एन. चंद्रा यांचा अखेर 'टाटा'! TATA समूहातील सत्तासंघर्ष तीव्र; नोएल टाटा यांच्यासोबत वाद 
राष्ट्रीय

एन. चंद्रा यांचा अखेर 'टाटा'! TATA समूहातील सत्तासंघर्ष तीव्र; नोएल टाटा यांच्यासोबत वाद

'चंद्रा' नावाने ओळखले जाणारे ६३ वर्षीय चंद्रशेखरन यांनी टाटा समूहात ४० वर्षे सेवा बजावली आहे. बुधवारी झालेल्या टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांनी पुढील कार्यकाळासाठी उत्सुक नसल्याचे स्पष्ट केले. पदभाराचे हस्तांतरण सुरळीत व्हावे, यासाठी लवकरात लवकर उत्तराधिकाऱ्याची निवड करावी, अशी विनंती त्यांनी संचालक मंडळाला केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन २० फेब्रुवारी २०२७ रोजी त्यांचा सध्याचा कार्यकाळ संपल्यानंतर आपल्या पदावरून पायउतार होणार आहेत. त्यांच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात भारतातील सर्वात प्रभावशाली कॉर्पोरेट समूहाचा विस्तार आणि आकार वाढला. मात्र, पुन्हा नियुक्तीच्या मुद्द्यावरून टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांच्यासोबत झालेल्या मतभेदांनंतर त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

'चंद्रा' नावाने ओळखले जाणारे ६३ वर्षीय चंद्रशेखरन यांनी टाटा समूहात ४० वर्षे सेवा बजावली आहे. बुधवारी झालेल्या टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांनी पुढील कार्यकाळासाठी उत्सुक नसल्याचे स्पष्ट केले. पदभाराचे हस्तांतरण सुरळीत व्हावे, यासाठी लवकरात लवकर उत्तराधिकाऱ्याची निवड करावी, अशी विनंती त्यांनी संचालक मंडळाला केली आहे.

चंद्रशेखरन यांचा हा निर्णय त्यांच्या फेरनियुक्तीवरून गेल्या ६ महिन्यांपासून सुरू असलेल्या कोंडीनंतर आला असून, यामुळे टाटा सन्सच्या प्रमुखपदी त्यांचा अभूतपूर्व तिसरा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे.

फेरनियुक्तीवरून ६ महिन्यांचा तिढा

टाटा सन्स ही मुख्य होल्डिंग कंपनी असून ती टाटा समूहातील ३० पेक्षा जास्त कंपन्यांचे (ज्यात टीसीएस, टाटा मोटर्स आणि एअर इंडिया यांचा समावेश आहे) नियंत्रण करते. टाटा सन्समध्ये 'टाटा ट्रस्ट्स'ची एकूण ६६% मालकी आहे. त्यामुळे समूहाच्या प्रशासनावर (गव्हर्नन्स) या धर्मादाय ट्रस्टचे मुख्य नियंत्रण असते.

नोएल यांनी मागितले स्पष्टीकरण

चंद्रा यांनी संचालकाचे नाव घेतले नसले, तरी २०२४ मध्ये रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष झालेले नोएल टाटा यांनी चंद्रा यांना नवीन कार्यकाळ देण्यापूर्वी काही मुद्द्यांवर अटी व स्पष्टीकरण मागितले होते.

वादाची कारणे

  • स्ट्रॅटेजिक रोडमॅप : समूहाच्या पुढील ५ वर्षांच्या रणनीतीबाबत अधिक स्पष्टतेची मागणी

  • नव्या व्यवसायांतील तोटा : नवीन सुरू केलेल्या व्यवसायांमधील वाढत्या तोट्यावर नियंत्रण

  • शापूरजी पालनजी ग्रुपला एक्झिट : टाटा सन्सला शेअर बाजारात लिस्ट न करता शापूरजी पालनजी समूहाला बाहेर पडण्याचा मार्ग शोधणे

  • टाटा सन्सचे लिस्टिंग : टाटा सन्सच्या आयपीओबाबत चंद्रा यांची भूमिका. (चंद्रा यांनी 'टाटा सन्स कधीही लिस्ट होणार नाही' असे आश्वासन देण्यास नकार दिला होता. यामुळे वाद अधिकच वाढला.)

संचालक मंडळाला लिहिलेल्या पत्रात...

टाटा समूहात मी व्यावसायिक आयुष्याची ४० वर्षे पूर्ण केली आहेत. मी आज सकाळीच टाटा सन्सच्या बोर्डाला कळवले आहे की, २० फेब्रुवारी २०२७ रोजी कार्यकाळ संपल्यानंतर मी पुन्हा नियुक्ती स्वीकारणार नाही. सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टने माझा पुढील कार्यकाळ वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर करून शिफारस केली होती. टाटा सन्सच्या 'नामांकन आणि वेतन समिती'ने व बोर्डाने त्याची शिफारस केली होती. हा प्रस्ताव २४ फेब्रुवारी २०२६ रोजी टाटा सन्सच्या बोर्डासमोर मांडण्यात आला. बोर्डातील एका सदस्याने पाठिंबा न दिल्याने हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. परिणामी मी या निर्णयाला स्थगिती देण्याचा पर्याय निवडला. - (टाटा समुहाला लिहिलेल्या पत्रात चंद्रशेखरन)

मी खरोखर भारावून गेलो आहे...

