नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक वैध ठरविण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केली असली तरी त्यावर तातडीने सुनावणी होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याच्या प्रकरणात आपण लक्ष देऊ, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केले आणि केजरीवाल यांच्या वकिलांना त्याबाबत ई-मेल पाठिवण्यास सांगितले आहे.
त्यापूर्वी केजरीवाल यांनी उच्च न्यायालयाने ९ एप्रिल रोजी दिलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर लवकर सुनावणी घेण्याची मागणी करणारा ई-मेल पाठवावा, आपण त्यामध्ये लक्ष देऊ, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केजरीवाल यांचे वकील अभिषेक सिंघवी यांना सांगितले.
सदर प्रकरण दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित असून तातडीचे आहे, ज्यावर विश्वास ठेवता येणार नाही, अशा दस्तावेजांच्या आधारावर आणि तो दस्तावेज आमच्यापासून दडवून केजरीवाल यांना अटक करण्यात आली, असे सिंघवी म्हणाले. दिल्ली मद्यधोरण घोटाळाप्रकरणी केजरीवाल यांना करण्यात आलेली अटक उच्च न्यायालयाने मंगळवारी वैध ठरविली होती. सक्तवसुली संचालनालयाने सातत्याने पाठविलेली समन्स केजरीवाल यांनी धुडकावून लावली होती आणि चौकशीला सामोरे जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे सक्तवसुली संचालनालयाकडे अन्य पर्याय नव्हता, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते.