Photo : ANI
राष्ट्रीय

गुन्हेगार जेलमध्ये असायला हवेत, सत्तेत नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा

गुन्हेगार, भ्रष्टाचारी जेलमध्ये असायला हवेत, सत्तेत नाहीत, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

Swapnil S

कोलकाता/गयाजी : गुन्हेगार, भ्रष्टाचारी जेलमध्ये असायला हवेत, सत्तेत नाहीत, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाटणा-बेगूसरायला जोडणाऱ्या औंटा-सिमरिया ६ मार्गिकांच्या केबल ब्रीजचे उद्घाटन झाले. गयाजीनंतर ते पाटणा जिल्ह्यातील औंटा येथे गेले. तसेच कोलकात्यात त्यांनी सभा घेतली.

मोदी म्हणाले की, घुसखोरांची वाढती संख्या देशासाठी चिंतेचा विषय आहे. देशाचे भविष्य घुसखोरांना ठरवू देणार नाही. बिहारमधील तरुणांच्या नोकऱ्या घुसखोरांना घेऊ देणार नाही.

सीमावर्ती भागातील लोकसंख्येत बदल होत आहे. काँग्रेस, राजद हे पक्ष बिहारच्या गरीबांच्या हक्काच्या बाबी घुसखोरांना देऊ इच्छितात. मतपेटी व तुष्टीकरणासाठी हे सर्व केले जात आहे. त्यांना बिहारची कोणतीही पर्वा नाही. आम्हाला काँग्रेस व राजदच्या वाईट नजरेतून बिहारला वाचवायचे आहे, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, आमच्या सरकारवर अनेक वर्षे भ्रष्टाचाराचा कोणताही डाग लागलेला नाही. गेल्या ६५ वर्षांत काँग्रेसने किती भ्रष्टाचार केला हे देशातील जनता जाणते. तुरुंगातून फाइलवर स्वाक्षऱ्या केल्या जात होत्या. तुरुंगातून सरकारी आदेश निघत होते. नेत्यांची वागणूक अशीच राहिल्यास भ्रष्टाचाराविरोधातील लढाई कशी लढता येईल. त्यामुळे आम्ही नवीन कायदा आणला आहे. त्यात पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचा समावेश केला आहे. तक्रार केल्यानंतर ३० दिवसांत संबंधित व्यक्ती तुरुंगात राहिल्यास त्याला पद सोडावे लागेल. तुरुंगातून सत्तेचे सुख भोगता येणार नाही. पण, काँग्रेस, राजद आणि डावे पक्ष या कायद्याला विरोध करत आहेत, असे ते म्हणाले.

पाकिस्तान आमचे वाकडे करू शकत नाही

मोदी म्हणाले की, मी बिहारच्या भूमीतून दहशतवाद्यांना धुळीला मिळवण्याची घोषणा केली होती. या भूमीतून केलेला संकल्प पूर्ण होतोच. हा संकल्प पूर्ण झाला हे सर्वांनी पाहिले. पाकिस्तानचे एकही क्षेपणास्त्र भारतापर्यंत पोहचू शकले नाही. पाकिस्तान आमचे काहीही वाकडे करू शकला नाही. दहशतवादी पाताळात लपले तरीही भारताची क्षेपणास्त्रे त्यांना दफन करतील, असे ते म्हणाले.

तृणमूल असेपर्यंत विकास होणार नाही!

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विकासकामे करणे मोठे आव्हान आहे. कारण आम्ही पश्चिम बंगालसाठी जे पैसे राज्य सरकारला पाठवतो, त्यातील बहुतांशी हिस्सा लुटला जातो. यातील बहुतेक पैसे तृणमूलच्या नेत्यांवर खर्च होतो. जोपर्यंत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आहे, तोपर्यंत राज्याचा विकास होणार नाही, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. कोलकाता मेट्रोच्या तीन नवीन मार्गिकांचे उद‌्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले की, तृणमूल काँग्रेसचे नेते विकास निधीवर डल्ला मारत असल्याने गरीब कल्याणाच्या अनेक योजनांमध्ये पश्चिम बंगाल अन्य राज्यांपेक्षा मागे आहे. गुन्हे व भ्रष्टाचार हीच तृणमूल काँग्रेसची ओळख बनली आहे. राज्यात तृणमूल काँग्रेसचे सरकार सत्तेवर असेपर्यंत कोणताही विकास होणार नाही. जेव्हा तृणमूल सत्तेवरून जाईल, तेव्हाच पश्चिम बंगालचा विकास होईल. गुन्हे व भ्रष्टाचारी व्यक्तींची जागा सत्तेत नाही तर तुरुंगात असली पाहिजे, असे मोदी म्हणाले.

कर्नाटकमध्ये काँग्रेस आमदार ED च्या रडारवर! के.सी. वीरेंद्र सिक्कीममधून अटकेत; गोव्यात पाच कॅसिनो अन् कोट्यवधी रुपयांची उलाढाल

धक्कादायक! मुंबई-कुशीनगर एक्स्प्रेसच्या बाथरूममध्ये आढळला चिमुकलीचा मृतदेह

अनिल अंबानी यांच्या निवासस्थानी CBI चा छापा; १७ हजार कोटींच्या बँक फसवणुकीची चौकशी

२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल सक्तीला सुप्रीम कोर्टात आव्हान

OBC त २९ नव्या जातींचा समावेश करण्याच्या हालचाली; राज्य मागासवर्ग आयोगाकडून प्रस्ताव; केंद्र सरकार घेणार अंतिम निर्णय