स्मार्टफोन महागणार, मोबाईल जाणार लाखापार; मेमरी चिप्स किमतीतील वाढीचा फटका; AI डेटा सेंटर्सच्या मागणीचा परिणाम प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

स्मार्टफोन महागणार, मोबाईल जाणार लाखापार; मेमरी चिप्स किमतीतील वाढीचा फटका; AI डेटा सेंटर्सच्या मागणीचा परिणाम

मेमरी चिप्सच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे वर्षाअखेरपर्यंत बहुतांश कंपन्यांच्या प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किमती ३० टक्क्यांहून अधिक वाढून प्रति फोन १ लाख रुपयांच्या पार जाण्याची शक्यता आहे, असा अंदाज बाजार संशोधन संस्था ‘काऊंटरपॉइंट रिसर्च’ने शुक्रवारी व्यक्त केला.

Swapnil S

नवी दिल्ली : मेमरी चिप्सच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे वर्षाअखेरपर्यंत बहुतांश कंपन्यांच्या प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किमती ३० टक्क्यांहून अधिक वाढून प्रति फोन १ लाख रुपयांच्या पार जाण्याची शक्यता आहे, असा अंदाज बाजार संशोधन संस्था ‘काऊंटरपॉइंट रिसर्च’ने शुक्रवारी व्यक्त केला.

स्मार्टफोनच्या किमतीत वाढ होत असतानाच ग्राहकांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत. वाढीव किमतीच्या मोबदल्यात मोबाईलचा प्रोसेसिंग वेग, कॅमेरा, बॅटरी, टिकाऊपणा आणि विक्रीपश्चात सेवा (आफ्टर-सेल्स सर्व्हिस) या सर्वच बाबतींत दर्जेदार अनुभव देणाऱ्या ठोस वैशिष्ट्यांकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.

काही वर्षांपूर्वी भारतात १ लाख रुपयांचा स्मार्टफोन ही दुर्मीळ गोष्ट होती. फ्लॅगशिप फोनच्या किमती सातत्याने वाढत असल्याने हा दर आता सर्वसामान्य होत चालला आहे. २०२५ च्या तुलनेत २०२६ च्या अखेरीस प्रीमियम फ्लॅगशिप उपकरणांच्या किमती ३० टक्क्यांहून अधिक वाढण्याचा अंदाज आहे, असे ‘काऊंटरपॉइंट रिसर्च’च्या अहवालात म्हटले आहे.

दरवाढीचे कारण

मेमरी चिपचा वाढता वाटा : २०२५ च्या पहिल्या तिमाहीत एकूण फोनच्या उत्पादन खर्चात मेमरी चिप्सचा वाटा १३ टक्के होता. तो वर्षाअखेरपर्यंत थेट ४३ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

एआय डेटा सेंटर्सचा दबाव : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) डेटा सेंटर्सकडून वाढलेल्या मागणीमुळे तात्पुरत्या स्टोरेजसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘डी-रॅम’ आणि ‘नँड’ मेमरीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

कंपन्यांची रणनीती बदलणार : २०२५ च्या सुरुवातीला स्मार्टफोनच्या एकूण मटेरियल बिलात मेमरीचा वाटा १३ टक्के होता. तो आता ४० टक्क्यांहून अधिक झाला आहे. यामुळे खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी स्मार्टफोन उत्पादकांना फोनची वैशिष्ट्ये, सुटे भाग आणि उत्पादन धोरणांचा फेरविचार करावा लागत आहे.

ब्रँडनिहाय दरवाढ

  • ओप्पो : वार्षिक आधारावर ओप्पोच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किमतींत सर्वाधिक ८२ ते ८७ टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

  • आयफोन : अल्ट्रा-प्रीमियम श्रेणीतील आघाडीच्या आयफोनच्या किमतीत वार्षिक आधारावर २० ते २२ टक्के वाढ झाली आहे.

  • शाओमी: चिनी स्मार्टफोन कंपनी शाओमीनेही दिवाळीनंतर उपकरणांच्या किमती २,००० ते ४,००० रुपयांच्या श्रेणीतच वाढवल्या आहेत.

  • सॅमसंग : बाजारपेठेतील आघाडीच्या सॅमसंगने दिवाळीनंतर स्मार्टफोनच्या किमती प्रति फोन २,००० ते ४,००० रुपयांनी वाढवल्या. त्यापूर्वी दिवाळीआधी कंपनीने ‘गॅलेक्सी एस २६’ या फ्लॅगशिप फोनच्या किमतीत १७ टक्के वाढ केली होती.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; जळगावात नीचांकी ८ अंश तापमानाची नोंद

Maharashtra HSC Exam 2027 : बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची वेळ बदलली

Satara : जिल्हा बँकेतील पराभवाने भाजप नेते बिथरले; शिवेंद्रसिंहराजे आणि जयकुमार गोरे यांच्यात जुंपली!

सलग नवव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; सोने ५,२००, तर चांदी ४,००० रुपयांनी स्वस्त

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण : पार्थ पवार यांना दिलासा