पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील पाबे घाटात शनिवारी (दि. २७) उशिरा रात्री भीषण अपघात झाला. मुंबईहून राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांची खासगी ट्रॅव्हलर बस खोल दरीत कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी (पूर्व), मुंबई येथून सुमारे २० पर्यटक बसमधून राजगड किल्ल्यावर आले होते. प्रवासात पावसामुळे निसरड्या झालेल्या घाटरस्त्यावर बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस खोल दरीत कोसळली आणि अनेक वेळा पलटी झाली.
रात्रभर बचावकार्य
अपघाताची माहिती मिळताच हवेली आपत्ती व्यवस्थापन पथक, वेल्हे पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मुसळधार पाऊस, अंधार आणि कठीण भौगोलिक परिस्थिती असूनही रात्रभर बचावकार्य सुरू ठेवण्यात आले. बसमध्ये अडकलेल्या सर्व जखमी प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दोघांचा मृत्यू
या अपघातात विश्वास बाबुराव धाटिया (२५, रा. नेहरूनगर, विलेपार्ले, मुंबई) यांचा मृत्यू झाला. तसेच एका तरुणीचाही मृत्यू झाला असून तिची ओळख अद्याप पटलेली नाही. बसचालक संदीप तुकाराम गायकवाड (४७) यांच्यासह इतर जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. चालकाच्या हाताला आणि शरीराच्या इतर भागांनाही दुखापत झाली आहे.
अपघाताचा तपास सुरू
या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, पावसाळ्यात घाटरस्त्यांवर वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे आणि अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.