नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला लक्षणीय यश मिळून सभागृहात विरोधी पक्षांना अधिक बळ मिळाल्याने सोमवारपासून सुरू होणाऱ्या १८ व्या लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची कसोटी लागणार आहे. लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांची निवड आणि नीट परीक्षेतील अनियमितता या प्रश्नांचे तीव्र पडसाद पहिल्याच अधिवेशनात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सोमवारी शपथविधी होणार असून २६ जून रोजी अध्यक्षांची निवड केली जाणार आहे, तर २७ जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दोन्ही सभागृहांसमोर संयुक्त अभिभाषण होणार आहे. सोमवारी राष्ट्रपती भवनात भाजपचे ज्येष्ठ नेते भर्तृहारी माहताब यांना मुर्मू या हंगामी अध्यक्षपदाची शपथ देणार आहेत.
काँग्रेसचे नेते के. सुरेश हे ज्येष्ठ सदस्य असल्याने त्यांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करावयास हवी होती, असा दावा काँग्रेसने केला आहे. तर माहताब हे सलग आठ वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. के. सुरेश हे १९९८ आणि २००४ च्या निवडणुकीत पराभूत झाले होते, असे भाजपने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे हंगामी अध्यक्षांच्या निवडीवरून सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रपतींनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिल्यानंतर माहताब संसदेत जाऊन लोकसभेचे कामकाज सुरू करणार आहेत. त्यानंतर लोकसभेचे सरचिटणीस उत्पलकुमार सिंह हे नवनिर्वाचित सदस्यांची यादी सभागृहासमोर ठेवणार आहेत. माहताब हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेण्यास निमंत्रित करतील. या शपथविधीनंतर माहताब अध्यक्षांच्या मंडळातील सदस्यांना शपथ घेण्यासाठी पाचारण करतील. त्यानंतर मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी होणार असून त्यापाठोपाठ दोन दिवस देशातील नव्या खासदारांचा शपथविधी होणार आहे.
राष्ट्रपतींचे अभिभाषण २७ जून रोजी होणार असून २८ जून रोजी अभिभाषणावरील आभार व्यक्त करण्यासाठी चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २ अथवा ३ जुलै रोजी चर्चेला उत्तर देण्याची शक्यता आहे.