'विद्यार्थी, मूर्ख आणि अंधभक्त...'; राहुल गांधींच्या वक्तव्याने लोकसभेत गोंधळ, कामकाज काही काळ ठप्प 
राष्ट्रीय

'विद्यार्थी, मूर्ख आणि अंधभक्त...'; राहुल गांधींच्या वक्तव्याने लोकसभेत गोंधळ, कामकाज काही काळ ठप्प

पेपरफुटीविरोधी विधेयकावर चर्चा सुरू असताना राहुल गांधी यांनी देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे समर्थन केले.

किशोरी घायवट-उबाळे

नवी दिल्ली : पेपरफुटीविरोधी विधेयकावरील चर्चेदरम्यान लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका विद्यार्थिनीशी झालेला संवाद सांगितला. त्यावेळी त्यांनी "विद्यार्थी, मूर्ख आणि अंधभक्त" असा उल्लेख केल्याने बुधवारी (दि. २९) सभागृहात मोठा गदारोळ झाला. या वक्तव्यावर भाजप सदस्यांनी तीव्र आक्षेप घेत घोषणाबाजी केली, त्यामुळे काही काळ लोकसभेचे कामकाजही ठप्प झाले.

पेपरफुटीविरोधी विधेयकाच्या चर्चेत वाद

पेपरफुटीविरोधी विधेयकावर चर्चा सुरू असताना राहुल गांधी यांनी देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे समर्थन केले. हे आंदोलन रागाचे नसून विद्यार्थ्यांच्या आशा आणि अपेक्षांचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.

१८ वर्षांच्या विद्यार्थिनीशी झालेला संवाद

भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी नुकतीच एका १८ वर्षीय विद्यार्थिनीशी झालेली चर्चा सभागृहात सांगितली. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या विद्यार्थिनीने समाजातील लोकांचे विद्यार्थी, मूर्ख आणि अंधभक्त असे तीन गट केले होते.

राहुल गांधी म्हणाले, विद्यार्थिनीच्या मते विद्यार्थी म्हणजे सतत शिकण्याची इच्छा असलेली, इतरांचे ऐकणारी आणि नवीन ज्ञान स्वीकारणारी व्यक्ती. तर 'मूर्ख' म्हणजे स्वतःलाच सर्वकाही माहिती आहे असे समजणारी, इतरांचे मत न ऐकणारी आणि सत्यापेक्षा स्वतःची प्रतिमा जपण्यात अधिक रस असलेली व्यक्ती.

'अंधभक्त'वरून सभागृहात गदारोळ

यानंतर राहुल गांधी यांनी विद्यार्थिनीला "मग अंधभक्त कोण?" असा प्रश्न विचारल्याचे सांगितले. त्यावर विद्यार्थिनीने "जो दुसऱ्या एका मूर्खालाच देव मानतो, तो अंधभक्त," असे उत्तर दिल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.

हे वक्तव्य करताच भाजप सदस्यांनी जोरदार यावर आक्षेप घेतला. अनेक खासदारांनी आपल्या जागेवरून उठून घोषणाबाजी केली.

भाजपची वक्तव्य वगळण्याची मागणी

संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी यांनी वापरलेला "मूर्ख" हा शब्द संसदीय परंपरेला धरून नसल्याचा दावा करत तो कामकाजाच्या नोंदीतून वगळण्याची मागणी केली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही या मागणीचे समर्थन केले.

दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वारंवार सदस्यांना शांत राहण्याचे आणि चर्चेवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.

विद्यार्थी आंदोलनाचे राहुल गांधींकडून समर्थन

गोंधळ सुरू होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांना देशाच्या भवितव्याबाबत अधिक विश्वास वाटल्याचे सांगितले.

भाजपच्या नेत्यांनीही आपल्या मुलांशी या आंदोलनाबाबत चर्चा केली, तर त्यांनाही अशीच मते ऐकायला मिळतील, असे राहुल गांधी म्हणाले.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video

Mumbai : अंधेरीत साकारणार मीनाक्षी मंदिर; क्रांती गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

Mumbai : गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज; ३८३ कृत्रिम तलाव; १,१३२ जीवरक्षक तैनात

Mumbai : धोकादायक पुलांवर खबरदारी! गणेशोत्सवात सावधगिरीचे आवाहन; रेल्वे मार्गावरील पुलांचा समावेश

Mumbai : चेंबूरमध्ये चालत्या बेस्ट बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला, ४० प्रवासी बचावले