Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video

नारळ, नारळाची पाने, झावळ्या, नारळाचा काथ्या तसेच नारळापासून तयार होणाऱ्या विविध वस्तूंचा सजावटीमध्ये वापर करण्यात आला आहे.
Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video
Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video
Published on

मुंबईतील गणेशोत्सव म्हटलं की भव्य गणेशमूर्ती आणि आकर्षक सजावट डोळ्यांसमोर येते. मात्र, यंदा गिरगावातील एका ऐतिहासिक गणेश मंडळाने निसर्गाशी जोडणारी अनोखी संकल्पना साकारली आहे. जितेकरवाडी सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवासाठी नारळाला केंद्रस्थानी ठेवले आहे. विशेष म्हणजे, मंडळाचा गणेशोत्सव यंदा १३३व्या वर्षात पदार्पण करत आहे.

नारळापासून साकारला अनोखा बाप्पा

गिरगावातील चर्नी रोड पूर्व येथील डॉ. बाबासाहेब जयकर मार्गावर हे मंडळ आहे. यंदाच्या सजावटीत नारळाच्या झाडाचा विशेष वापर करण्यात आला आहे. नारळ, नारळाची पाने, झावळ्या, नारळाची काथ्या तसेच नारळापासून तयार होणाऱ्या विविध वस्तूंचा सजावटीमध्ये वापर करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण गणेशोत्सवाला निसर्गाशी जोडलेला खास लूक मिळाला आहे.

१० फुटांची आणि ५१ किलो वजनाची मूर्ती

नारळाला हिंदू संस्कृतीत 'श्रीफळ' म्हणजेच शुभ आणि पवित्र फळ मानले जाते. याच श्रीफळापासून प्रेरणा घेत मंडळाने यंदाच्या बाप्पाची संकल्पना साकारली आहे. मंडळाचे सचिव अजित पिटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाची गणेशमूर्ती १० फूट उंच असून तिचे वजन ५१ किलो आहे. मूर्तीच्या निर्मितीत नारळाचा विशेष वापर करण्यात आला आहे.

Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video
रुप गणेशाचे

मुंबईतील जुन्या गणेश मंडळांपैकी एक

जितेकरवाडी सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची स्थापना १८९४ मध्ये झाली. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या काळातील हे महत्त्वाचे मंडळ मानले जाते. १८९३ मध्ये केशवजी नाईक चाळीत मुंबईतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाल्यानंतर अवघ्या एका वर्षाने जितेकरवाडी मंडळाची सुरुवात झाली. त्यामुळे मुंबईतील जुन्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये या मंडळाचे विशेष स्थान आहे.

गणेशोत्सवात निसर्गाचा संदेश

शंभरहून अधिक वर्षांची परंपरा जपत मंडळाने यंदा पर्यावरण आणि निसर्गाशी जोडणारी संकल्पना मांडली आहे. नारळाच्या झाडाच्या विविध भागांचा सजावटीत वापर करून बाप्पाच्या उत्सवाला वेगळे रूप देण्यात आले आहे. त्यामुळे पारंपरिक श्रद्धा आणि निसर्ग यांचा सुंदर मेळ या गणेशोत्सवातून पाहायला मिळत आहे.

Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video
गणेशोत्सवात मुक्या प्राण्यांनाही स्थान; मुंबईतील मंडळांचा प्राणिप्रेमाचा उपक्रम

मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह

१४ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश चतुर्थीला मुंबईत गणरायाचे आगमन झाले असून शहरभर सार्वजनिक मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विविध मंडळांनी आकर्षक सजावट, देखावे आणि अनोख्या संकल्पनांमधून बाप्पाचे स्वागत केले आहे. त्यात गिरगावातील जितेकरवाडी मंडळाच्या नारळापासून साकारलेल्या बाप्पानेही लक्ष वेधून घेतले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in