नवी दिल्ली : टाटा समूहाचे ‘गुन्हेगारी पद्धतीने खच्चीकरण व विध्वंस केला जात असून यावर कोणताही व्यावसायिक बोलायला तयार नाही’, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. तसेच, ‘आम्ही या गुन्ह्यांसाठी नक्की न्याय मिळवून देऊ,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. टाटा समूहातील वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यात बुधवारी ‘एक्स’वर जोरदार खडाजंगी झाली.
राहुल गांधी यांनी टाटा सन्सच्या नेतृत्वावरून सुरू असलेल्या अंतर्गत वादाच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. या वादामुळे ‘टाटा ट्रस्ट’चे विश्वस्त दोन गटांत विभागले गेले असून, हा वाद टाटा सन्सच्या बोर्डरूमपर्यंत पोहोचला आहे. 'एक्स'वरील आपल्या पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले, ‘टाटा समूहाचा गुन्हेगारी पद्धतीने विध्वंस केला जात आहे, आणि एकही व्यावसायिक त्यावर ब्र उच्चारण्यास तयार नाही. तुम्ही किती दिवस गप्प बसणार, जोपर्यंत ते तुम्हाला पूर्णपणे विकत घेत नाहीत तोपर्यंत? असा सवाल त्यांनी केला. भारतीय व्यवसाय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची खेळणी नाही, असे सांगत ते पुढे म्हणाले, ‘तुमच्यात हिंमत नाही, पण आमच्यात आहे. आम्ही या गुन्ह्यांसाठी नक्की न्याय मिळवून देऊ’.
राजकारण करणे टाळा :निर्मला सीतारामन
दरम्यान, राहुल यांच्या या दाव्यांवर जोरदार आक्षेप घेत निर्मला सीतारामन यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. राहुल गांधी हे व्यावसायिक नेत्यांना आपल्यासोबत येऊन देशात अविश्वास आणि विषारी वातावरण पसरवण्यासाठी प्रवृत्त करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. तसेच प्रत्येक गोष्टीचे "राजकारण करणे"टाळावे, असा सल्लाही सीतारामन यांनी दिला आहे. उद्योग आणि उद्योजकांच्या यशावर राहुल गांधी सातत्याने टीका करत असल्याचा आरोप करत, नरेंद्र मोदी सरकार भारतीय उद्योगांना रोजगारनिर्माते आणि आर्थिक विकासाचे महत्त्वाचे चालक म्हणून मानते, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.