नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसवर सडकून टीका केली. राहुल गांधी बालबुद्धीचे असल्याची मोदी यांनी खिल्ली उडविली आणि त्यांचे रडगाणे सोमवारीच सभागृहाने ऐकल्याचे ते म्हणाले. रालोआने गेल्या १० वर्षांत केलेली कामगिरी पाहून जनतेने आपल्या सरकारला स्थैर्य आणि सातत्यासाठी सलग तिसऱ्यांदा सत्ता बहाल केली, असे नरेंद्र मोदी यांनी उत्तर देताना स्पष्ट केले. हिंदू आणि हिंसाचार यांचा राहुल यांनी संबंध जोडला आणि लोकसभेत खोटे दावे केले, असा आरोपही मोदी यांनी केला व संसदीय लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी राहुल यांच्याविरुद्ध कडक कारवाईची मागणीही त्यांनी केली.
काँग्रेस आणि त्यांचे घटक पक्ष आम्ही एनडीएचा पराभव केला हे बिंबविण्यासाठी अहोरात्र काम करीत आहेत. खोट्या विजयोत्सवाने जनमत नाकारण्याचा प्रयत्न करू नका, कॉंग्रेसला केवळ ९९ जागा मिळाल्या असल्या तरी ते जिंकल्याचा आव आणत आहेत, मात्र काँग्रेस हा आता परजीवी पक्ष झाला आहे, असेही मोदी म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआचा पराभव केला असे सांगण्याचा काँग्रेसचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. ज्याने स्वत:ची चूक मान्य न करता सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला, अशा बालबुद्धीच्या व्यक्तीचे रडगाणे सभागृहाने सोमवारी ऐकले, असे मोदी म्हणाले.
काँग्रेस सलग तिसऱ्यांदा १०० हून अधिक जागा जिंकू शकलेली नाही, पराभव मान्य करण्याऐवजी ते अधिक उद्धट बनले आहेत, त्यांनी आमचा पराभव केला असे कथानक पसरविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, असे मोदी म्हणाले. मोदींच्या भाषणावेळी विरोधी पक्षांकडून सातत्याने घोषणाबाजी केली जात होती.
सहानुभूती मिळविण्यासाठी लोकसभेत नवे नाटक करण्यात आले. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात ते जामिनावर सुटले आहेत, ओबीसींना ज्यांनी चोर म्हटले आहे आणि सर्वोच्च न्यायालयाची त्यांना माफी मागावी लागली आहे, असेही मोदी यांनी गांधी यांच्यासंदर्भात सांगितले. शेतकऱ्यांसाठी किमान हमी भाव आणि अग्निवीर योजनेबाबत संसदेची दिशाभूल करण्याचे प्रयत्नही करण्यात आले, या दोन्हींबाबत असत्य विधाने करण्यात आली, असे ते म्हणाले.
हे कारस्थान!
तुम्ही सर्व गोष्टी स्मितहास्याने सहन करता, मात्र सोमवारी सभागृहात जे घडले त्याबाबत पावले उचलली पाहिजेत, अन्यथा ते संसदेसाठी योग्य ठरणार नाही, असे मोदी अध्यक्षांना उद्देशून म्हणाले. केवळ बालबुद्धी म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, हे कारस्थान आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
तिप्पट वेगाने काम करणार
आमच्या सरकारच्या तिसऱ्या काळात आम्ही तिप्पट वेगाने, तिप्पट शक्तीने काम करणार आहोत, आमच्या तिसऱ्या कालावधीत तीनपट अधिक निकाल लागेल याची आम्ही खात्री देत आहोत. जनाधार समजून घ्या आणि तो स्वीकारा व विरोधी पक्षात राहा, असे ते म्हणाले.
विरोधकांच्या निषेधाचा ठराव
पंतप्रधान मोदी यांच्या भाषणादरम्यान सातत्याने अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल विरोधकांच्या निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला. विरोधकांची कृती संसदीय निकषांचे तुकडे करणारी आहे, असे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. मोदी यांच्या भाषणानंतर राजनाथ सिंह यांनी हा ठराव मांडला.
अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही विरोधी पक्षांच्या नेत्यांची कानउघाडणी केली. विरोधकांचे वर्तन संसदीय निकषांना अनुसरून नव्हते, असे बिर्ला म्हणाले.
मोदी भाषणाला उभे राहताच विरोधी सदस्यांनी मणिपूरच्या खासदारांना बोलण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली. मात्र, यापूर्वी संधी देण्यात आली असल्याचे बिर्ला यांनी सांगताच काँग्रेसचे गौरव गोगोई आणि मणिपूरचे अन्य दोन खासदार सभागृहातील मोकळ्या जागेत गेले.
तुष्टीकरण नाही, संतुष्टीकरण
देशाने दीर्घकाळ लांगूलचालनाचे राजकारण पाहिले, आम्ही तुष्टीकरण करीत नाही तर संतुष्टीकरण करतो. डोक्यावर घटना घेऊन जे नाचतात त्यांची जम्मू-काश्मीरमध्ये घटनेची अंमलबजावणी करण्याची हिंमत झाली नाही, त्यांनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला, अशी टीका मोदींनी केली.
काँग्रेस परजीवी
या निवडणुकीत काँग्रेस हा परजीवी पक्ष झाला, त्यांना ९९ जागांवर विजय मिळाला असला तरी त्यामागे घटक पक्षांचे योगदान होते. घटक पक्षांच्या जिवावर कॉंग्रेसला या जागा मिळाल्या आहेत, मात्र तरी ते आपण जिंकल्याचा आव आणत आहेत, असे मोदी म्हणाले.
‘नीट’प्रकरणी युद्धपातळीवर पावले
‘नीट’ परीक्षेत जे गैरप्रकार झाले, तसे प्रकार भविष्यात टाळण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर पावले उचलत आहोत. जे युवकांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांची गय केली जाणार नाही. ‘नीट’ प्रकरणात सातत्याने देशभर अटकसत्र सुरू आहे. केंद्र सरकारने कडक कायदा केला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.