी (दि.६) गुजरातमधील अंकलेश्वर येथील पानोली रेल्वे स्थानकावर घडली. मृत प्रवाशाचे नाव अशोक गुर्जर (३२) असून, तो मूळचा राजस्थानचा रहिवासी होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो रिक्षाचालक म्हणून काम करत होता. त्यादिवशी अशोक जयपूर-वांद्रे सुपरफास्ट एक्स्प्रेसने (१२९८०) सवाई माधोपूर येथून सुरतकडे प्रवास करत होता.
बाकावर बसलेला व्यक्ती अचानक उठला अन्...
समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, अशोक ट्रेनच्या जनरल डब्याच्या दरवाजाजवळ बसला होता. ट्रेन पानोली रेल्वे स्थानकातून जात असताना फलाटावरील बाकावर बसलेला एक व्यक्ती अचानक उठला. त्याने धावत्या ट्रेनच्या दिशेने धाव घेतली आणि अशोकच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे अशोकचा तोल गेला. फुटेजमध्ये तो काही काळ डब्याला धरून लटकताना दिसतो. मात्र, काही क्षणांत त्याची पकड सुटली आणि तो फलाटावर कोसळला.
उपचारादरम्यान मृत्यू
धावत्या ट्रेनमधून पडल्याने अशोक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षा चालवणाऱ्या ३२ वर्षीय अशोकचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
CCTVच्या आधारे आरोपीचा शोध
या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पानोली रेल्वे स्थानकासह आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. मोबाईल हिसकावल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीची ओळख पटवून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच अशोक नेमका कोणत्या परिस्थितीत ट्रेनमधून पडला, याचाही तपास रेल्वे पोलिसांकडून केला जात आहे.