राष्ट्रीय

'त्याचा' स्पर्शही माझ्या पोटच्या गोळ्याला लागू द्यायचा नाही! सूचना सेठने टीश्यू पेपरवर लिहिल्या चार ओळी

मी प्रचंड तणावाखाली आहे. मला माझ्या पोटच्या गोळ्याला व्यंकटरामन याच्याकडे द्यायचे नाही. त्याचा स्पर्शही चिन्मयला लागू द्यायचा नाही, याच मानसिक तणावातून मी...

Swapnil S

प्रतिनिधी| गोवन वार्ता

म्हापसा : मी प्रचंड तणावाखाली आहे. मला माझ्या पोटच्या गोळ्याला व्यंकटरामन याच्याकडे द्यायचे नाही. त्याचा स्पर्शही चिन्मयला लागू द्यायचा नाही, याच मानसिक तणावातून मी आत्महत्या करीत आहे, असे चिठ्ठीत आरोपी सूचना सेठ हिने लिहिले आहे. टीश्यू पेपरवर आय लायनरच्या सहाय्याने लिहिलेली चार ओळींची नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. ही नोट टॅक्सी गाडीच्या डिकीतील कपड्याच्या बॅगमध्ये पोलिसांना सापडली आहे. यावरून ती मुलाच्या विरहाच्या गोष्टीने फार मानसिक तणावाखाली गेली होती, हे दिसून येते. पण चिठ्ठी लिहिल्यानंतर तिचे मन बदलले. चिठ्ठी फाडून आपल्या हातावर तिने पट्टी बांधली.

सदर टीश्यू -पेपर फाटलेल्या अवस्थेत सापडला आहे. त्याचे तीन - चार तुकडे झाले आहेत. फॉरेन्सिक पथकाने ते जोडून त्यावरील मजकूर वाचला. या चार ओळींच्या मजकुरावर संशयित सूचना हिने मुलाच्या कस्टडीबाबत, तिचे आणि पती व्यंकटरामनमधील नात्याबाबत लिहिले आहे. हा मजकूर या खून प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा आणि टर्निंग पॉईंट ठरण्याची शक्यता आहे.

सोमवारी ८ रोजी सूचना सेठ हिला चित्रदुर्ग येथून पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. यावेळी टॅक्सीच्या डिकीत सूचना हिने सूटकेस ठेवली होती. त्यात चिन्मयचा मृतदेह तसेच हाताची नस कापल्यानंतर रक्ताने माखलेला ड्रेस होता. हा ड्रेस या बॅगमध्ये पोलिसांना सापडला व याच रक्ताने माखलेल्या कपड्यावर तुकडे झालेला टीश्यू -पेपर आढळला. या पेपरमध्ये चार ओळींचा इंग्रजीमध्ये लिहिलेला मजकूर होता. या मजकुरात तिने आयुष्यातील शोकांतिका मांडण्याचा प्रयत्न केला. तिला आपल्या मुलाची कस्टडी व्यंकटरामन याच्याकडे द्यायची नव्हती, हे यातून स्पष्ट होत आहे.

कळंगुट पोलीस आता सूचना हिचे हस्तलेखन घेऊन त्या चिठ्ठीमधील हस्तांक्षराशी जुळते का ते तपासणार आहेत. सूचना हिने आपल्या हस्ताक्षरचा नमुना देण्याची तयारी दाखविली आहे.

पोलिसांनी यापूर्वीच सूचना हिने आपल्या डाव्या हाताची नस कापण्यासाठी रुममधील वापरलेला चाकू आणि तिचा रक्ताने माखलेला टॉवेल, उशी, बेडशीट जप्त करुन फॉरेन्सिकसाठी पाठविला होता.

दरम्यान, बंगळुरुची सूचना सेठ हिच्यावर चिन्मय या चार वर्षाच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. सध्या सूचना पोलीस कोठडीत आहे.

चित्रदुर्गमध्येच पोलिसांना रक्ताने माखलेल्या कपड्यात चिठ्ठी सापडली होती. या चिठ्ठीचे तीन ते चार तुकडे होते. त्यामुळे पोलिसांनी हे टीशू पेपरचे तुकडे जप्त करुन ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविले आणि जोडून त्यावरील मजकूर वाचला. सूचना हिने काळ्या आयलायनरच्या सहाय्याने हा मजकूर लिहिला होता.

सूचना ही चौकशीवेळी काहीच बोलत नाही. चिन्मयचा खून कसा केला किंवा त्याच्या हत्येचे नेमके कारण यावर ती ब्र काढत नाही. तर गप्प राहते. पण आपल्या वर्तमान आयुष्यात काय चालले होते किंवा भूतकाळाबद्दल ती सर्व सांगते. फक्त पोलीस निरीक्षकांसमोरच ती आपल्या आयुष्याचा सारीपाट कथन करते. घटनेच्या दिवशी आपण झोपी गेली होती, त्यामुळे चिन्मयचा मृत्यू कसा झाला याची आपल्याला कल्पना नाही, असा दावा ती पोलिसांसमोर करते.

सूचना ही मानसिक तणावाखाली व वैफल्यग्रस्त होती, असे तिच्या एकंदर बोलण्यावरुन पोलिसांना दिसते. पोलिसांनी तिचा सीडीआर (कॉल तपशील रेकॉर्ड) मागवला आहे. गुरुवारी सूचना हिचे वकील तिला कळंगुट पोलीस स्थानकात येऊन भेटले.

खून प्रकरणाशी निगडित कुठलीच माहिती सूचना पोलिसांना देत नाही. ती पोलीस कोठडीत चहा-कॉफी तसेच फिशकरी राईस जेवण जेवते.

सूचना हिच्यावर बंगळुरुमध्ये पेरंटल (पालकत्व) थेरपी उपचार सुरू होते. तिला जवळचा असा मित्रपरिवार नाही. तिच्या आईचे बऱ्याच वर्षापूर्वी निधन झाले असून, वडिलांशी तिचे बोलणे नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सूचना ही चिन्मयसोबत दोन वेळा गोव्यात येऊन गेली. एकदा ती कांदोळीमध्ये तर दुसऱ्यांदा वार्कामध्ये हॉटेलात उतरली होती.

सूचना हिचा पूर्वाश्रमीचा पती व्यंकटरामन हा शनिवार, दि. १३ रोजी गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे. 

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले