मुंबई : महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यायच्या ७ जागांसह ३७ जागांसाठी बुधवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी १६ मार्च रोजी मतदान होईल. राज्यसभा निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय पक्षात मतांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास निकालात निघालेल्या महाविकास आघाडीच्या ऐक्याची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे.
महाराष्ट्रातील ७, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील प्रत्येकी ५ जागांवर निवडणूक होईल. तामिळनाडूच्या ६ जागांवर निवडणूक होईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, फौजिया खान, भाजपचे डॉ. भागवत कराड, धैर्यशील पाटील, रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेसच्या रजनी पाटील आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी यांची राज्यसभेची मुदत २ एप्रिल २०२६ रोजी संपत आहे.
विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता महायुतीचे सहा तर विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीचा एक उमेदवार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. अर्थात त्यासाठी महविकास आघाडीची एकजूट महत्त्वाची असेल. सध्या महाविकास आघाडीचे चार तर भाजप आणि आठवले मिळून तीन खासदार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे विधानसभेतील २ जागा रिक्त आहेत. विधानसभेत भाजपचे १३१, शिवसेना शिंदे गटाचे ५७, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ४०, शिवसेना ठाकरे गटाचे २०, काँग्रेसचे १६, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे १०, अपक्ष आणि इतर मिळून १२ असे संख्याबळ आहे. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी पहिल्या पसंतीच्या ३७ मतांची गरज आहे. त्यामुळे भाजपचे चार, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रत्येकी एक तसेच महविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून जाऊ शकतो.
उमेदवारांच्या नावाची उत्सुकता
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या नावाची चर्चा आहे. पवार यांना काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा मिळू शकतो. मात्र, वाढलेले वय आणि प्रकृती लक्षात घेता पवार राज्यसभेवर जातील का? हा प्रश्न आहे. पवारांनी राज्यसभेवर जाण्यास नकार दिला तर आघाडीला सहमतीचा उमेदवार द्यावा लागले. राज्यसभा उमेदवार देताना भाजप धक्कातंत्राचा अवलंब करण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये सध्या विनोद तावडे, विनय सहस्रबुद्धे, सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा आहे. धैर्यशील पाटील हे पोटनिवडणुकीत राज्यसभेवर गेल्याने त्यांना पुन्हा संधी मिळू शकते. तसेच भाजपच्या कोट्यातून रामदास आठवले यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. शिवसेना शिंदे गटात माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाची चर्चा आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे.
आजोबा-नातू
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या उमेदवारीला सहमती दर्शवली असून काँग्रेस पक्षानेही सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे मविआकडून राज्यसभेसाठी शरद पवार यांचे नाव निश्चित मानले जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून पार्थ पवार यांचे नावही निश्चित झाल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास पवार कुटुंबातील आजोबा आणि नातू असे दोघे एकाचवेळी राज्यसभेत जाण्याची शक्यता आहे.
निवडणूक बिनविरोध ?
भाजपकडून अतिरिक्त उमेदवार मैदानात उतरवण्यात आला नाही, तर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या तरी सत्ताधारी पक्षाची अंतिम भूमिका स्पष्ट झालेली नाही.
संख्याबळ वाढणार : द्वैवार्षिक निवडणूक झाल्यानंतर राज्यसभेत भाजपचे संख्याबळ वाढणार आहे कारण ज्या १० राज्यांमध्ये राज्यसभेची निवडणूक होणार आहे त्यापैकी सहा राज्यांमध्ये भाजप सत्तेत अथवा आघाडीतील पक्ष आहे. महाराष्ट्रासह ओदिशा (४), तेलंगण (२), तामिळनाडू (६), छत्तीसगड (२), पश्चिम बंगाल (५), आसाम (३), हरयाणा (२), हिमाचल प्रदेश (१) आणि बिहार (५) जागांसाठी निवडणूक होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम
२६ फेब्रुवारी : निवडणुकीची अधिसूचना जारी
५ मार्च : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत
६ मार्च : उमेदवारी अर्जांची छाननी
९ मार्च : अर्ज माघारीची मुदत
१६ मार्च : मतदान (सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत)
१६ मार्च : मतमोजणी (संध्याकाळी ५ वाजल्यापासून )
२० मार्च : निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख