दिल्ली : नीट-यूजी (NEET-UG) पेपरफुटी वादाच्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पक्षाच्या (CJP) आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी रविवारी (दि. २८) दिल्लीतील जंतरमंतर येथे बेमुदत उपोषण सुरू करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या आंदोलनात विद्यार्थी, युवक, शेतकरी नेते आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
जंतरमंतरवर आंदोलनाला सुरुवात
उपोषण सुरू होण्यापूर्वी सोनम वांगचुक आणि CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केले. त्यानंतर जंतरमंतरवर दोन मिनिटे मौन पाळून आंदोलनाला सुरुवात केली.
शेतकरी नेत्यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप
आंदोलनापूर्वी अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर म्हटले की, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधील काही शेतकरी नेत्यांना आंदोलनात सहभागी होऊ नये म्हणून घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. मात्र, या आरोपावर प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
२० जूनपासून सुरू आहे आंदोलन
कॉकरोच जनता पक्षाने २० जूनपासून जंतरमंतरवर धरणे आंदोलन सुरू केले आहे. पक्षाचे म्हणणे आहे की, हा वाद केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नसून देशातील शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाशी संबंधित व्यापक प्रश्न आहे.
'प्रधान गो बॅक' मोहिमेला वांगचुक यांचा पाठिंबा
शुक्रवारी अभिजीत दिपके यांनी 'प्रधान गो बॅक' या देशव्यापी मोहिमेअंतर्गत सोनम वांगचुक आंदोलनात सहभागी होणार असल्याची घोषणा केली होती. त्यांनी विद्यार्थी, शिक्षक, पालक, शेतकरी संघटना आणि विविध सामाजिक संघटनांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही केले.
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
स्पर्धा परीक्षांतील कथित पेपरफुटीबाबत धर्मेंद्र प्रधान यांनी जबाबदारी घेतली नाही, असा आरोप दिपके यांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. याशिवाय, कथित पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत देण्याचीही मागणी केली. आंदोलनातील स्वयंसेवकांवर हल्ला करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली नसल्याचाही आरोप त्यांनी केला.
NEET-UG वादाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन
नीट-यूजी पेपरफुटीच्या कथित आरोपांनंतर हा वाद अधिक चिघळला आहे. यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) ३ मेची परीक्षा रद्द करून २१ जून रोजी कडक सुरक्षा व्यवस्थेत पुनर्परीक्षा घेतली. या प्रकारामुळे स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.