नवी दिल्ली : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अपेक्षेप्रमाणे विशेष मतदार याद्यांच्या फेरतपासणीच्या मुद्द्यावरून (एसआयआर) हंगामा पाहायला मिळाला. विशेष मतदार यादी फेरतपासणीच्या विषयावरील चर्चेच्या विरोधकांच्या मागणीमुळे लोकसभेचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागले, तर राज्यसभेत विरोधकांनी सभात्याग केला. या विषयावर चर्चा घेण्यास हरकत नाही, पण त्यासाठी ठराविक वेळमर्यादा निश्चित करता येणार नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली.
लोकसभेत गोंधळाच्या वातावरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन नवी विधेयके सादर केली, ज्यामध्ये तंबाखू, पान मसाला यांसारख्या ‘सिन गुड्स’वरील सेसची पुनर्रचना आणि उपयोग यांचा समावेश आहे. जीएसटी नुकसानभरपाई सेस हळूहळू बंद होणार असल्याने ही विधेयके आणण्यात आली आहेत.
राज्यसभेत संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकारला ‘एसआयआर’ किंवा निवडणूक सुधारणा यावर चर्चा घेण्यास अजिबात हरकत नसल्याचे सांगितले, मात्र विरोधकांनी तत्काळ चर्चा घेण्याचा हट्ट करू नये, असे आवाहन केले. विरोधकांनी तत्काळ चर्चेचा हट्ट धरल्याने अनेक पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला. राज्यसभा सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी ‘एसआयआर’सह विविध मुद्द्यांवरील विरोधकांच्या नऊ नोटिसा फेटाळल्याने सभागृहात विरोधकांनी निदर्शने केली होती.
‘श्वाना’वरून टोलेबाजी
याचदरम्यान, काँग्रेस खासदार रेनुका चौधरी यांनी त्यांच्या कारमध्ये बचाव केलेल्या एका भटक्या कुत्र्याला घेऊन संसदेत आल्याने वाद निर्माण झाला. काही सत्ताधारी खासदारांनी त्यावर ‘ड्रामा’ असल्याचा आरोप केला. त्यावर चौधरी यांनी प्रत्युत्तर देताना “आत बसलेले चावतात, कुत्रे नाही” असे वक्तव्य केले. त्या म्हणाल्या की सकाळीच त्यांनी तो भटका कुत्रा उचलला आणि त्याला पशुवैद्याकडे नेण्याच्या तयारीत होत्या. सरकारला प्राण्यांची आवड नाही, असेही त्यांनी टोला लगावला.
पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका
सत्र सुरू होण्यापूर्वी संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली. त्यांनी संसदेला निवडणुकांसाठी “वॉर्म-अप अरेना” किंवा पराभवानंतरची निराशा व्यक्त करण्याचे व्यासपीठ बनवल्याचा आरोप केला आणि राजकारणात सकारात्मकता आणण्यासाठी टिप्स देण्याचीही तयारी त्यांनी व्यक्त केली. संसद ही “नाटकासाठी नव्हे, तर डिलिव्हरीसाठी” आहे, असेही मोदी म्हणाले.
धनखड यांच्या राजीनाम्याचे पडसाद
विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सभापतींचे स्वागत केले, मात्र माजी सभापती धनखड यांच्या “अचानक आणि अनपेक्षित” राजीनाम्याचा उल्लेख करताच सत्तापक्षातील खासदारांनी नाराजी व्यक्त केली. खर्गे यांनी दोन्ही बाजूंमध्ये संतुलन राखावे आणि विरोधकांनाही आपले मुद्दे मांडण्यास पुरेशी संधी द्यावी, अशी सभापतींनी विनंती केली.