सॅनिटरी पॅड तपासण्यासाठी पॅन्ट खाली करण्यास सांगितले; NEET पुनर्परीक्षेनंतर विद्यार्थिनीची संतप्त पोस्ट 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

सॅनिटरी पॅड तपासण्यासाठी पॅन्ट खाली करण्यास सांगितले; NEET पुनर्परीक्षेनंतर विद्यार्थिनीची संतप्त पोस्ट

Re-NEET 2026 परीक्षेदरम्यान पश्चिम बंगालमधील विद्यार्थिनीने सॅनिटरी पॅड तपासण्यासाठी पॅन्ट खाली करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप केला आहे. या दाव्यानंतर परीक्षा केंद्रांवरील तपासणी प्रक्रियेवर वाद निर्माण झाला आहे.

Mayuri Gawade

NEET-UG २०२६ पेपरफुटी प्रकरणानंतर २१ जून रोजी देशभरात पुनर्परीक्षा घेण्यात आली. याच परीक्षेदरम्यान पश्चिम बंगालमधील एका विद्यार्थिनीने परीक्षा केंद्रावरील तपासणीबाबत गंभीर आरोप केले आहेत. परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी तपासणीदरम्यान सॅनिटरी पॅड तपासण्यासाठी पॅन्ट खाली करण्यास सांगण्यात आल्याचा दावा तिने केला आहे. या आरोपानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात असून, परीक्षा केंद्रांवरील तपासणी प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मालदा येथील बिभूतिभूषण हायस्कूलमध्ये पुनर्परीक्षा देणाऱ्या हृषिका पाल हिने दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत आपला अनुभव शेअर केला. तिच्या पोस्टनंतर या प्रकरणाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.

नेमकं काय घडलं?

हृषिकाच्या म्हणण्यानुसार, परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी महिला कर्मचाऱ्यांकडून तिची तपासणी करण्यात आली. यावेळी तिला मासिक पाळी सुरू आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. तिने होकार दिल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने पॅड तपासण्यासाठी पॅन्ट खाली करण्यास सांगितल्याचा आरोप हृषिकाने केला आहे.

"ही केवळ कपड्यांवरील नियमित सुरक्षा तपासणी नव्हती. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या परीक्षेत प्रवेश मिळवण्यासाठी मला माझ्या शरीराचा अतिशय वैयक्तिक भाग उघड करावा लागला," असे हृषिकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. "मी हादरले होते, मला प्रचंड लाज वाटली आणि नकार देण्याचीही हिम्मत नव्हती. कारण मला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही, अशी भीती वाटत होती," असे तिने पोस्टमध्ये नमूद केले.

इतर विद्यार्थिनींनाही असा अनुभव आला का?

हृषिकाने या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत ही तपासणी अधिकृत नियमांचा भाग होती का, असा सवाल केला आहे. तसेच इतर परीक्षा केंद्रांवरही अशाच प्रकारची तपासणी झाली का, याबाबतही तिने विचारणा केली आहे.

पोस्टसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, "मी विविध परीक्षा केंद्रांवर पुनर्परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थिनींशी बोलले. त्यापैकी कोणालाही पाळी सुरू आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला नव्हता. तसेच अशा प्रकारच्या तपासणीचाही अनुभव त्यांना आला नाही. माझ्या केंद्रावर जे मी पाहिले, त्यानुसार अशा तपासण्या केवळ पाळी सुरू असल्याचे सांगणाऱ्या विद्यार्थिनींसाठीच केल्या जात असल्याचे दिसून आले."

सोशल मीडियावर उमटल्या प्रतिक्रिया

हृषिकाच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. काही विद्यार्थिनींनी यापूर्वीही अशाच प्रकारच्या तपासणीचा अनुभव आल्याचे सांगितले.

एका विद्यार्थिनीने मागील वर्षी मालदा येथील नीट परीक्षा केंद्रावर आपल्यालाही अशाच प्रकारच्या तपासणीला सामोरे जावे लागल्याचे सांगितले. तर आणखी एका विद्यार्थिनीने कोलकात्यातील पुनर्परीक्षा केंद्रावरही असाच अनुभव आल्याचा दावा केला.

अनेकांनी हृषिकाला पाठिंबा देत अशा तपासणी पद्धतींवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काहींनी संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी आणि स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली.

अधिकृत प्रतिक्रिया अद्याप नाही

दरम्यान, सोशल मीडियावर करण्यात आलेल्या या दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही. या आरोपांबाबत राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) किंवा संबंधित परीक्षा केंद्रांकडून वृत्त लिहिपर्यंत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती.

या प्रकरणामुळे परीक्षा केंद्रांवरील तपासणी प्रक्रियेची मर्यादा, विद्यार्थ्यांचा सन्मान आणि गोपनीयतेचे संरक्षण याबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

(टीप : या वृत्तातीलआरोप विद्यार्थिनी आणि सोशल मीडियावरील काही वापरकर्त्यांनी केलेले दावे आहेत. संबंधित दाव्यांची स्वतंत्र पडताळणी झालेली नाही.)

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधातील आंदोलन तीव्र; पोलिसांना धक्काबुक्की, ABVP चे ११० कार्यकर्ते ताब्यात

Mumbai-Pune Expressway : 'मिसिंग लिंक' उद्या ३ तास बंद; प्रवासाला निघण्यापूर्वी वाचा महत्त्वाची बातमी

IPL क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा आरोप

Government Holiday : मुंबईकरांना दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला सुट्टी; ऑगस्टअखेरीस मिळणार सलग ३ दिवसांचा ब्रेक

Mumbai : 'लोकलमधील ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा'; Gen Z, Gen Alpha साठी तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी