मुंबई : पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'चा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतरत्न सी. सुब्रमण्यम सभागृह, पुसा, नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे झाला. पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेत राज्यातील ९ जिल्ह्यांची निवड झाली असून केंद्राच्या व राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून तेथील शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने' च्या शुभारंभानिमित्त पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात कृषिमंत्री भरणे बोलत होते. केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शेतकरी सक्षम व्हावा यादृष्टीने काम करत आहे. यावर्षी जून ते सप्टेंबरपर्यंत राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला.. त्याच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकाचा चक्काचूर झाला.. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी त्या भागात दौरे करून शेतकऱ्यांचे दुःख, अडचणी जाणून घेतल्या. या शेतकरी बांधवांना उभे केले पाहिजे यादृष्टीने शासनाने चांगले पॅकेज जाहीर केले आहे.
दृष्टिकोन बदलला
कृषी योजनांच्या शुभारंभानंतर आपल्या भाषणात मोदी म्हणाले, देशाच्या स्वावलंबनासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी दोन महत्त्वाच्या नवीन योजना सुरू केल्या जात आहेत. शेती आणि शेतकरी हा नेहमीच आपल्या विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. बदलत्या काळासोबत सरकारने शेतीला पाठिंबा देणे आवश्यक आहे. दुर्दैवाने, मागील सरकारने शेतीला त्यांच्याच हाती सोपवले. सरकारकडे शेतीसाठी दूरदृष्टी किंवा दृष्टिकोनाचा अभाव होता, ज्यामुळे भारताची कृषी व्यवस्था कमकुवत होत राहिली. आम्ही आधीच्या सरकारांचा शेतीकडे असलेला निष्काळजीपणाचा दृष्टिकोन बदलला आहे, असे ते म्हणाले.
डाळींसाठी अभियान
मोदी पुढे म्हणाले, आज डाळींसाठी आत्मनिर्भर अभियान सुरू करण्यात आले आहे. हे केवळ डाळींचे उत्पादन वाढवण्याचे ध्येय नाही तर आपल्या भावी पिढ्यांना सक्षम बनवण्याचे ध्येय आहे. अलिकडच्या काळात देशात मोठ्या प्रमाणात डाळींची आयात करावी लागत असल्याने डाळींबाबत आत्मनिर्भर अभियान आवश्यक आहे.