कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाला महिना उलटत नाही तोच, महाराष्ट्रातील ‘शिवसेना-राष्ट्रवादी’च्या बंडाचा पॅटर्न तेथे पाहायला मिळत आहे. पराभवानंतर आता ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले नेते रिजू दत्ता यांनी दावा केला आहे की, तृणमूलच्या ८० आमदारांपैकी ५० हून अधिक आमदार एकत्र आले असून ते स्वतःला ‘अधिकृत तृणमूल काँग्रेस’ म्हणून घोषित करण्याच्या तयारीत आहेत.
विरोधी पक्षनेत्याच्या निवडीपासून हे नाट्य सुरू झाले. या पदावर शोभनदेव यांची निवड करण्याची मागणी करणारे एक पत्र दोन दिवसापूर्वी प्रसृत झाले. पण या पत्रावर बनावट सह्या केल्याचा आरोप ऋताब्रत बॅनर्जी आणि संदीप साहा यांनी केला. त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यामुळे पक्षात आणखी असंतोष पसरला आहे. पक्षाने तातडीने दोन आमदारांची हकालपट्टी करून बंड शमवण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्या रात्रीच ६१ पैकी बहुतांश आमदारांनी पक्षाच्या अधिकृत बैठकीला दांडी मारून आमदारांच्या हॉस्टेलमध्ये गुप्त बैठक घेतली. गेल्या दोन दिवसांपासून पक्षाने बोलावलेल्या बैठकांना बहुसंख्य आमदारांनी दांडी मारली. आज ममतांनी केलेल्या धरणे आंदोलनातही जेमतेम वीस आमदार हजर होते.
दरम्यान, ‘पक्षांतर आणि फुटीच्या कितीही अफवा असल्या, तरी पक्षाचे बहुतांश आमदार माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबतच खंबीरपणे उभे राहतील. तृणमूलचे जुने आणि निष्ठावान नेतेच संघटनेवर आपले नियंत्रण कायम राखतील’, असा दावा शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी केला आहे.
भानगडी करून भाजपचा विजय- ममता
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने २९४ पैकी १७७ जागांवर ‘मतमोजणीत फेरफार’ करून विजय मिळवला असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी केला. भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात मध्य कोलकात्यात आयोजित एका दिवसीय धरणे आंदोलनादरम्यान ममता बॅनर्जी बोलत होत्या.
निवडणुकीनंतर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर होणारे हल्ले, भ्रष्टाचार व धमकावल्याच्या आरोपांखाली होत असलेल्या अटकेच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, ममता बॅनर्जी यांनी "या कठीण काळात" तृणमूलच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त केला.