नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना अमेरिकेशी झालेला व्यापार करार, एपस्टीन फाइल्स आणि माजी लष्करप्रमुखांच्या पुस्तकाचा उल्लेख करीत सरकारवर जोरदार हल्ला चढविला. भारत-अमेरिका कराराद्वारे सरकारने भारतमातेची विक्री केली आहे, भारताची ऊर्जा सुरक्षा अमेरिकेच्या स्वाधीन करून सरकारने सपशेल शरणागती पत्करली आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड केली आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोळ्यात भीती स्पष्टपणे दिसत आहे, मोदींची मान अडकली असल्याने त्यानी देश विकून टाकला आहे. मोदींनी देश का विकला कारण अमेरिकेने त्यांची मानगूट पकडली आहे. आता आपले पंतप्रधान नव्हे तर अमेरिका ठरवणार की भारत तेलाची खरेदी कोणाकडून करणार, अमेरिका कायम आपल्यावर लक्ष ठेवणार, जर भारताने अमेरिकेची इच्छा नसलेल्या देशाकडून तेल खरेदी केले तर ते भारताला शिक्षा करणार, आपल्यावरील टॅरिफ पुन्हा ५० टक्क्यांपर्यंत वाढवणार, कोणत्याही पंतप्रधानांनी यापूर्वी हे केले नाही आणि तुमच्यानंतर कोणताही पंतप्रधान असे करणार नाही, असे राहुल म्हणाले.
तुम्ही सारे काही आलबेल असल्याचे कसे सांगू शकता, अशी विधाने करताना तुम्हाला लाज वाटत नाही का, भारताला विकताना तुम्हाला लाज वाटली नाही का, पण एक बाब खरी आहे की, पंतप्रधान भारताला सामान्य स्थितीत विकणार नाहीत, त्यांनी भारताला विकले आहे, कारण अमेरिकेने त्यांच्या गळ्याशी चोक लावला आहे, जेव्हा मार्शल आर्ट्समध्ये एक स्पर्धक दुसऱ्याला चोक करतो तेव्हा समोरच्या स्पर्धकाच्या डोळ्यात भीती दिसते, मोदींच्या डोळ्यात भीती दिसत आहे, जे नजरेला नजर भिडवू शकत नाहीत, असे ते म्हणाले.
दबावाखाली करार
अमेरिकेच्या दबावाखाली केंद्र सरकारने ‘ट्रेड डील’ केली आहे. भारताने त्यांचे ऐकले नाही तर ते पुन्हा टॅरिफ वाढवतील. अमेरिकेची नजर भारताच्या डेटावर आहे. मी इकोनॉमिक सर्व्हे पाहात होतो. मला त्यात दोन गोष्टी दिसल्या. पहिली गोष्ट म्हणजे आपण अशा जगात राहतोय त्यात ‘जियोपॉलिटिकल’ संघर्ष वाढतोय. अमेरिकेच्या दबदब्याला चीन, रशिया आणि दुसऱ्या शक्ती आव्हान देत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आपण एनर्जी आणि फायनान्शिअल शस्त्रांच्या दुनियेत वावरतोय, असे ते म्हणाले.
प्रत्यक्षात आपण युद्धाच्या काळात जगतोय. तुम्ही पाहू शकता युक्रेनमध्ये, गाझामध्ये, मिडिल ईस्टमध्ये युद्ध आहे. इराणमध्ये युद्धाचा धोका आहे. आपण ‘ऑपरेशन सिंदूर’ केले. आपण अस्थिरतेच्या विश्वात जगतोय. डॉलरला आव्हान दिले जात आहे. माझे मित्र समजत आहेत की, मुख्य खेळ हा आहे की डॉलरला आव्हान दिले जात आहे. अमेरिकेच्या दबदब्याला आव्हान दिले जात आहे. आपण सुपरपॉवरच्या विश्वाकडून कुठल्या नव्या देशाकडे जातोय. त्याचा आपण अंदाज लावू शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
लोकसंख्या एक संपत्ती
अमेरिका आणि चीनच्या स्पर्धेत सर्वात महागडी गोष्ट भारतीय डेटा आहे. अमेरिकेला सुपरपॉवर म्हणून टिकून राहायचे आहे. अमेरिकेला आपले डॉलर वाचवायचे आहेत. त्यांच्यासाठी भारतीय डेटा महत्त्वाचा आहे. मला आठवतंय बरेचसे लोक बोलायचे की, लोकसंख्या एक ओझे आहे, लोकसंख्या डिझास्टर आहे. पण लोकसंख्या एक संपत्ती असू शकते. ही एक ताकद आहे. पण तुम्ही त्याचा डेटा ओळखता, तेव्हाच ती ताकद आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
आम्ही तुमचे नोकर आहोत,असे तुम्ही बोलू नका
जर इंडिया अलायन्सची ट्रम्प यांच्यासोबत चर्चा सुरू असती, तर आम्ही पहिले काय केले असते तर आम्ही ट्रम्प यांच्याकडे स्पष्ट केले असते की, या इक्वेशनमध्ये सर्वात जास्त महत्वाचा आहे इंडियन डेटा. तु्म्हाला तुमचा डॉलर वाचवायचा असेल, तर आम्ही तुमचे मित्र आहोत. आम्ही तुम्हाला तुमचा डॉलर वाचवायला मदत करु शकतो. तुमच्या डॉलरला वाचवू शकते अशी गोष्ट इंडियन लोकांकडे आहे. जर, तुम्हाला या डेटाचा ॲक्सेस हवा असेल, तर चर्चा समान पातळीवर झाली पाहिजे. आम्ही तुमचे नोकर आहोत असे तुम्ही बोलू नका, असे राहुल गांधी म्हणाले.
पंतप्रधान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी पूर्वीचे युद्धाचे युग संपल्याचे म्हटले होते. मात्र, सध्याच्या जागतिक घडामोडी उलट दर्शवितात. खरे तर, आपण युद्धाच्या युगात जात आहोत. राहुल गांधी यांनी युक्रेनमधील चालू युद्ध, गाझामधील संघर्ष, मध्य पूर्वेतील तणाव आणि इराणशी संबंधित युद्धाच्या धोक्याकडे लक्ष वेधले. जग एका महासत्ता व्यवस्थेपासून एका नवीन, अनिश्चित जागतिक व्यवस्थेकडे जात आहे. याचा अंदाज लावणे कठीण आहे, असे राहुल म्हणाले.
एपस्टीन फाइल्समध्ये दोन उद्योगपती, केंद्रीय मंत्री पुरी यांचा उल्लेख
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना सध्या जगभर गाजत असलेल्या एपस्टीन फाइल्सचा मुद्दा उपस्थित केला. या फाइल्समध्ये काही उद्योगपती आणि केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांची नावे असल्याचा उल्लेख करीत राहुल यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. एका उद्योगपतीचे त्यामध्ये नाव आहे, ते अद्याप तुरुंगात का गेले नाहीत, केंद्रीय मंत्री पुरी यांना प्रश्न विचारावयाचा आहे की, त्यांची एपस्टीन यांच्याशी कोणी ओळख करून दिली, याची आपल्याकडे माहिती आहे आणि ते पुरी यांनाही माहिती आहे, असे गांधी म्हणाले.
पुरी यांचे स्पष्टीकरण
राहुल यांना बिनबुडाचे आरोप करण्याची जुनी सवय असून त्यांच्या विधानांमध्ये केवळ मनोरंजन मूल्य असते, असे पुरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शांतता शिष्टमंडळात एपस्टीनला ३-४ वेळा भेटलो, असेही पुरी म्हणले. २००९ मध्ये न्यूयॉर्कमध्ये भारताचे राजदूत असताना ‘इंटरनॅशनल पीस इन्स्टिट्यूट’च्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून एपस्टीनशी भेट झाली, ही माहिती आधीच सार्वजनिक डोमेनमध्ये आहे, असे पुरी म्हणाले.