सुलतानपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २०१८ मधील एका मानहानी प्रकरणात सुलतानपूरच्या विशेष न्यायालयाने सोमवारी निर्दोष मुक्त केले आहे. तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात केलेल्या विधानावरून हा खटला दाखल करण्यात आला होता.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधी हे सुनावणीच्या वेळी न्यायालयात स्वतः उपस्थित होते. तक्रारदार विजय मिश्रा यांचे वकील संतोष पांडे यांनी राहुल गांधींच्या निर्दोष मुक्ततेची पुष्टी केली आहे. न्यायालयाने हा निकाल देताना ही टिप्पणी केली की, हे विधान मानहानीकारक नव्हते आणि तक्रारदार विजय मिश्रा हे या प्रकरणात 'बाधित व्यक्ती' ठरत नाहीत. दरम्यान, या निकालाचा अभ्यास करून उच्च न्यायालयात किंवा वरिष्ठ न्यायालयात आव्हान देणार असल्याचे वकिलांनी सांगितले आहे.
बंगळुरूत शहांविरोधात केली होती विधाने
कर्नाटक विधानसभेच्या २०१८ च्या निवडणुकीपूर्वी बंगळुरू येथील एका रॅलीत राहुल गांधी यांनी अमित शहा यांच्याविरोधात काही विधाने केली होती. या विधानावरून सुलतानपूरचे स्थानिक भाजप नेते आणि जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विजय मिश्रा यांनी ४ ऑगस्ट २०१८ रोजी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणी राहुल गांधी २०२३ मध्ये न्यायालयात हजर झाले होते आणि त्यांनी जामीन मिळवला होता.
भाजपवर काँग्रेसची टीका
नवी दिल्ली : सुलतानपूर येथील विशेष न्यायालयाने मानहानीच्या एका खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची निर्दोष सुटका केल्यानंतर, काँग्रेस पक्षाने सोमवारी भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार हल्लाबोल केला. भाजप हा 'गुन्हेगारांनी चालवलेला पक्ष' आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच, गांधीवादी मार्गाने लढा देऊन प्रेम, करुणा आणि जिद्दीच्या बळावर भाजपचा पराभव करू, असा निर्धार विरोधी पक्षाने व्यक्त केला आहे.
कार्यकर्त्यांचा जल्लोष
निकालाची माहिती बाहेर येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या बाहेर ढोल-ताशांच्या गजरात, मिठाई वाटून आणि 'सत्यमेव जयते'च्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला. राहुल गांधी न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडताच कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.