Photo : X (@sumithansd)
राष्ट्रीय

बंगालमध्ये भूस्खलनातील मृतांचा आकडा २८ वर

बंगालमधील भीषण भूस्खलनातील मृतांचा आकडा सोमवारी २८ वर पोहोचला आहे, तर सहा जण बेपत्ता आहेत. या भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बचाव पथकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. या आपत्तीमुळे राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी भाजप यांच्यात तीव्र राजकीय संघर्ष पेटला आहे.

Swapnil S

दार्जिलिंग/सिलीगुडी : बंगालमधील भीषण भूस्खलनातील मृतांचा आकडा सोमवारी २८ वर पोहोचला आहे, तर सहा जण बेपत्ता आहेत. या भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बचाव पथकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. या आपत्तीमुळे राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी भाजप यांच्यात तीव्र राजकीय संघर्ष पेटला आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनला ‘मानवनिर्मित आपत्ती'साठी जबाबदार ठरवले, तर जलपायगुडीतील नागरकाटा भागात आपत्तीग्रस्तांना भेट देण्यासाठी गेलेल्या भाजपचे खासदार खगन मुर्मू आणि आमदार शंकर घोष यांच्यावर हल्ला घडवून आणल्याचा भाजपने तृणमूल काँग्रेसवर आरोप केला.

१२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने दार्जिलिंग, जलपायगुडी आणि कालिम्पोंग जिल्ह्यांतील अनेक डोंगर उतार कोसळले, हजारो पर्यटक अडकले आणि शेकडो लोक बेघर झाले. सुमारे ४० ठिकाणी भूस्खलन झाल्याने रस्ते बंद पडले असून, नद्या तुडुंब भरल्याने आणि पूल वाहून गेल्याने दुर्गम वसाहतींशी संपर्क तुटला आहे.

राज्याचे विकास मंत्री उदयन गुहा म्हणाले, ‘आतापर्यंत २८ लोकांचा मृत्यू झाला असून सहा जण बेपत्ता आहेत. मिरीक, सुखियापोखरी, जोरबंगलो आणि नागरकाटा हे सर्वाधिक प्रभावित भाग आहेत, जिथे रस्ते चिखलाखाली गडप झाले, पूल कोसळले आणि गावे मातीखाली दडपली गेली.

मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी मुख्य सचिव मनोज पंत यांच्यासह बागडोगरात जाऊन बचावकार्याचे निरीक्षण केले. त्यांनी केंद्र सरकार आणि दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनवर निष्काळजीपणाचा आरोप केला. ही मानवनिर्मित आपत्ती आहे. झारखंडला वाचवण्यासाठी दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन आपल्या मर्जीने पाणी सोडते आणि बंगाल त्याची किंमत चुकवतो, असे त्या म्हणाल्या.

मैथन आणि पंचेत धरणांचे गाळ काढण्यासाठी आम्ही २० वर्षांपासून मागणी करत आहोत, पण केंद्राने काही केले नाही. या निष्काळजीपणामुळे जीव गेले. सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत आणि एक कुटुंब सदस्याला गृहरक्षक (होमगार्ड) म्हणून नोकरी देण्याची घोषणा केली, असे बॅनर्जी म्हणाल्या.

दरम्यान, मालदा उत्तर मतदारसंघाचे भाजप खासदार खगन मुर्मू आणि सिलीगुडीचे आमदार शंकर घोष नागरकाट्यात भेटीला गेले असताना त्यांच्या ताफ्यावर जमावाने हल्ला केला. टीव्ही दृश्यांमध्ये “दीदी, दीदी” अशा घोषणा देत दगडफेक केली जात असल्याचे दिसले. मुर्मू यांच्या डोक्याला दुखापत झाली, तर घोष थोडक्यात बचावले.

Goa Nightclub Fire Update : आगीत २५ जणांचा दुर्दैवी अंत तर ६ जण जखमी, पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर

Goa Nightclub Fire Update : 'त्या' क्षणी किमान १०० जण डान्स करत होते; प्रत्यक्षदर्शीची माहिती

Goa Nightclub Fire : आगीच्या दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त, मृतांच्या कुटुंबीयांना धीर; सरकारकडून मदतीचे आश्वासन

Goa Nightclub Fire : गोव्याच्या नाईट क्लबमध्ये भीषण आग; २३ जणांचा मृत्यू, घटनेचा थरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

रस्तेकामासाठी जड-अवजड वाहनांना बंदी; ७ डिसेंबरपासून जड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणार