सोनम वांगचुक यांनी अखेर उपोषण सोडलं; केंद्र सरकारच्या 'या' आश्वासनानंतर घेतला मोठा निर्णय (Photo-X/@Wangchuk66)
राष्ट्रीय

सोनम वांगचुक यांनी अखेर उपोषण सोडलं; केंद्र सरकारच्या 'या' आश्वासनांनंतर घेतला मोठा निर्णय

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना योग्य भरपाई देण्याचा विचार केला जाईल आणि शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवर...

किशोरी घायवट-उबाळे

नवी दिल्ली : तब्बल २६ दिवसांच्या बेमुदत उपोषणानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी अखेर आपले आंदोलन मागे घेतले आहे. केंद्र सरकारकडून त्यांच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात भेट देऊन सरकारचे आश्वासनपत्र सुपूर्द केल्यानंतर वांगचुक यांनी उपोषण सोडण्याची घोषणा केली.

सरकारच्या आश्वासनानंतर घेतला निर्णय

सरकारने शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्वाचा मुद्दा संसदेत चर्चेसाठी मांडला जाईल, अशी हमी दिल्याचे वांगचुक यांनी सांगितले. तसेच, नीट पेपरफुटी प्रकरणानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना योग्य भरपाई देण्याचा विचार केला जाईल आणि शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासनही सरकारने दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'उपोषण संपलं, आता उत्तरदायित्वाच्या लढ्याची सुरुवात'

उपोषण मागे घेतल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना वांगचुक यांनी, "उपोषण संपलं, पण आता उत्तरदायित्वाच्या लढ्याची खरी सुरुवात झाली आहे," असे म्हटले. विविध राजकीय पक्षांच्या खासदारांनी शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्वाचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

६५ खासदारांनी केली होती उपोषण सोडण्याची विनंती

वांगचुक यांनी सांगितले की, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि लडाखमधील एपेक्स बॉडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी २६ दिवसांचे उपोषण अधिकृतपणे सोडले. यापूर्वी विविध राजकीय पक्षांतील ६५ खासदारांनी प्रत्यक्ष भेट घेऊन किंवा पत्राद्वारे उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती, असेही त्यांनी सांगितले.

अमित शहा यांच्या बैठकीनंतर घडामोडी

माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासोबत सुमारे चार तास चर्चा केली. त्यानंतर डॉ. जितेंद्र सिंह यांनी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांच्याशी संपर्क साधून सरकार आंदोलनकर्त्यांच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यानंतर नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी मेदांता रुग्णालयात जाऊन वांगचुक यांना सरकारचे आश्वासनपत्र दिले.

तटस्थ ठिकाणी चर्चेचे आश्वासन

केंद्र सरकारकडून सीजेपीच्या शिष्टमंडळाला पुढील टप्प्यात तटस्थ ठिकाणी चर्चेसाठी निमंत्रित केले जाईल, असेही मंत्र्यांनी सांगितले. यापूर्वी सीजेपीने केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चर्चा करण्याचा प्रस्ताव नाकारत जंतरमंतर किंवा तटस्थ ठिकाणीच चर्चा व्हावी, अशी भूमिका घेतली होती.

विधेयक आणण्याची तयारी

वांगचुक यांच्या प्रमुख मागण्यांपैकी असलेल्या शिक्षण क्षेत्रातील उत्तरदायित्वाबाबत नवे विधेयक कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या चौकटीत तयार करण्यात येणार असून, ते लवकरच संसदेत मांडण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

हिंसाचार टाळण्याचे आवाहन

उपोषण मागे घेण्याचा निर्णय प्रदीर्घ चर्चेनंतर आणि देशात कोणताही हिंसाचार होऊ नये, याचा विचार करून घेतल्याचे वांगचुक यांनी स्पष्ट केले. तसेच, कोणत्याही परिस्थितीत हिंसाचाराला खतपाणी घालू नये आणि सर्वांनी शांतता व संयम राखावा, असे आवाहनही त्यांनी देशवासीयांना केले.

सीजेपीची भूमिका कायम

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना सोनम वांगचुक यांनी २६ दिवसांनंतर उपोषण मागे घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. "देशासाठी तुमचे धैर्य आणि त्याग अमूल्य आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही संपूर्ण देशाला जागे केले," असे त्यांनी म्हटले. तसेच, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण होईपर्यंत जंतरमंतरवरील सीजेपीचे शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहणार, असेही दिपके यांनी स्पष्ट केले.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

केवळ निर्यातीसाठी इन्व्हेंटरी आधारित ई-कॉमर्समधील FDI ला परवानगी; सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Mumbai : रिगल जंक्शनची कोंडी फुटणार; २७ सिग्नल होणार रद्द, ६ सिग्नलवर वाहतूक व्यवस्था

Mumbai : मृत फेरीवाल्यांच्या वारसांसाठी धोरण निश्चिती; तीन हजारांहून अधिक मृतांच्या वारसांना मिळणार क्यूआर कोड

Bhiwandi : अनधिकृत शाळा चालवणाऱ्यांविरोधात गुन्हा; पाच शाळांच्या मुख्याध्यापक-व्यवस्थापकांवर कारवाई

Mumbai : विहार तलावात तरुण बुडाला; शोधमोहीम वेगाने सुरू