वडा खायला घेतला अन् दाताखाली आला लोखंडी बोल्ट; 'वंदे भारत'मधील प्रवाशाचा VIDEO व्हायरल, IRCTC ने दिली प्रतिक्रिया 
राष्ट्रीय

वडा खायला घेतला अन् दाताखाली आला लोखंडी बोल्ट; 'वंदे भारत'मधील प्रवाशाचा VIDEO व्हायरल, IRCTC ने दिली प्रतिक्रिया

वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये बंगळुरूहून बेळगावला जाणाऱ्या प्रवाशाला नाश्त्यातील वड्यात लोखंडी बोल्ट आढळला. प्रवाशाने व्हिडीओ शेअर करत तक्रार केल्यानंतर IRCTC ने संबंधित खाद्यसेवा पुरवठादारावर कारवाई केल्याचं सांगितलं.

Mayuri Gawade

बंगळुरू : वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करताना चांगल्या सुविधांसोबत दर्जेदार जेवण मिळेल, अशी प्रवाशांची अपेक्षा असते. मात्र, बंगळुरूहून बेळगावला जाणाऱ्या एका प्रवाशाला नाश्त्यात दिलेल्या वड्यात चक्क लोखंडाचा मोठा बोल्ट आढळला. वडा खाताना अचानक दाताखाली कठीण वस्तू आल्याने प्रवाशाने तपासून पाहिलं आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्याने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत रेल्वेकडे तक्रार केली. त्यानंतर आयआरसीटीसीने (IRCTC) दिलगिरी व्यक्त करत संबंधित खाद्यसेवा पुरवठादारावर कठोर कारवाई केल्याचं सांगितलं आहे.

वडा खाताना दाताखाली आला लोखंडी बोल्ट

समर्थ कोडियाल असं तक्रार करणाऱ्या प्रवाशाचं नाव आहे. तो वंदे भारत एक्स्प्रेसने बंगळुरूहून बेळगावला प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्याला नाश्त्यासाठी वडा देण्यात आला होता. वडा खात असताना त्याच्या दाताखाली अचानक एक कठीण वस्तू आली. त्याने वडा तपासून पाहिला असता, त्यात लोखंडाचा मोठा बोल्ट असल्याचं दिसलं. त्याने या प्रकाराचा व्हिडीओही तयार केला. वंदे भारतसारख्या प्रीमियम ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात असा प्रकार घडल्याने अन्नाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

प्रवाशाने व्हिडीओ शेअर करत केली तक्रार

समर्थ कोडियालने २७ नोव्हेंबर रोजी एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत रेल्वे प्रशासन आणि आयआरसीटीसीला टॅग केलं. बंगळुरू ते बेळगाव प्रवासादरम्यान दिलेल्या वड्यात लोखंडाचा बोल्ट सापडल्याचं त्यांने सांगितलं. जेवणात अशा प्रकारची वस्तू सापडणं ही गंभीर बाब असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांने केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वेतील जेवणाच्या गुणवत्तेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली.

IRCTC ने काय प्रतिक्रिया दिली?

प्रवाशाच्या तक्रारीला उत्तर देताना आयआरसीटीसीने झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. हे प्रकरण गांभीर्याने घेत संबंधित खाद्यसेवा पुरवठादारावर कठोर कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं. तसंच, स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्यांना अन्न तयार करताना ठरवलेल्या नियमांचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी उपकरणांची नीट तपासणी करावी आणि स्वयंपाकघराची सखोल पाहणी करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

मात्र, संबंधित खाद्यसेवा पुरवठादारावर नेमकी कोणती कारवाई करण्यात आली, याचा तपशील समोर आलेला नाही.

रेल्वेतील जेवणाच्या दर्जावर पुन्हा प्रश्न

रेल्वे प्रवासादरम्यान मिळणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेबाबत यापूर्वीही तक्रारी समोर आल्या आहेत. कधी जेवणात कीटक आढळल्याच्या, तर कधी अन्नाचा दर्जा खराब असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. आता वंदे भारत एक्स्प्रेसमधील वड्यात लोखंडाचा बोल्ट आढळल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. अशी वस्तू चुकून गिळली गेली असती, तर गंभीर दुखापत होण्याचा धोका होता. त्यामुळे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या अन्नाची योग्य तपासणी आणि सुरक्षिततेच्या नियमांचं पालन होणं किती महत्त्वाचं आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झालं आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Afghanistan Blast : अफगाणिस्तानमध्ये शाळेजवळ भीषण स्फोट; ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ९७ जण जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Mumbai : लोकल प्रवाशांची गैरसोय होणार! मध्य रेल्वेसह ट्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवरही दुरुस्तीची कामे, वाचा सविस्तर

Bisleri Water Controversy : बिस्लेरीच्या अडचणीत वाढ; पाण्याच्या नमुन्यात बॅक्टेरिया, FSSAI कडून पुन्हा कारवाई

Mumbai : घाटकोपर रेल्वे स्थानकात संतापजनक प्रकार! महिलांच्या शौचालयात ६० वर्षीय महिलेवर अत्याचार; आरोपी अटकेत

Mumbai : 'त्या' जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण; २३ ठिकाणच्या गळती रोखण्यात BMC ला यश, सहा विभागांचा पाणीपुरवठा पूर्ववत