बांधकाम नियमांचे सर्रास उल्लंघन - सर्वोच्च न्यायालय  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

बांधकाम नियमांचे सर्रास उल्लंघन - सर्वोच्च न्यायालय

बांधकाम नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांशी महापालिका अधिकाऱ्यांचे संगनमत आहे का, असा सवाल उपस्थित करीत सर्वोच्च न्यायालयाने, देशभरातील शहरांमध्ये बांधकाम नियमांचे उघडपणे उल्लंघन होत असल्याबद्दल सोमवारी चिंता व्यक्त केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : बांधकाम नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांशी महापालिका अधिकाऱ्यांचे संगनमत आहे का, असा सवाल उपस्थित करीत सर्वोच्च न्यायालयाने, देशभरातील शहरांमध्ये बांधकाम नियमांचे उघडपणे उल्लंघन होत असल्याबद्दल सोमवारी चिंता व्यक्त केली आहे. देशभरात बांधकाम नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे पाहून आम्हाला चिंता वाटते. कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांनीच ती पार पाडली नाही, तर कायद्याचे राज्य निरर्थक ठरते, असे खंडपीठाने म्हटले.

अनधिकृत बांधकामाशी संबंधित प्रकरणाची सुनावणी करताना न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. संजीव सचदेवा यांच्या खंडपीठाने मंजूर बांधकाम आराखड्याचे उल्लंघन होत असताना महापालिका अधिकारी त्याला परवानगी देत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. नियमांचे उल्लंघन होत असताना अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर बांधकाम पाडून टाकण्याचे आदेशही अंमलात आणत नाहीत, असे न्यायालयाने नमूद केले.

‘आराखडा मंजूर करण्यासाठी किती पैसे दिले जातात? बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर तपासणी होत असताना किती पैसे दिले जातात? पाडकाम होऊ नये यासाठी संबंधित व्यक्ती किती पैसे देते?’ असे प्रश्न न्या. नागरत्ना यांनी उपस्थित केले. शहरे ही केवळ वैयक्तिक मालमत्ता आणि वसाहतींचा समूह नसून सर्वांची सामायिक नागरी स्थळे आहेत, असे खंडपीठाने अधोरेखित केले. बांधकाम नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रस्ते, ड्रेनेज व्यवस्था आणि वाहतूक क्षमतेसह नागरी पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान होते. नागरिकांनी आपल्या मूलभूत कर्तव्यांचे पालन करावे, असे आवाहनही न्यायालयाने केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गुरुवारी, शुक्रवारी पाणीबाणी; धारावी, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, भांडुपमध्ये पाणी नाही

अतिवेगाचे १३ बळी; राज्यात विविध अपघातांत २८ जखमी, १० गंभीर

Mumbai : आता १३०० झाडांचा बळी; गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी पालिकेने झाडांवर चिकटविल्या नोटिसा

नफावसुलीने पडझड; सेन्सेक्स १,४८४ अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे ५.१९ लाख कोटी बुडाले

नेपाळला १५ हजार कोटींच्या मदतीचे पॅकेज; पंतप्रधान मोदी-बालेन शाह यांची आठ करारांवर स्वाक्षरी