

आज अगदी चहा, भाजी, किराणा, रिक्षा, टॅक्सीपासून ते मोठ्या खरेदीपर्यंत बहुतांश व्यवहार UPI द्वारेच केले जातात. त्यामुळे अनेकजण आता खिशात रोख रक्कम ठेवण्याऐवजी मोबाईलवरच अवलंबून असतात. मात्र, इंटरनेट नसणे किंवा नेटवर्क अचानक गायब होणे ही अनेकांची डोकेदुखी ठरते आणि पेमेंटच्या वेळी मोठी पंचाईत होते. आता याच समस्येवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) इंटरनेटशिवायही २ हजार रुपयांपर्यंत UPI पेमेंट करता येईल, अशी नवी सुविधा विकसित करत आहे.
इंटरनेटशिवाय कसं होणार UPI पेमेंट?
या नव्या सुविधेमध्ये NFC (Near Field Communication) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. NFC सपोर्ट असलेला स्मार्टफोन प्रमाणित PoS (Point of Sale) मशीनवर टॅप केल्यानंतर इंटरनेट नसतानाही पेमेंट करता येणार आहे. या सुविधेमुळे एकावेळी २ हजार रुपयांपर्यंतचा व्यवहार ऑफलाइन करता येईल.
आधी UPI Lite Wallet मध्ये पैसे भरावे लागतील
ही सुविधा वापरण्यासाठी ग्राहकांनी इंटरनेट उपलब्ध असताना UPI Lite Wallet मध्ये आधी पैसे (Balance) लोड करावे लागतील. त्यानंतर इंटरनेट नसतानाही त्या शिल्लक रकमेचा वापर करून पेमेंट करता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, ऑफलाइन व्यवहार करताना UPI PIN टाकण्याची गरज भासणार नाही.
कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
ही सुविधा विशेषतः अशा ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे, जिथे इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्कची समस्या असते.
विमान प्रवासादरम्यान
मेट्रो किंवा भूमिगत वाहतूक मार्गांमध्ये
दुर्गम आणि ग्रामीण भागात
नेटवर्क वारंवार खंडित होणाऱ्या परिसरात
अशा ठिकाणीही आता डिजिटल पेमेंट सहज करता येणार आहे.
PoS मशीनना NPCI कडून प्रमाणपत्र आवश्यक
या सुविधेसाठी वापरल्या जाणाऱ्या PoS मशीनना NPCI कडून प्रमाणित (Certification) केले जाणार आहे. त्यानंतरच संबंधित कंपन्या या सुविधेचा वापर आपल्या मशीनमध्ये करू शकतील.
ऑफलाइन झालेल्या व्यवहारांची माहिती PoS मशीनमध्ये तात्पुरती साठवली जाईल. इंटरनेट सुरू झाल्यानंतर ही माहिती पडताळणीसाठी सर्व्हरवर पाठवली जाईल.
UPI Lite X पेक्षा काय वेगळं?
NPCI ने २०२३ मध्ये UPI Lite X सुरू केले होते. त्यामध्ये NFC आधारित ऑफलाइन व्यवहारांची सुविधा होती. मात्र, ती मर्यादित स्वरूपात होती. आता प्रस्तावित नव्या सुविधेमुळे प्रमाणित व्यापारी PoS मशीनवरही इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करता येणार आहे. त्यामुळे ऑफलाइन डिजिटल पेमेंटचा वापर अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे.
सध्या ही सुविधा विकसित करण्याचे काम सुरू असून, NPCI कडून PoS टर्मिनल्सना प्रमाणित केल्यानंतर ती टप्प्याटप्प्याने सुरू होण्याची शक्यता आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर इंटरनेट किंवा नेटवर्क नसल्यामुळे पेमेंट अडकण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.