राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर; मराठीतून 'काळ्यानिळ्या रेषा' या आत्मचरित्राची निवड 
राष्ट्रीय

राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर; मराठीतून 'काळ्यानिळ्या रेषा' या आत्मचरित्राची निवड

साहित्य क्षेत्रातील अत्यंत मानाच्या अशा साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. साहित्य अकादमीने २४ भारतीय भाषांमधील आपले वार्षिक पुरस्कार जाहीर केले आहेत. मराठी भाषेतून साहित्यिक राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मचरित्राची साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : साहित्य क्षेत्रातील अत्यंत मानाच्या अशा साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. साहित्य अकादमीने २४ भारतीय भाषांमधील आपले वार्षिक पुरस्कार जाहीर केले आहेत. मराठी भाषेतून साहित्यिक राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मचरित्राची साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

मराठी भाषेतून शिफारस करण्यात आलेल्या एकूण ११ पुस्तकांमधून बाविस्कर यांच्या साहित्यकृतीची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सन्मानचिन्ह (कोरीव ताम्रपट), शाल आणि १ लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ३१ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित एका समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील.

राजू बाविस्कर हे एक प्रसिद्ध मराठी चित्रकार आणि लेखक आहेत. गावकुसाबाहेर असलेल्यांच्या व्यथा-वेदनांना आपल्या भेदक रेषेच्या माध्यमातून मूर्तरूप देणारे राजू बाविस्कर जेव्हा शब्दांच्या माध्यमातून काही अनुभव तितक्याच उत्कटतेने सांगू पाहतात, तेव्हा त्यांच्या आत्मकथनाला एक वेगळे मूल्य प्राप्त होते. कष्टकऱ्यांच्या, वंचितांच्या जगण्याला कलेचा नवा आयाम देणारे हे पुस्तक साहित्य अकादमी पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. राजहंस प्रकाशनने यापूर्वी प्रकाशित केलेल्या ‘मी संदर्भ पोखरतोय’ (२०२२), ‘ब्राह्मोस’ (२०२३) आणि ‘विंदांचे गद्यरुप’ (२०२४) या पुस्तकांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आता राजू बाविस्कर यांनी लिहिलेल्या ‘काळ्यानिळ्या रेषा’च्या निमित्ताने यंदा सलग चौथ्यांदा साहित्य अकादमीच्या पुरस्कारांवर राजहंसी मोहर उमटली आहे.

राजू बाविस्कर यांचे ‘काळ्यानिळ्या रेषा’ आत्मचरित्र हे केवळ एका चित्रकाराचे जगणे शब्दबद्ध करत नाही तर समाजातील एका वंचित वर्गाच्या प्रवासाचे कथन आहे. चित्रकार राजू बाविस्कर यांनी आपल्या चित्रातून वंचितांचे जगणे मांडले. यानंतर त्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या वंचित जगण्याला शब्दांमधून वाट करून दिली. व्यक्तिचित्रणाच्या अंगाने जाणारे हे आत्मकथन वाचकांना अंतर्मुख करणारा अनुभव देतो.

यंदा या प्रतिष्ठित सन्मानासाठी आठ काव्यसंग्रह, चार कादंबऱ्या, सहा कथासंग्रह, दोन निबंधात्मक कार्ये, एक साहित्यिक समीक्षा, एक आत्मचरित्र आणि दोन आठवणींच्या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे.

पुरस्कारासाठी निवडलेल्या कादंबऱ्यांमध्ये ‘कर्ही खेलर साधू’ (आसामी), ‘द्वंग्नवी लामा म्वन्से गाथ्वन’ (बोडो), ‘क्रिम्सन स्प्रिंग’ (इंग्रजी) आणि ‘मायामानुष्यार’ (मल्याळम) यांचा समावेश आहे. कथासंग्रह श्रेणीमध्ये ‘दादा सीरिसू तंदे’ (कन्नड), ‘कांगलामद्रिबा इफूत’ (मणिपुरी), ‘सेफ्टी किट’ (पंजाबी), ‘भरखमा’ (राजस्थानी), ‘मिड बिरना चेन्ने साओन इनाग सगाई’ (संताली) आणि ‘वाघू’ (सिंधी) यांनी बाजी मारली आहे. निबंध श्रेणीत ‘कोंकणी काव्यम: रुपाणी आणि रुपाकाम’ (कोंकणी) आणि ‘रा सभ्यता को डुकुटी’ (नेपाळी) यांचा समावेश आहे. साहित्यिक समीक्षा म्हणून ‘तमिळ सिरुकथाईन थाडंगल’ची (तमिळ) निवड करण्यात आली आहे. आठवणी श्रेणीत ‘जीते जी अलाहाबाद’ (हिंदी) आणि ‘धात्री पात सन गाम’ (मैथिली) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

Mumbai : प्रवाशांची होणार गैरसोय; उद्या पश्चिम व मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

Iran vs US-Israel War: तेल पुरवठ्यात अस्थिरता; इराणने अमेरिकेचा दावा फेटाळला

Mumbai : धक्कादायक! वृद्धाश्रमात ज्येष्ठ महिलेला झाडूने मारहाण; Video व्हायरल होताच संतापाची लाट

Mumbai : उद्धव ठाकरे यांच्याकडून एक्सपोर्ट-इम्पोर्ट लॉजिस्टिक्स कोर्सचा शुभारंभ; काय आहे खास? फी किती? जाणून घ्या

Iran vs US-Israel War: पत्नीशी फोनवर बोलताना मोठा स्फोट! सौदीतील हल्ल्यात भारतीय नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू