माझं नाव 'मोहम्मद दीपक': ७० वर्षीय मुस्लिम दुकानदाराची बाजू घेतल्याने तरुणावर FIR; तरीही म्हणतो- 'पश्चाताप नाही, कोणीतरी बोलायलाच हवं'  छाया सौजन्य : X
राष्ट्रीय

माझं नाव 'मोहम्मद दीपक': ७० वर्षीय मुस्लिम दुकानदाराची बाजू घेतल्याने तरुणावर FIR; तरीही म्हणतो- 'पश्चाताप नाही, कोणीतरी बोलायलाच हवं'

“मी जे बोललो, त्याचा मला पश्चात्ताप नाही. माझं नाव ‘मोहम्मद दीपक’ सांगणं हे योग्यच होतं. मी फक्त...

Krantee V. Kale

कोटद्वार (उत्तराखंड) : "कोणीतरी आवाज उठवायलाच हवा…" या भूमिकेवर उत्तराखंडमधील कोटद्वार शहरातील दीपक कुमार ठाम आहे. २६ जानेवारी रोजी एका ७० वर्षीय मुस्लिम दुकानदाराच्या धार्मिक ओळखीवरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या छळाविरोधात उघडपणे आवाज उठवणाऱ्या दीपकवर आता गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याविरोधात निदर्शनांची तयारीही सुरू आहे.

कोटद्वारच्या सर्व प्रवेशद्वारांवर मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले आहे, आणि बिजनौरला लागून असलेल्या कौडिया सीमा चौकीवर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. कोटद्वार शहरातील वातावरण तणावपूर्ण आहे. दीपक याच्या ‘हल्क जिम’ परिसरात पोलीस पहारा वाढवण्यात आला आहे. पोलिसांनी सोमवारी शहरात शांतता आणि सलोखा राखण्यासाठी व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि मुस्लिम समुदायासह समाजातील सर्व घटकांच्या लोकांसोबत एक 'शांतता बैठक' घेतली.

नेमकं काय घडलं होतं २६ जानेवारीला?

२६ जानेवारी रोजी कोटद्वारमधील पटेल मार्गावर ‘बाबा स्कूल ड्रेस’ नावाचे दुकान चालवणारे वकील अहमद (वय ७०) यांना काही तरुणांनी दुकानाच्या नावातील ‘बाबा’ हा शब्द काढून टाकण्याची धमकी दिली. अहमद हे पार्किन्सन आजाराने त्रस्त आहेत. याच वेळी जवळच असलेल्या मित्राच्या दुकानात उपस्थित असलेल्या दीपक कुमारने हा प्रकार पाहून हस्तक्षेप केला. “हिंदू दुकानदार ‘बाबा’ नाव वापरू शकतात, मग ३० वर्षांपासून चालणाऱ्या या दुकानाला नाव बदलायला का सांगताय?” असा सवाल त्याने केला. यावेळी जमावाने दीपकला त्याचं नाव विचारलं, तेव्हा त्याने संतापात उत्तर दिलं - “माझं नाव मोहम्मद दीपक आहे.” या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि दीपक अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आला.

दीपकच्या जिमला घेराव

या व्हिडिओनंतर दीपकविरोधात सोशल मीडियावर अनेक चिथावणीखोर पोस्ट्स व्हायरल झाल्या आणि शनिवारी ४० पेक्षा अधिक लोकांनी कोटद्वारमध्ये घोषणाबाजी करत दीपकच्या जिमला घेराव घातला. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दीपकने सांगितले की, शनिवारचा जमाव सोशल मीडियावर केलेल्या आवाहनानंतर जमला होता. त्याच्या म्हणण्यानुसार, २६ जानेवारीचा व्हिडिओ उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी दीपकला 'धडा शिकवला पाहिजे' असे म्हणत व्हायरल केला होता.

तरीही आमच्यावरच गुन्हा कसा दाखल झाला?

“पोलीस तिथे उपस्थित असतानाही, जमावाने माझ्या आणि माझ्या कुटुंबाबद्दल अत्यंत अपमानास्पद शिवीगाळ केली. मी माझ्या जिममध्ये होतो, आणि ते शब्द ऐकून मी त्यांना जाब विचारण्यासाठी खाली गेलो, पण पोलिसांनी मला आणि माझ्या मित्रालाच पोलीस ठाण्यात नेलं. मी पोलिसांना व्हिडिओ पुरावे दिले, शिवीगाळ करणाऱ्यांची नावे सांगितली. तरीही आमच्यावरच गुन्हा कसा दाखल झाला, हे समजत नाही.” असे तो म्हणाला.

