नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे अध्यक्ष जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय बैठकीनंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. काँग्रेस सत्तेत असता, तर भारताचे पंतप्रधान या चर्चेत सामील झालेले दिसले असते. पण आपले तडजोड करणारे पंतप्रधान कधीही चर्चेला बसू शकत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
चीनमधील शेन्झेनला झालेल्या या बैठकीत तिन्ही जागतिक नेत्यांनी जागतिक शांततेशी संबंधित संयुक्त घोषणापत्राचा स्वीकार केला. अण्वस्त्रांशी संबंधित धोके कमी करण्यासाठी संवाद साधणे, ऊर्जा पुरवठा स्थिर ठेवणे आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या (आयसीसी) अधिकारक्षेत्राचा गैरवापर रोखणे याबाबत त्यांनी कटिबद्धता व्यक्त केली, असे राहुल गांधी म्हणाले.
अमेरिका आणि इराण चर्चेत पाकिस्तानच्या भूमिकेचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले, की भारताचा आकार आणि स्थान पाहता जागतिक स्तरावर त्याला महत्त्व असणे स्वाभाविक आहे. जागतिक चर्चांमध्ये भारताने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. मात्र, दुर्दैवाने भारताची भूमिका आता दुय्यम झाली आहे, तर पाकिस्तान अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करण्यात व्यग्र आहे. पाकिस्तानने दहशतवादाला फुस देणे थांबविल्याशिवाय त्याच्याशी चर्चा होऊ शकत नाही.
ते वक्तव्य समानसंधी नष्ट केल्याची कबुलीच
उद्योगपतींना करसवलती देऊनही अपेक्षित रोजगारनिर्मिती आणि कामगारांची वेतनवाढ होत नसल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरही राहुल गांधी यांनी टीका केली. मोदींनी उद्योगपतींवर केलेले आरोप म्हणजे मक्तेदारी निर्माण करून स्पर्धेसाठी समान संधी नष्ट केल्याची त्यांनी स्वतःच दिलेली कबुली आहे, असे ते म्हणाले.
भाजपचे प्रत्युत्तर :
राहुल गांधी यांना जागतिक राजकारणाची समज नाही. ते पाकिस्तानधार्जिण्या प्रचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप भाजपने केला. भारताचे जागतिक स्थान हे धोरणात्मक स्वायत्तता, राष्ट्रीय हित आणि संस्थात्मक सामर्थ्यावर आधारित आहे; घराणेशाहीच्या विशेषाधिकारांवर किंवा छायाचित्रांवर नाही, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय माध्यम समन्वयक आशीष उषा अग्रवाल यांनी केली.