इंटरनेटशिवाय UPI पेमेंट? RBI च्या नव्या सुविधेने काय बदलणार? जाणून घ्या सविस्तर 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

इंटरनेटशिवाय UPI पेमेंट? RBI च्या नव्या सुविधेने काय बदलणार? जाणून घ्या सविस्तर

या सुविधेअंतर्गत यूपीआयशी लिंक असलेल्या विविध खात्यांमधून पेमेंट करता येणार आहे. यूपीआयशी लिंक केलेल्या रुपे क्रेडिट कार्डचाही यात समावेश आहे.

किशोरी घायवट-उबाळे

यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी आता आणखी एक सोयीची सुविधा उपलब्ध होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 'UPI Tap and Pay' ही नवी सुविधा सादर केली आहे. या सुविधेमुळे मोबाइलमध्ये इंटरनेट कनेक्शन सक्रिय नसतानाही एनएफसी (Near Field Communication) सक्षम स्मार्टफोनच्या मदतीने दुकानातील पेमेंट करता येणार आहे. यासाठी फोन अनलॉक करून तो एनएफसी-सक्षम पॉइंट ऑफ सेल (POS) मशीनवर टॅप करावा लागणार आहे.

RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी १० सप्टेंबर रोजी या सुविधेची घोषणा केली. डिजिटल पेमेंट अधिक सोपे करण्यासोबतच ग्राहकांची सुरक्षितता आणि सहाय्य व्यवस्था मजबूत करण्याच्या उद्देशाने या नव्या सुविधा आणण्यात आल्या आहेत.

Tap and Pay कसे काम करणार?

UPI Tap and Pay ही सुविधा कॉन्टॅक्टलेस कार्ड पेमेंटप्रमाणे काम करणार आहे. एनएफसीची सुविधा असलेला स्मार्टफोन अनलॉक करून ग्राहकाने तो संबंधित POS मशीनवर टॅप करायचा आहे. त्यानंतर POS मशीनच्या इंटरनेट कनेक्शनच्या माध्यमातून पेमेंटची प्रक्रिया पूर्ण होईल.

मात्र, याचा अर्थ UPI आता पूर्णपणे इंटरनेटशिवाय चालणार आहे, असा नाही. ग्राहकाच्या मोबाइलमध्ये इंटरनेट नसले तरी व्यवहारासाठी दुकानातील POS मशीनचे इंटरनेट कनेक्शन वापरले जाऊ शकते.

या सुविधेअंतर्गत यूपीआयशी लिंक असलेल्या विविध खात्यांमधून पेमेंट करता येणार आहे. यूपीआयशी लिंक केलेल्या रुपे क्रेडिट कार्डचाही यात समावेश आहे.

५ हजार रुपयांपर्यंत पिनची गरज नाही

या सुविधेचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे छोट्या रकमेच्या व्यवहारांसाठी यूपीआय पिन टाकण्याची गरज भासणार नाही. ५ हजार रुपयांपर्यंतचे पेमेंट पिनशिवाय करता येणार आहे. मात्र, ५ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारासाठी POS मशीनवर यूपीआय पिन टाकावा लागेल.

विशेषतः दुकानात पेमेंट करताना मोबाइल डेटा उपलब्ध नसलेल्या ग्राहकांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरू शकते.

MyUPI मधून ग्राहकांना अधिक नियंत्रण

Tap and Pay सोबतच RBI ने MyUPI हे एआय-आधारित ग्राहक सहाय्य प्लॅटफॉर्मही सादर केले आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने हे प्लॅटफॉर्म विकसित केले आहे.

MyUPI च्या माध्यमातून विविध बँका आणि यूपीआय ॲप्समधील व्यवहारांची माहिती एका ठिकाणी पाहता येणार आहे. तसेच ऑटोपे मँडेट्सची माहितीही उपलब्ध होईल. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या यूपीआय व्यवहारांवर अधिक नियंत्रण ठेवता येणार आहे.

खाते धोक्यात आल्यास 'सेफ्टी स्विच'

MyUPI मध्ये 'सेफ्टी स्विच' ही महत्त्वाची सुविधा देण्यात आली आहे. आपल्या यूपीआय खात्याचा गैरवापर होत असल्याचा संशय आल्यास ग्राहक या सुविधेच्या मदतीने यूपीआय डेबिट व्यवहार थांबवण्याची विनंती करू शकतात.

तसेच UPI Number Delink सुविधेमुळे मोबाइल क्रमांकाच्या माध्यमातून यूपीआय पेमेंट स्वीकारणे बंद करता येणार आहे.पेमेंट करण्यापूर्वी लाभार्थ्याबाबत अतिरिक्त माहिती मिळण्याची सुविधाही देण्यात येणार आहे. पात्र व्यवहारांसाठी स्वयंचलित चार्जबॅकची सुविधाही उपलब्ध होईल.

जुना व्यवहार पुन्हा करता येणार

Transaction Replay या सुविधेमुळे ग्राहकांना यापूर्वी केलेला यूपीआय व्यवहार पुन्हा पाहता येणार असून, त्याच पद्धतीने व्यवहाराची पुनरावृत्ती करणेही सोपे होणार आहे.

यूपीआय वापरणाऱ्यांची संख्या मोठी

भारताच्या डिजिटल पेमेंट व्यवस्थेत यूपीआयचा मोठा वाटा आहे. NPCI च्या माहितीनुसार, देशातील डिजिटल व्यवहारांपैकी सुमारे ८९ टक्के व्यवहार यूपीआयद्वारे होतात. त्यामुळे नव्या सुविधांमधून यूपीआय पेमेंट अधिक सोपे, सुरक्षित आणि ग्राहकांसाठी नियंत्रणात ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.

Tap and Pay आणि MyUPI या दोन्ही सुविधांमुळे यूपीआयचा वापर करण्याचा अनुभव बदलण्याची शक्यता आहे. पेमेंट करण्यासोबतच व्यवहारांची माहिती, सुरक्षितता आणि खात्यावरील नियंत्रण यावरही आता अधिक भर दिला जाणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मोर्चा मुंबईत धडकणार, जाण्याचा मार्गही ठरला

महाबळेश्वर-पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग सुरू; मजूर टंचाई, वाढती रोजंदारी आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी चिंतातूर

SRA कडून ४५० हून अधिक निष्क्रिय विकासकांची हकालपट्टी

Ganeshotsav 2026 : मुंबईकरांना घरबसल्या मिळणार उकडीचे अन् तळलेले मोदक; BMC च्या महिला बचत गटांचा खास उपक्रम

व्यापारासाठी नौकानयनाचे स्वातंत्र्य महत्त्वाचे - पंतप्रधान नरेंद्र मोदी