दिवाळीपर्यंत साखरेची ‘शंभरी’? ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना दरवाढीचा फटका प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

दिवाळीपर्यंत साखरेची ‘शंभरी’? ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना दरवाढीचा फटका

उत्पादनातील घट, गणेशोत्सव, नवरात्र यासारख्या सणासुदीच्या काळातील वाढती मागणी आणि  जागतिक बाजारातील पुरवठ्याची टंचाई यांचा एकत्रित परिणाम साखरेच्या दरावर होत असून दिवाळीपर्यंत साखर शंभरी गाठण्याची भीती व्यक्त होत आहे.

Swapnil S

मुंबई : उत्पादनातील घट, गणेशोत्सव, नवरात्र यासारख्या सणासुदीच्या काळातील वाढती मागणी आणि  जागतिक बाजारातील पुरवठ्याची टंचाई यांचा एकत्रित परिणाम साखरेच्या दरावर होत असून दिवाळीपर्यंत साखर शंभरी गाठण्याची भीती व्यक्त होत आहे.

ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेचे वाढलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने १० लाख टन कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कच्ची साखर ब्राझीलमधून येणार असून त्या साखरेवर गुजरात आणि पश्चिम बंगालमधील कारखान्यात प्रक्रिया केली जाईल. ही साखर प्रत्यक्ष बाजारात येण्यास ऑक्टोबर-नोव्हेंबर महिना उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत सर्वसामान्य ग्राहकांना    साखर कडू लागणार आहे.

गेल्या महिन्यात २० जुलै पर्यंत किरकोळ बाजारात साखरेचा प्रतिकिलो दर ५० रुपये इतका होता. मात्र, गेल्या काही दिवसात साखरेच्या दराने उसळी घेऊन सोमवारी साखरेचा दर ६५ रुपयांपर्यंत पोहोचला.

साखरेच्या दरवाढीसाठी इथेनॉल निर्मितीला जबाबदार धरण्यात येत असले तरी त्यात तथ्य नसल्याचे सांगण्यात येते. इथेनॉल निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या साखरेचे प्रमाण मागील काही वर्षांत कमी झाले आहे. इथेनॉलसाठी २०२२-२३ मध्ये वापरल्या जाणाऱ्या साखरेचा वाटा सुमारे १२ टक्के होता. २०२५-२६ मध्ये तो सुमारे ९ टक्क्यांवर आला. या शिवाय देशात    तयार होणाऱ्या इथेनॉलपैकी जवळपास ७५ टक्के    इथेनॉल धान्यापासून, विशेषतः मक्यापासून तयार होते. त्यामुळे सध्याच्या साखर दरवाढीचे  खापर इथेनॉल धोरणावर फोडणे योग्य ठरणार नसल्याचे साखर अभ्यासकांचे म्हणणे आहे.

नियोजन चुकले

२०२५-२६ च्या ऊस गाळप हंगामात देशातील साखर उत्पादनाचा अंदाज आणि नियोजन चुकल्याने साखरेचे दर वाढल्याचे कारण आता पुढे येत आहे. सुरुवातीला ऊस उत्पादक राज्यांकडून सुमारे ३४३ लाख मेट्रिक टन साखर    उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, सुधारित अंदाजानुसार उत्पादन सुमारे ३०६ लाख टन राहण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या अंदाजाच्या तुलनेत सुमारे ३७ लाख मेट्रिक टनाची घट झाल्याने साखर दरवाढीची समस्या उद्भवल्याचे सांगण्यात येते.

सध्या साखरेचे दर इथेनॉलमुळे वाढले आहेत, असे म्हणता येणार नाही. कारण यापूर्वी ‘सी हेवी मोलायसीस’पासून इथेनॉल निर्मिती होत होती. ती आता ‘बी हेवी मोलायसीस’ पासून तयार होत आहे. त्यामुळे साखर दरवाढीचे खापर    केवळ इथेनॉलवर फोडता येणार नाही. साखरेसह खाद्यतेल, शेंगदाणा यांचेही दर वाढले आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.
बाळासाहेब पाटील,अध्यक्ष, सह्याद्री सहकारी साखर कारखाना, कराड, जि. सातारा

CJP ची दिल्लीत उद्या तिरंगा रॅली; सरकार देशात अघोषित आणीबाणी लादतंय - अभिजित दीपकेंचा आरोप

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क घेतल्यास महाविद्यालयांवर होणार कारवाई, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश

विहिरी, बोअरवेलने गाठला तळ; ग्रामीण जनजीवन विस्कळीत होण्याची भीती

... तर द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होतील; भारत-चीन सीमावादावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा स्पष्ट इशारा

दिवाळीभेट! शेतकऱ्यांना पाच हजाराची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर