'बॉस'च्या नावाने फ्रॉड WhatsApp मेसेज? एका चुकीमुळे होऊ शकते लाखोंची फसवणूक; SEBI चा सायबर अलर्ट 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

'बॉस'च्या नावाने फ्रॉड WhatsApp मेसेज? एका चुकीमुळे होऊ शकते लाखोंची फसवणूक; SEBI चा सायबर अलर्ट

WhatsApp वर तुमच्या 'बॉस'च्या नावाने तातडीने पैसे पाठवण्याचा मेसेज आला, तर क्षणाचाही विचार न करता लगेच...

किशोरी घायवट-उबाळे

नवी दिल्ली : WhatsApp वर तुमच्या 'बॉस'च्या नावाने तातडीने पैसे पाठवण्याचा मेसेज आला, तर क्षणाचाही विचार न करता लगेच व्यवहार करू नका. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), व्हॉइस क्लोनिंग आणि डीपफेक तंत्रज्ञानाच्या मदतीने वाढत असलेल्या 'बॉस स्कॅम' या सायबर फसवणुकीबाबत भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाने (Securities and Exchange Board of India) सूचीबद्ध कंपन्या आणि नियमनाधीन संस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याशी थेट संपर्क साधून पडताळणी करण्याचे आवाहन SEBI ने केले आहे.

भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या (I4C) सूचनेनंतर सेबी (SEBI) ने हा सल्ला जारी केला आहे. ई-मेल, व्हॉट्सॲप, मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि इतर सोशल मीडिया माध्यमांतून अशा फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

'अशी' केली जाते फसवणूक

SEBI च्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगार वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव किंवा ओळख वापरून वित्त विभागातील कर्मचाऱ्यांना तातडीने विशिष्ट बँक खात्यात पैसे पाठवण्याचे निर्देश देतात.

काही प्रकरणांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), व्हॉइस क्लोनिंग आणि डीपफेक व्हिडिओ कॉल यांच्या मदतीने समोरची व्यक्ती खरोखरच वरिष्ठ अधिकारी असल्याचा आभास निर्माण केला जातो.

याशिवाय, झिप फाईलच्या स्वरूपात मालवेअर पाठवून कंप्यूटर किंवा मोबाईलमधील व्हॉट्सॲप वेबवर ताबा मिळवला जातो. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या खात्यातून वित्त विभागाला पैसे पाठवण्याचे मेसेज पाठवले जातात.

काही वेळा मोबाईलमधील कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये फेरफार करून फसवणूक करणाऱ्यांचा क्रमांक CEO किंवा MD यांच्या नावाने सेव्ह केला जातो. त्यामुळे कर्मचारी तो मेसेज खरा समजून पैसे पाठवतात.

SEBI ने दिलेल्या महत्त्वाच्या सूचना

  • व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा सोशल मीडियावरून आलेल्या आर्थिक सूचनांची फोनवरून थेट पडताळणी करा.

  • केवळ मेसेजच्या आधारे कोणताही निधी हस्तांतरित करू नका.

  • ओळख निश्चित झाल्याशिवाय कोणतीही एक्झिक्युटेबल किंवा झिप फाईल उघडू अथवा इन्स्टॉल करू नका.

  • वापरात नसलेले व्हॉट्सॲप वेब तातडीने लॉगआऊट करा.

  • सायबर फसवणुकीचा संशय आल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधा किंवा सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार नोंदवा.

AI मुळे वाढला धोका

SEBI ने स्पष्ट केले की, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बनावट आवाज आणि व्हिडिओ तयार करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे कंपन्यांनी आर्थिक व्यवहारांमध्ये अतिरिक्त खबरदारी घेणे आणि प्रत्येक महत्त्वाच्या व्यवहाराची स्वतंत्र पडताळणी करणे आवश्यक असल्याचे SEBI ने म्हटले आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

भारताची अंतराळ क्षेत्रात नवी झेप; देशातील पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेट Vikram-1 चे यशस्वी प्रक्षेपण

अभिजीत दिपकेंवर शाईफेक; महिला पोलिसांच्या ताब्यात, Video

सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटवताच आंदोलनाला नवे वळण; अभिजीत दिपकेंचं बेमुदत उपोषण सुरू

महिलेची छेड काढणं पडलं महागात! रेल्वेतच तरुणाला घातल्या बांगड्या, लिपस्टिक लावत शिकवला धडा; VIDEO

भारतीय वेलचीच्या निर्यातीत वाढ; निर्यात तिप्पट होऊन ४३ कोटी डॉलर पार