राष्ट्रीय

काँग्रेसने आणले ‘भाजप धुलाई यंत्र’, ‘भाजपमध्ये या, भ्रष्टाचाराची फाइल बंद करा’

Swapnil S

नवी दिल्ली : काँग्रेसने पत्रकार परिषदेत शनिवारी व्यासपीठावर धुलाई यंत्र (वॉशिंग मशीन) ठेवले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या २०१७ मधील भ्रष्टाचार प्रकरणाची फाइल सीबीआयने बंद केल्यावरून भाजपला टोला लगावला. भाजपच्या या पूर्णत: स्वयंचलित धुलाई यंत्राचे वैशिष्ट्य ‘भाजपमध्ये प्रवेश करा, भ्रष्टाचाराची फाइल बंद करा’ हे असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

इतर पक्षांतील ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ते नेते भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अथवा भाजपसमवेत गेल्यानंतर त्यांच्याविरुद्धच्या प्रकरणांची फाइल बंद केली जाते, हा मुद्दा काँग्रेसने पुन्हा एकदा उपस्थित केला.

काँग्रेसचे माध्यम आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यासपीठावर हे धुलाई यंत्र ठेवले. ‘भ्रष्टाचार, घोटाळा’ असे लिहिलेले, खराब झालेले टी-शर्ट धुलाई यंत्रात टाकले आणि त्यानंतर ‘भाजप, मोदी धुलाई’ असे लिहिलेला स्वच्छ टी-शर्ट यंत्राबाहेर काढून दाखविला.

‘सारे दाग चुटकी में धुले’ टॅगलाईन

यावेळी ‘सारे दाग चुटकी में धुले’ अशी टॅगलाईन असलेले पत्रकही वाटण्यात आले. त्यावर मोदी यांचे छायाचित्र होते. प्रफुल्ल पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच सीबीआयने २०१७ मधील त्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची फाइल बंद केली. भाजपने २०१४ मध्ये आपल्या आरोपपत्रात त्याचा उल्लेख केला होता. एअर इंडिया घोटाळा २५ हजार ते ३० हजार कोटी रुपयांचा होता, असे भाजपने म्हटले होते, असेही खेरा म्हणाले.

यावेळी खेरा यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, नारायण राणे, अजित पवार, अशोक चव्हाण यांच्याविरुद्धही आरोप करण्यात आल्याचे नमूद केले. मात्र, ते भाजपमध्ये गेल्यावर सारे काही शांत झाले. ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा, अगर भाजप जॉइन करो तो केसेस रफा-दफा कर दूंगा’, अशी टीकाही खेरा यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस