नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच एसआयआरवर त्वरित चर्चा घेण्याच्या मागणीवर ठाम राहिलेल्या विरोधी पक्षांना केंद्र सरकारने अखेर राजी केले असून आता या विषयावर येत्या ९ डिसेंबर रोजी लोकसभेत १० तास चर्चा होणार आहे, तर त्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर रोजी वंदे मातरम् वर १० तास चर्चा होणार आहे.
विरोधकांनी ‘मतचोर, सिंहासन सोडा’ अशा घोषणा देत दोन्ही सभागृहांचे कामकाज विस्कळीत केले. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन्ही पक्षांना चर्चेसाठी बोलाविले. तेव्हा बुधवारपासून सभागृहाचे कामकाज कोणत्याही गोंधळाशिवाय चालेल यावर एकमत झाले.
संसद संकुलातील मकर गेटसमोर सकाळी विरोधकांनी सलग दुसऱ्या दिवशी एसआयआरविरोधात निदर्शने केली. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेत सांगितले की, एसआयआर प्रक्रियेदरम्यान १२-१३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा एक तातडीचा विषय आहे, यावर त्वरित चर्चा झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
मीडिया रिपोर्टनुसार, वंदे मातरम् ला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सभागृहात सोमवारी वंदे मातरम् वर १० तास चर्चा करण्याचे ठरविण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: चर्चेला सुरुवात करणार आहेत.