नवी दिल्ली: सर्व देशाचे लक्ष लागलेल्या पाच विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सोमवारी चार मे होणार आहे. मोजणीला सकाळी आठ वाजता सुरू होईल व दुपारी बारा वाजेपर्यंत राजकीय चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे. सर्वांचे लक्ष मुख्यतः बंगालकडे असून ममता बॅनर्जीना हटवण्यात भाजपला यश येते का हा सर्वत्र औत्सुक्याचा विषय ठरला आहे.
बंगाल (२९४) तमिळनाडू (१४०), (२३४), केरळ आसाम (१२६), पुद्दचेरी (३०) अशा एकूण ८२४ जागांसाठी एप्रिल महिन्यात चार टप्प्यात मतदान झाले होते. यापैकी केवळ आसाम व पुद्दुचेरीमध्ये भाजप व त्याच्या सहकाऱ्यांचे सरकार आहे. अन्य तीन राज्यात आजतागायत भाजपची स्थिती नगण्य राहिली असून तो कधीही सत्तेच्या जवळपासही पोचलेला नाही.
निवडणूक मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजानुसार बंगालमध्ये सत्तापरिवर्तन होण्याची शक्यता आहे. आसाम व पुद्देचेरी भाजपकडेच राहील. तर केरळमध्ये काँग्रेसला व तमिळनाडूमध्ये द्रवीड मुन्नेत्र कळघमला अधिक चांगली संधी आहे.
सर्वच राज्यांमध्ये विक्रमी मतदान झाले असून बंगालमध्ये तर मतदानाची टक्केवारी ९३ टक्के होती. हे इतके वाढीव मतदान आपल्यालाच होईल असा दावा भाजप व प्रतिस्पर्धी तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केला आहे. बंगालमध्ये प्रचार शांततेत पार पडला असला तरी मतदानात गोंधळ झाल्याने एका ठिकाणी फेरमतदान घ्यावे लागले. त्यामुळे निकालानंतर तेथे वातावरण आणखी पेटण्याची शक्यता आहे. एक्झिट पोल्सच्या अंदाजांनुसार भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असले तरी ममतांचा पक्ष फार मागे राहील असे दिसत नाही. अशा वेळी एकमेकांवर हल्ले केले जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
केरळमध्ये डाव्या आघाडीचे पिनाराई विजयन यांचे सरकार सलग दोनदा निवडून आलेले आहे. यावेळी त्यांच्या विरोधात व काँग्रेस आघाडीच्या बाजूने कल जाईल असे मानले जाते. तेथे भाजप किती मुसंडी मारतो यावर निरीक्षकांची नजर असेल.
तमिळनाडूमध्ये सत्तारुढ द्रमुकला अनुकूल चित्र आहे. भाजपने अण्णा द्रमुकशी हातमिळवणी केली असली तरी तिसरा पक्ष म्हणून अभिनेता विजय उदयाला आलेल्या टीव्हीकेला किती जागा मिळतात यावर अनेक गणिते अवलंबून असू शकतील.
आसाम व पुद्दुचेरीमध्ये काँग्रेस व भाजप आघाडीत थेट लढत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला होता. त्यानंतर पहिल्यांदाच इतक्या एकत्रित विधानसभा निवडणुका होत असून त्यातून आपली गेलेली पत भाजप सावरतो का हे त्यांच्या निकालातून दिसणार आहे. इराण युध्द, अमेरिकेचे टॅरिफ व अर्थव्यवस्थेतील मंदी यांचे प्रतिबिंब कितपत निकालांमध्ये कसे दिसते याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.