टाटा सन्सचे नेतृत्व करायला मिळणे हे मी माझा मोठा सन्मान समजतो. तसेच ती माझी मोठी जबाबदारी मानतो. गेल्या काही वर्षांत टाटा समूह आणि एकूणच समुहातील विविध कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या प्रेमाने आणि आदराने मी खरोखर भारावून गेलो आहे. टाटा हे एक निश्चितच आदरणीय नाव आहे आणि ते तुमच्यासारख्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच आहे, यात शंका नाही. नेतृत्वाच्या बदलाबाबत सुरू असलेल्या कोणत्याही अफवा, तर्कवितर्क किंवा कटकारस्थानांच्या चर्चांकडे अजिबात लक्ष देऊ नका. टाटा समूह सातत्याने प्रगती करत राहील आणि कर्मचाऱ्यांना संस्थेत विकासाच्या नव्या संधी मिळत राहतील. - (टाटा समुहाच्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात चंद्रशेखरन)

नवीन अध्यक्षांसमोर असतील ही आव्हाने

  • एअर इंडियाचा कायापालट: सेवेचा दर्जा सुधारणे आणि तोटा कमी करणे

  • सेमीकंडक्टरचा विस्तार : टाटा इले.चे प्रकल्प वेळेत पूर्ण करणे

  • नफ्यात वाढ: टाटा डिजिटल, नव व्यवसायांमधून परतावा मिळवणे

  • पारंपारिक कंपन्यांचे रक्षण : टीसीएस, टाटा मोटर्स, टायटनसारख्या कंपन्यांचे स्थान मजबूत ठेवणे

  • संस्थेचे गव्हर्नन्स: टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट्समधील संबंध पूर्ववत करणे, लिस्टिंगचा तिढा सोडवणे

  • मोठ्या भांडवलाची गरज : डिजिटल आणि ई-कॉमर्स व्यवसायांनाही नफा मिळवण्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज भासत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेकडे होणाऱ्या बदलांमुळे तंत्रज्ञान क्षेत्रावर दबाव आहे.

प्रमुख यश आणि धोरणात्मक निर्णय

  • नव्या क्षेत्रांत प्रवेश : एव्हिएशन, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, बॅटरी आणि डिजिटल कॉमर्स यांसारख्या आधुनिक क्षेत्रांत आक्रमक विस्तार

  • एव्हिएशनचे एकत्रीकरण : २०२२ मध्ये केंद्र सरकारकडून एअर इंडियाची खरेदी; एअर इंडिया, विस्तार, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एआयएक्स कनेक्टचे एकत्रिकरण

  • डिजिटल व टेक अधिग्रहण : टाटा डिजिटलद्वारे 'बिगबास्केट' आणि '१एमजी'मध्ये बहुसंख्य भागभांडवल. सेमीकंडक्टरसाठी 'टाटा इलेक्ट्रॉनिक्स'ची उभारणी

  • पोर्टफोलिओचे एकत्रीकरण : टाटा कॉफीचे टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्समध्ये विलीनीकरण; तसेच टिनप्लेट, टाटा मटॅलिक्स आणि टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्सचे टाटा स्टीलमध्ये विलीनीकरण

  • नवीन आयपीओ : टाटा टेक्नॉलॉजीज, टाटा कॅपिटलच्या भागधारकांसाठी मूल्यनिर्मिती

विस्ताराचे आणि प्रगतीचे एक दशक

  • कारकिर्दीची सुरुवात : १९८७ मध्ये टीसीएसमध्ये इंटर्न म्हणून रुजू

  • नेतृत्व : २००९ मध्ये टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि २०१७ मध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष

  • ऐतिहासिक महत्त्व : टाटा सन्सचे पहिले पारशीत्तर अध्यक्ष. २०१६ मधील वादळानंतर समूहात स्थिरता आणण्याचे श्रेय

आर्थिक कामगिरीची आकडेवारी (२०२४-२५)

एकूण महसूल - $१८० अब्ज डॉलरपेक्षा जास्त

एकूण कर्मचारी संख्या - १० लाखांहून अधिक

समूहाचे बाजार भांडवल - $३२८ अब्ज डॉलरपेक्षा जास्त

राजीनाम्याची घोषणा, शेअरचे आपटणे!

टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सध्याचा कार्यकाळ संपल्यानंतर पुनर्नियुक्तीची मागणी करणार नसल्याचे जाहीर झाल्यानंतर बुधवारी टाटा समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाली. यामध्ये टीसीएसचा शेअर सर्वाधिक ४ टक्क्यांनी घसरला.

टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स २.४४ टक्क्यांनी, टाटा एलेक्सी २.२३ टक्क्यांनी, टाटा मोटर्स १.९२ टक्क्यांनी, टाटा स्टील १.५७ टक्क्यांनी घसरले. रॅलिस इंडिया ०.९५ टक्क्यांनी, ट्रेंट ०.८६ टक्क्यांनी, टाटा पॉवर ०.५३ टक्क्यांनी, इंडियन हॉटेल्स ०.५२ टक्क्यांनी, टाटा कम्युनिकेशन्स ०.३७ टक्क्यांनी, टायटन ०.१८ टक्क्यांनी घसरले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणणार; महसूलमंत्र्यांचे आदेश; कर्जमाफी, शासकीय योजनांचा मिळणार लाभ

मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वेवर 'जीन्सराज'; महामार्गच बनला 'जीन्स सुकवण्याचा अड्डा'!

मुंबईत दरडींची टांगती तलवार! ७४ ठिकाणे धोकादायक तर ४६ ठिकाणे अतिधोकादायक

आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही; कराडमध्ये मनोज जरांगे-पाटील यांची गर्जना

मुंबईत नवी सुरुवात करण्याचे स्वप्न भंगले! घाटकोपर दरडीत शेख कुटुंबाचा करुण मृत्यू, चार दिवसांपूर्वीच मुंबईत आलेले कुटुंब उद्ध्वस्त