राष्ट्रपती मुर्मू यांनी 'INS वाघशीर' पाणबुडीतून केला प्रवास छायाचित्र : X (rashtrapatibhvn)
राष्ट्रीय

राष्ट्रपती मुर्मू यांनी 'INS वाघशीर' पाणबुडीतून केला प्रवास

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी भारतीय नौदलातील स्वदेशी बनावटीची पाणबुडी 'आयएनएस वाघशीर'मधून प्रवास केला. पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या त्या भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी भारतीय नौदलातील स्वदेशी बनावटीची पाणबुडी 'आयएनएस वाघशीर'मधून प्रवास केला. पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या त्या भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. यापूर्वी फेब्रुवारी २००६ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी ‘आयएनएस सिंधू रक्षक’ पाणबुडीतून प्रवास केला होता.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सशस्त्र दलांच्या सर्वोच्च सेनापती असलेल्या राष्ट्रपती मुर्मू यांच्यासोबत नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी उपस्थित होते. नौदलाच्या कारवार येथील तळावरून हा प्रवास करण्यात आला.

नौदलाचा गणवेश परिधान केलेल्या राष्ट्रपती मुर्मू यांनी पाणबुडीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी नौदल कर्मचाऱ्यांना अभिवादन केले. त्यांनी ‘आयएनएस वाघशीर’च्या चालक दलाशी संवाद साधला आणि त्यांच्या समर्पणाचे कौतुक केले. स्वदेशी पाणबुडी ही भारतीय नौदलाच्या व्यावसायिक उत्कृष्टतेचे आणि लढाऊ सज्जतेचे उज्ज्वल उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपतींना भारताच्या सागरी रणनीतीत पाणबुडी दलाची भूमिका, त्यांची कार्यक्षमता तसेच राष्ट्रीय सागरी हितसंबंधांच्या संरक्षणातील योगदान याबाबत माहिती देण्यात आली.

शक्तिशाली पाणबुडी

‘आयएनएस वाघशीर’ ही पी-७५ स्कॉर्पिन प्रकल्पातील सहावी आणि अंतिम पाणबुडी असून, जानेवारीमध्ये ती नौदलात दाखल झाली. नौदल अधिकाऱ्यांच्या मते, ही जगातील बहुपयोगी डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांपैकी एक आहे. ही पाणबुडी पृष्ठभागावरील युद्ध, पाणबुडीविरोधी युद्ध, गुप्तचर माहिती संकलन, क्षेत्रीय देखरेख आणि विशेष मोहिमा अशा विविध कार्यांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. टॉर्पेडो, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि प्रगत सोनार प्रणालींनी सुसज्ज असलेल्या या पाणबुडीमध्ये मॉड्युलर बांधकाम पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. भविष्यात ‘एअर इंडिपेंडंट प्रोपल्शन’ (एआयपी) तंत्रज्ञानाच्या समावेशासारख्या सुधारणा करण्याची या पाणबुडीची क्षमता आहे.

जयपूरमध्ये शाळेच्या पाहणीदरम्यान CJP कार्यकर्त्यांवर हल्ला; धक्काबुक्की अन् गाड्यांची तोडफोड, Video व्हायरल

Mumbai : कुर्ल्यात पहाटे मोठी दुर्घटना! क्रेनचा भाग झोपड्यांवर कोसळला; ३ महिन्यांच्या बाळासह १० जण जखमी, VIDEO

Mumbai : रेल्वे स्थानकावरील एस्केलेटर दोन मिनिटांत सुरू होणार; पश्चिम रेल्वेच्या नवीन व्यवस्थेमुळे खंडित वेळ होणार कमी

'आम्ही Gen Z...' म्हणत सैनिकांशी वाद घालणाऱ्या 'त्या' तरुणीने मागितली माफी; म्हणाली, "रागाच्या भरात चुकीचे बोलले"

७०२ कोटींचा प्रस्ताव मंजूर; सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते वरळी प्रॉमेनेड जोडणाऱ्या पादचारी पुलाचा मार्ग मोकळा