तीन एफआयआर दाखल

या प्रकरणात आतापर्यंत तीन एफआयआर दाखल झाल्या आहेत. एक एफआयर दुकानदार वकील अहमद यांच्या तक्रारीवरून, दुसरी एफआयआर कोटद्वारमधील एका नागरिकाच्या तक्रारीवरून दीपक आणि त्याचा मित्र विजय रावत यांच्याविरोधात, तर तिसरी एफआयआर पोलिसांकडून बजरंग दलाशी संबंधित अज्ञात व्यक्तींविरोधात आहे.

‘मी जे केलं ते योग्यच’

'इंडियन एक्सप्रेस'शी बोलताना दीपकने स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली - “माझं नाव ‘मोहम्मद दीपक’ सांगणं हे योग्यच होतं. मी फक्त देवालाच जबाबदार आहे. धर्मामुळे एका वृद्धाला धमकावले जात होते, तेव्हा त्याच्या बाजूने उभे राहणे हीच माणुसकीची गोष्ट होती. या आंदोलनांमुळे मला काही फरक पडत नाही.” तर, त्याचा मित्र विजय रावत, युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष, म्हणतो, “खासगी दुकानात घुसून नाव बदलायला सांगणं हा गुन्हा नाही का? एफआयआरमुळे अजून जास्त लोक आमच्यासोबत उभे राहत आहेत.”

मला पश्चात्ताप नाही

या सगळ्या घडामोडींमुळे दीपकच्या कुटुंबावर मोठा ताण पडला आहे. त्याची पत्नी मीनाक्षी बिष्ट म्हणते, “मुलगी आजारी आहे. त्यामुळे तिला माझ्या आईकडे पाठवलंय आणि या सगळ्यामुळे तिला आणखी त्रास होईल. दीपकच्या सर्वधर्मीय मित्रांनी जरी साथ सोडलेली नसली तरी परिसरातील किंवा शेजाऱ्यांपैकी कोणीही धीर द्यायला आलं नाही", असेही त्यांनी सांगितले. दीपक लहानपणापासून विविध धर्मीय मित्रांत वाढला. तो म्हणतो, “मी जे बोललो, त्याचा मला पश्चात्ताप नाही. माझ्या आईला एफआयआर आणि जमावाची भीती वाटते, पण मी जे केलं ते अयोग्य होतं असं म्हणत ती मला ओरडलीही नाहीये. असे तो म्हणाला. “मुद्दा हा आहे की, मी एक भारतीय आहे आणि भारतात प्रत्येकाला समान अधिकार आहेत.”

स्थानिक म्हणतात - हस्तक्षेपाची गरज काय होती?

दीपकने त्याच्या कामाशी काम ठेवायला हवे होते. बजरंग दल प्रतिक्रिया देणार हे स्वाभाविकच आहे. ज्या प्रकरणांशी त्याचा काहीही संबंध नाही, त्यात हस्तक्षेप करण्याची काय गरज होती?” असे दीपकच्या जिमसमोर, दुकानदार महेंद्र अग्रवाल (७५) म्हणाले. जनरल स्टोअर चालवणाऱ्या मनीष घंस्याल यांनीही याच मताला दुजोरा दिला.

राज्यात जातीय सलोख्याला बाधा - काँग्रेसची टीका

पौरी गढवालचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सर्वेश पंवार यांनी शांततेचे आवाहन करत सांगितले की,
“दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.” दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सूर्यकांत धस्माना यांनी म्हटले की, “ गेल्या दोन महिन्यांत ईशान्येकडील विद्यार्थ्याची हत्या, काश्मिरी युवकांवरील हल्ले आणि आता कोटद्वारमधील हा प्रकार -उत्तराखंडची प्रतिमा मलिन करणारे आहेत. या घटनांमुळे संपूर्ण राज्यात जातीय सलोख्यालाही बाधा पोहोचत आहे, ज्यावर तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.”

‘एक आवाज दाबला तर दुसरा उठेल’

सर्व दबाव, गुन्हे आणि निदर्शनांनंतरही दीपकचा सूर बदललेला नाही. तो म्हणतो “कोणीतरी बोलायलाच हवं. जर त्यांनी एक आवाज दाबला, तर दुसरा आवाज उठेल.”

उद्याची TET रद्द; पेपरफुटीच्या संशयावरून राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय, भिवंडीत तिघांना अटक

फुकट प्रवासाला नकार दिल्याने रिक्षाचालकाला शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल होताच होमगार्डला कामावरून काढले

५२ वर्षांनंतर सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? मुंबईत समुद्रकिनारी सहा मजली नव्या घराची तयारी

"संघाबद्दल आपुलकी असेल तर ती मनात ठेवा नाहीतर..."; विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरे संतापले

अचानक झाडाची फांदी डोक्यावर पडल्याने दुचाकीस्वार कोमात, घटना सीसीटीव्हीत कैद